मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्याचे वास्तव अजून पचलेले दिसत नाही. शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज आपली खदखद पुन्हा व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कारशेड आरे मध्येच होणार असा मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा अहंकार पुन्हा एकदा फणा काढून उभा राहिला.
आरेमध्ये कारशेडला पुन्हा विरोध करून त्यांनी मुंबईकरांच्या मेट्रो स्वप्नाला पुन्हा एकदा नाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यावर वार करा, मुंबईकरांच्या काळजात सुरा खुपसू नका, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांचा विरोध नोंदवला आहे. सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा कारभार यू-टर्न, स्थगिती आणि सूडाच्या कारवायांपुरता मर्यादीत राहिला. मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, वनीकरण असे फडणवीस सरकारचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आणि उपक्रम त्यांनी बसनात बांधले. मेट्रो कारशेड प्रकरणी त्यांच्याच सरकारने नेमलेल्या समितीनेही आरेचाच पर्याय उचलून धरला तरीही उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गचे टुमणे लावून धरले. तज्ज्ञांपेक्षा आपल्याला जास्त कळते हा गैरसमज आणि देवेंद्र फडणवीस यांचा पराकोटीचा द्वेष हे दोन्ही घटक कांजूर प्रेमामागे होते.
सत्तेवर असेपर्यंत ठाकरे हा प्रकल्प मार्गी लावू शकले नाही. आता सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही त्यांनी हा अहंकार कवटाळून ठेवला आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेड होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमुखाने जाहीर केल्यानंतर, मुंबईकरांना हा प्रकल्प आता मार्गी लागेल अशी आशा वाटत होती. परंतु हा निर्णय झोंबल्यामुळे यात पुन्हा एकदा खोडा घालायला उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. त्यांनी आरेतील वन्य जीवांबाबत कळवळा व्यक्त केला आहे.
ठाकरे सरकार सत्तेवर असताना आरेमध्ये वृद्धाश्रम बांधण्याची घोषणा सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. आरेतील मेट्रो कारशेडमुळे बिबट्यांना धोका निर्माण होतो, असा उद्धव ठाकरे यांचा दावा आहे, मग इथे वृद्धाश्रमासाठी होणारे बांधकाम आणि वहीवाट यामुळे बिबट्यांचे कोणते कल्याण होणार होते? या प्रश्नाचे उत्तर ठाकरे यांना द्यावे लागेल. परंतु, युवराज आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या बॉलिवूड गॅंगला हाताशी धरून हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला. प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्नाचे गुंते निर्माण करण्यावर उद्धव ठाकरे यांचा भर आहे, हे गेल्या अडीच वर्षांत वारंवार स्पष्ट झालेले आहे.
एकनाथ शिंदे हे कडवे शिवसैनिक, परंतु ते मुख्यमंत्री झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पोटशूळ उसळलेला दिसतो. नव्या सरकारच्या शपथविधीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली, परंतु तिथेही तोंडावर आपटी खावी लागली. हा शपथविधी बेकायदा असल्याच्या शिवसेनेच्या दाव्याला न्यायालयाने केराची टोपली दाखवली. सर्वोच्च न्यायालयात तोंड फोडून घेण्याचा विक्रम शिवसेनेच्या नावावर सत्ता असताना नोंदवला गेला, सत्ता गमावल्यानंतरही ही कामगिरी कायम ठेवण्याचा त्यांचा मानस दिसतो.
सर्वोच्च न्यायलयाच्या थपडांमुळे शिवसेना अधिकच तिरमिरलेली दिसते. एकानाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत असा दावा करून शिंदे यांचा उल्लेख त्यांनी तथाकथित शिवसैनिक असा केला आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुखांचे चिरंजीव असल्यामुळे राज्यात शिवसैनिक कोण याचे प्रमाणपत्र वाटण्याचा नैसर्गिक अधिकार आपल्यालाच आहे, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मग ज्यांचे शिवसैनिकत्व ते नाकारता त्यांनी शिवसेनेसाठी किती खस्ता झाल्या हा भाग गौण ठरतो. उद्धव ठाकरे हे शिंदेंना शिवसैनिक मानतात की नाही हे त्यांचे त्यांना ठाऊक पण महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिकांनी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जल्लोष केला हे सत्य आहे. ठाण्यात झालेला जल्लोष तर अभूतपूर्व म्हणावा लागेल.
उद्धव ठाकरे यांना लोकशाहीची मोठी काळजी लागलेली दिसते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ३९ आमदारांना त्यांच्यासोबत उभे केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना लोकशाहीचा हा कळवळा आलाय, हे उघड गुपित आहे. मतदार मतदान कोणाला करतात, ते मत सुरत, गुवाहाटीहून जाते कुठे? यासाठीच शिवसेनाप्रमुखांनी लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार मतदाराला हवा, अशी मागणी केली होती, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलताना करून दिली.
मानभानीपणा नेमका यालाच म्हणतात. असा अधिकार जर मतदार राजाला असता तर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आपण औट घटकेचे मुख्यमंत्री झाला असता का उद्धवजी? निवडणूक लढवली भाजपासोबत, पोस्टर-बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीसांचे फोटो लावून मतं मागितली आणि मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपाच्या पाठीत खंजीर खूपसून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गळ्यात गळे घातले हा आपला इतिहास आहे. लोकप्रतिनिधीना माघारी बोलवण्याचा कायदा असता तर मुख्यमंत्री पदाची अडीच वर्षे तरी नशीबा आली असती का आपल्या. मी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यावर अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले, हे अश्रू हीच आपली कमाई आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या सरकारने मनसुख हिरेनचा बळी घेतला. हिरेनच्या हत्येचा आरोप असलेल्या सचिन वाजेच्या डोक्यावर आपलाच हात होता. तोंडात क्लोरोफॉर्मचे रुमाल कोंबून त्याला जिवंत ठाण्याच्या खाडीत फेकून दिले. एका सर्वसामान्य नागरीकाची हत्या करण्या इतके क्रौर्य तुमच्या सरकारमध्ये होते हे सरकार सत्तेवरून खाली खेचले गेले याचे दु:ख कोणाला होईल?
तेव्हा गैरसमजातून बाहेर या, मनसुखची पत्नी सुद्धा आपली खुर्ची गेल्यामुळे रडली असेल? उलट तिला धीर आला असेल, आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना आता शासन होईल, हा विश्वास तिच्या मनात निर्माण झाला असेल.
हे ही वाचा:
भाजपाकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांना उमेदवारी
शिंदे सरकारचा मोठा निर्णय; मेट्रो कारशेड आरेतच!
शिवसेनेला बाजुला ठेवून मुख्यमंत्री होऊच शकत नाही!
“सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला ठाकरेंना पाहवत नाही”
मंत्री महोदयांच्या बंगल्यावर बेदम मारहाण झालेला अनंत करमुसे, पालघरमधील हत्याकांडात मारले गेलेल्या साधूंचा शिष्य परिवार, ड्रायव्हर निलेश तेलगडेची तरुण पत्नी, दोन कोवळ्या मुली, तुमच्या वसूलीला कंटाळलेले बार मालक, टक्केवारीला कंटाळलेले व्यावसायिक, एसटी कामगार, तुमच्या अकार्यक्षम आणि घरबसल्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या राज्यातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल तुमच्या मुख्यमंत्री पदावरून जाण्याने.
त्यामुळे महाराष्ट्राची जनता आणि विकासाला तुम्ही नव्या सरकारवर सोपवा, सत्ता असताना घरी बसलात तेच सत्ता गेल्यावरही सूरू ठेवा. शांतपणे घरी बसा, जमेल तेव्हा शिवसैनिकांसाठी फेसबुक लाईव्ह करा. महाराष्ट्राला आता काम करणारा मुख्यमंत्री आणि त्याला भक्कम साथ देणारा उपमुख्यमंत्री मिळाला आहे. तेव्हा कृपा करून मुंबईकरांच्या मेट्रोच्या स्वप्नाशी खेळू नका. रोज ट्रेनच्या गर्दीत आणि वाहतूकीच्या कोंडीत गुदमरणाऱ्या मुंबईकराच्या मनात आपल्या मुख्यमंत्री पदावरून दूर होण्यामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्या आशांवर पुन्हा एकदा बोळा फिरवण्याचे काम करू नका.
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट केलं होतं. जिस दिन मनुष्य अपने सौभाग्य को ही अपना कर्तुत्व मानने लगता है, उस दिन से उसका पतन का प्रवास शुरू होता है|
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)