चला मुरारी हिरो बनने मै माधुरी दीक्षित बनना चाहता हू… हे दोन्ही पडेल सिनेमे. पहील्या सिनेमातील मुरारी म्हणजे कॉमेडीअन असरानीमध्ये हिरो मटेरीयल नव्हते. दुसऱ्या सिनेमात माधुरी व्हायला चाललेली नायिका अंतरा माळी माधुरीच्या पाच टक्केही नव्हती. परिणामी दोन्ही सिनेमे आपटले. इंडी आघाडीच्या निमित्ताने हिरो बनायला चाललेल्या अशा अनेक मुरारींचा जमाव एकत्र पाहायला मिळतोय. मीच हिरो म्हणून सगळ्यात योग्य आहे, असा प्रत्येकाला विश्वास आहे. त्याही अन्य अगदीच नालायक आहेत, यावरही तो ठाम आहे.
दिल्लीत इंडी आघाडीची बैठक झाली. महाराष्ट्रातून पक्ष गमावलेले दोन नेते आपापल्या डाव्या उजव्यांसह दिल्लीत दाखल झाले. मध्यप्रदेशात जर शिवराज सिंह यांचा चेहरा बदलू शकतो तर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहराही बदलू शकतो, असे मौलिक विचार शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ज्यांना पक्षाचा गटनेता बदलता आला नाही. तो बदलण्याच्या नादात त्यांनी पक्ष गमावला ते उद्धव ठाकरे मोदींना बदलण्याची भाषा करतात तेव्हा मनोरंजन होते.
ज्यांना गेल्या चार बैठकांमध्ये इंडी आघाडीचा समन्वयक ठरवता आलेला नाही, ते मनातल्या मनात मोदींना बदलण्याचे मांडे खातायत. समन्वयक कोण हा कळीचा प्रश्न बनलेला आहे. एक असा अडथळा ज्यामुळे घरातून क्वचित बाहेर पडणारे उद्धव यांच्यासारखे नेते कधी पाटण्यात कधी बंगळुरूमध्ये जाऊन फक्त चहा समोसे आणि बिर्याणी खाण्याचे काम करतायत.
जदयूचे के. सी. त्यागी यांनी त्यांना आरसा दाखवला. भाजपाने बूथ स्तरापर्यंत तयारी केली, परंतु आपले अजून समन्वयकाबाबत एकमत होत नाही. इंडी आघाडीने एक वर्षाचा काळ वाया घालवला. त्यागींचा त्रागा केवळ नीतीश कुमार यांचे घोडे पुढे दामटण्यासाठी आहे हे उघड. परंतु ते जे काही बोलले ते शंभर टक्के सत्य आहे. ज्यांच्या पाठी संख्याबळ आहे, त्यांना समन्वयक बनू देण्याची इतरांची तयारी नाही.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते यांनी तर काँग्रेसचा काटा ढिला करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून काँग्रेसही त्यांना पाण्यात पाहाते आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा आहेत, यापैकी एकही जागा काँग्रेसला देण्याची केजरीवाल यांची तयारी नाही. दिल्लीत सुद्धा ते काँग्रेसला पाय ठेवण्यापुरती जागा द्यायलाही तयार नाहीत. पंजाब, दिल्लीत केजरीवाल यांची स्पर्धा काँग्रेसशी असल्यामुळे ते जास्त आक्रमक आहेत.
हीच मानसिकता ममता बॅनर्जी प.बंगालमध्ये दाखवतायत. आघाडीचे समन्वयक म्हणून मल्लिकार्जुन खरगे, नीतीश कुमार, केजरीवाल, ममता बॅनर्जी, शरद पवार यांची नावे आहेत. राहुल गांधी यांची चर्चाही नाही. अखिलेश यादव यांनाही कोणी विचारत नाही. परंतु उद्धव यांची उपयुक्तता कोणाच्या लक्षातही येत नाही.
यूपीए१ आणि यूपीए२ च्या वाटचालीत सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा. कारण त्यांनी पंतप्रधान पदासाठी अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांची निवड केली. डॉ.मनमोहन हे सोनिया यांच्या शब्दाबाहेर नव्हते, असण्याची शक्यता नव्हती. कारण खासदार सोनियांच्या पाठीशी होते. मनमोहन यांच्या बाजूने तर त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि पीएमओतील अधिकारीही नव्हते. कारण तिथेही महत्वाच्या नियुक्त्या सोनियांनीच केल्या होत्या. त्यामुळे सोनिया बोले आणि मंत्रिमंडळ हाले अशी स्थिती होती. सोनिया कोणत्याही घटनात्मक पदावर नसताना ही परिस्थिती होती.
हे ही वाचा:
हैदराबाद; पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश, दोन ड्रग्ज तस्करांपासून ३.५ किलो अफू जप्त!
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्यास्ठी प्रयत्न करणार
ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक घेणार त्यांची जागा
खर्गे म्हणतात, ‘ एक महिन्याचे वेतन काँग्रेसला दान केले’
डॉ. मनमोहन सिंह हे राजकीय दृष्ट्या कमकुमवत असले तरी ते प्रगाढ विद्वान होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देशाची अर्थमंत्री म्हणून त्यांची कामगिरी उजवी होती. परंतु पंतप्रधानपदावर त्यांची निवड होण्यात त्यांच्या राजकीय कमकुवतपणाचा वाटा जास्त होता. इंडी आघाडीच्या यशासाठी काँग्रेस आणि अन्य पक्षांनी असाच ऐकणारा एखादा नेता शोधण्याची गरज आहे. कारण पाठीशी खासदारांची ताकद असलेला कोणताही नेता इतर कुणाला मीठ घालण्याची शक्यता नाही. एखादा बिनकण्याचा नेताच इंडी आघाडीतील प्रत्येक नेत्यासमोर मान डोलवू शकतो.
शिउबाठाने इंडी आघाडीचे समन्वयक म्हणून शरद पवारांचे नाव पुढे करून पाहिले त्याचा काही उपयोग नाही. कारण पवारांच्या नावावर सगळ्यात पहिली चौकट सोनियाच मारतील. ममता, केजरीवाल यांना काँग्रेसचा आणि काँग्रेसला या दोघांचा विरोध असेल. उद्धव ठाकरेंचे नाव कुठेही चर्चेत नाही. मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकदा त्यांच्या नाकदूऱ्या काढाव्या लागल्या. परंतु तेव्हाची गोष्ट वेगळी होती. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीची उब होती. आता ती उब राहिलेली नाही. त्यामुळे पाठीशी पक्ष आणि संख्या बळ नसलेले उद्धव ठाकरे हे इंडी आघाडीचे उत्तम समन्वयक ठरू शकतील. हिंदुत्व खुंटीला टांगून ठेवत उद्धव यांनी आपली विश्वासाहर्ता काँग्रेसच्या नजरेच प्रचंड वाढवलेली आहे.
राजकारणात ताकद नसणे ही जमेची बाजू ठरू शकते. त्यात जर क्षमताही नसली तर सोने पे सुहागा. भूतकाळात याच निकषावर एचडी देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांना थेट पंतप्रधानपदावर विराजमान करण्यात आले होते. त्यामुळे समन्वय पद हा फारच क्षुल्लक मामला आहे.
सत्तेसाठी कितीही वाकता येते हे ठाकरेंनी सिद्ध केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेत्याचा समन्वयक पदावर पत्ता कट झाला म्हणून अन्य पक्षांचे त्यांना समर्थन मिळणे शक्य होईल. ठाकरेंची भीती बाळगण्याचे कुणालाही कारण नाही. त्यामुळे ठाकरे हे इंडी आघाडीचे मनमोहन होऊ शकतात.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)