नाकं उडवणाऱ्यांनी नाकं मुठीत घेतली!

मोदींनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना नाक मुठीत घेऊन शब्द गिळायलाही शिकवले आहे.

नाकं उडवणाऱ्यांनी नाकं मुठीत घेतली!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करीष्मा असा आहे, की रामायणाला काल्पनिक ठरवणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी देशाला रामायणाचा अर्थ सांगत फिरतायत. कधी काळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सभेला आलेल्या मुस्लिमांची संख्या मोजतायत. मोदींनी या दोन्ही नेत्यांना नाक मुठीत घेऊन शब्द गिळायलाही शिकवले आहे.

अलिकडेच वृत्त समुहाच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राहुल गांधी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. राहुल यांना झालेली दोन वर्षांची शिक्षा, त्यानंतर रद्द झालेली खासदारकी याबाबत बोलताना शहा यांनी जुना किस्सा सांगितला. यूपीएच्या कार्यकाळात मी गुजरातचा गृहमंत्री असताना बनावट एन्काऊंटरचा ठपका ठेवून आपल्याला खोट्या आरोपात गुंतवण्यात आले होते. तेव्हा मी न्यायालयीन लढाई लढलो आणि जिंकलोही. त्यावेळी काळे कपडे घालून थयथयाट केला नाही, राहुल गांधींनाही तो मार्ग मोकळा आहे.

ब्रिटींशांच्या काळात महात्मा गांधींना जेव्हा सजा झाली तेव्हा जामिनासाठी अर्ज करणार नाही, दंड भरणार नाही, असे स्पष्ट करत सजा भोगली होती, राहुल गांधी यांना तसे करता आले असते, परंतु त्यांनी जामिनासाठी अर्ज केला असल्याची माझी माहिती आहे, असेही शहा यांनी त्या मुलाखतीत सांगितले होते. आता दहा-बारा दिवस उलटल्यानंतर का होईना राहुल गांधी यांनी अमित शहा यांचा तो सल्ला मनावर घेतलेला दिसतो आहे. माफी मागणार नाही वगैरे गर्जना सोडून राहुल गांधी आता नाक मुठीत घेऊन जामिनासाठी अर्ज करणार आहेत. गुजरातच्या कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना बदनामीप्रकरणी दोन वर्षांची सजा सुनावल्यानंतर राहुल गांधींनी अँग्री यंग मॅनचा आव आणला होता. मै गांधी हू सावरकर नही, मी माफी मागणार नाही. अर्थात राहुल गांधी हे यापूर्वी अनेक प्रकरणीत माफी मागून मोकळे झालेले आहेत. ते आता सुरत सत्र न्यायालयात कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणार आहेत आणि जामिनासाठी अर्जही करणार आहेत. आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत, हा गैरसमज दूर झाल्यामुळे नाक मुठीत धरून न्यायालयात अपील करणार आहेत.

छत्रपती संभाजी नगरमध्ये काल रविवारी महाविकास आघाडीची सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीही नाक मुठीत धरले. भाषणात नेहमीप्रमाणे शिळ्या कढीला ऊत आणत असताना त्यांनी महाविकास आघाडीची भलामण करणारी अनेक विधाने केली. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, परंतु सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत आणि पहिल्यापेक्षा भक्कमपणे एकत्र आहोत, असे सांगत महाविकास आघाडीने एकजूटीची कशी वज्रमूठ उगारली आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.   भाजपासोबत युती असताना उद्धव ठाकरे यांची सोय होती. सामनातून भाजपावर आगपाखड करण्याची सोय होती. परंतु महाविकास आघाडीत सामील झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनाच मित्र पक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतायत. सामनातून त्यांच्या आरत्या ओवाळाव्या लागतायत. त्यांना सांभाळून घ्यावे लागते आहे. कधी अजित दादांनी डोळा मारला तर त्याकडे दुर्लक्ष करावे लागत आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, हा इशारा राहुल गांधी यांनी मनावर घेतला नाही, तर त्यांच्या गळ्यात पडून गळा भेटी घ्याव्या लागतायत.

हे ही वाचा:

प्रोजेक्ट टायगर साजरी करतोय पन्नाशी

भारतात आहेत १०० वर्षांपेक्षा जुनी २३४ मोठी धरणे

दहशतवादी यासीन भटकळ सह ११ जणांवर आरोप निश्चित, देशद्रोहाचा खटला चालणार

जामीन मागण्यासाठी राहुल गांधींचे शक्तिप्रदर्शन

बरं इतकं वाकून सुद्धा मित्र पक्ष त्यांचा पचका करायचा तो करतातच. सभेत उद्धव ठाकरे यांना मोठी आणि उंच खुर्ची देण्यात आली होती. ठाकरे गटाचे शिवसैनिक यामुळे पार हुरळून गेले. अजित पवार या विषयावर मीडियाशी बोलले. त्यांना उद्धव ठाकरेंच्या मानाबद्दल बोलता आलं असतं, परंतु ते त्यांच्या मानेबद्दल बोलले. यावेळी डोळा न मारता पवारांनी त्यांची हवा काढली. ठाकरे मोठे आहेत म्हणून मोठी खुर्ची देण्यात आली नव्हती हे त्यांनी वेगळ्या प्रकारे स्पष्ट केले. ठाकरेंच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे त्यांना वेगळी खुर्ची देण्यात आली असा खुलासा पवार यांनी केला. राष्ट्रवादीने ही हलकीशी टिचकी दिली. काँग्रेसने तर वज्रमुठीला बत्ती लावली.

उद्धव ठाकरे वज्रमुठीची भाषा करत असताना मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गायब होते. तब्येतीचे कारण सांगून त्यांनी वज्रमूठ सभेला वज्रदांडी मारली. शिउबाठाचे नेते संजय राऊत यांनाही नानांची तब्येत बरी नाही, असा दुजोरा द्यावा लागला. परंतु १२ तासांत नाना ठणठणीत सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गायब होते. त्या दिवशी आजारी असलेले पटोले दुसऱ्या दिवशी इतके तंदुरुस्त झाले की राहुल गांधींना सोबत करण्यासाठी सुरतला दाखल झाले. काँग्रेसमधील अंतर्गत भांडणामुळे ते सभेला आले नव्हते, अशी चर्चा मीडियात सुरू होती. परंतु पटोले यांच्यासोबत सुरतमध्ये अन्य काँग्रेस नेते उपस्थित होते, त्यामुळे अंतर्गत भांडणाचा मुद्दाही निकाली निघतो. पटोले यांनी आपली तब्येत खराब नव्हतीच असे मीडियासमोर स्पष्ट करून राऊतांना तोंडावर पाडले आहे. आपल्याला दिल्लीत जायचे असल्यामुळे आपण सभेत नव्हतो, असे स्पष्ट केले आहे. राऊत किती खोटं बोलतात हे या निमित्ताने पुन्हा उघड झाले आहे.

ठाकरे ज्या वज्रमुठीबाबत बोलतायत, त्या वज्रमुठीत काँग्रेसचा पंजा असेल की नाही याबाबत पटोले यांची अनुपस्थिती किंतुपरंतु निर्माण करून गेली. दर दुसऱ्या सभेत उद्धव ठाकरे प्रश्नोत्तराचा त्रास घेतात. बोला मी हिंदुत्व सोडलं आहे का? बोला मी घरी बसून काम केले नव्हतं का? बोला मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या नव्हत्या का? स्वत:ला पडलेल्या शंकाचे निरसन ठाकरे अशा प्रकारे जाहीर सभेतून करून घेतात. निरसन करण्याची ही खास ठाकरे शैली आहे. त्याच धर्तीवर त्यांनी एखादा प्रश्न पटोलेंनाही विचारून घ्यावा. बोला तुम्हाला महाविकास आघाडीत राहण्यात रस आहे का?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version