भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणी पोलिस तपास सुरू झालेला आहे. विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात दिलेली प्रतिक्रीया अत्यंत नाटकी, बोगस आणि दुटप्पी आहे. ठिक सहा वर्षांपूर्वी अशाच एका सीडी पिडीताचे त्यांच्या पक्षाने जोरदार समर्थन केले होते.
सेक्स सीडीचे प्रकरण गेले दोन दिवस प्रचंड गाजते आहे. जनसामान्यांमध्येही चर्चेचा विषय झाले आहे. या आरोपांमुळे सोमय्या यांची प्रतिमा मलिन झाल्याचा सर्वाधिक आनंद ठाकरेंना असणार हे स्वाभाविक. परंतु, त्यांनी या विषयावर अत्यंत मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिलेली आहे. “असे बीभत्स आणि किळसवाणे व्हीडीयो पाहात नाही, परंतु राज्यातील माता-भगिनींनी याबाबत ज्या प्रतिक्रीया दिलेल्या आहेत त्या भावनांची सरकारला दखल घ्यावी लागेल.”
सीडी बॉम्ब टाकून एखाद्या नेत्याला नेस्तनाबूत करण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. परंतु, अतिवापरामुळे हे शस्त्र निकामी झाले असल्याचे २०१७ मध्येच उघड झाले होते. गुजरातमध्ये २०१७ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी आधी तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले युवा नेते हार्दीक पटेल यांच्या अशाच सीडीचा बोभाटा झाला होता. एका देखण्या कन्यकेसोबत पटेल यांचे व्हीडीयो व्हायरल झाले होते. पाटीदार आंदोलनामुळे प्रकाश झोतात आलेल्या पटेल यांचा गेम करण्यासाठी भाजपानेच हा उपद्व्याप केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता.
त्यावेळी शिवसेना एकसंध होती. भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तेत होती. परंतु, मिळेल त्या मुद्यावर भाजपाला ठोकायचे असे धोरण तेव्हा शिवसेनेने स्वीकारले होते. हार्दीक पटेलचा मुद्दा त्यांच्यासाठी अत्यंत सोयीचा होता. ‘सामना’मध्ये ‘रोखठोक’ या स्तंभामध्ये संजय राऊत यांनी हार्दीक पटेल यांचे जोरदार समर्थन केले होते.
“गुजरातमध्ये सरकारच्या अपयशावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाने अशा कमरे खालच्या राजकारणाचा आधार घेतला आहे. गुजरातमध्ये पाटीदार नेते भाजपावर टीका करतायत. त्यांच्या टीकेला तर्काने उत्तर देणे शक्य नसल्यामुळे भाजपावाल्यांनी ही सीडी बाहेर आणली,” अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली होती. एकाच मुद्द्याचा कडाडून विरोध आणि जोरदार समर्थन कसे करतात, याचे खरे तर राऊत यांनी क्लास सुरू केले पाहिजेत. नवशिक्या पत्रकारांना त्याचा फायदा होऊ शकेल.
संजय राऊत यांनी हार्दीक पटेलबाबत जे म्हटले होते, तेच आज किरीट सोमय्या यांना लागू पडत नाही काय? शिउबाठाला किरीट सोमय्या यांना तर्काच्या जोरोवर रोखणे शक्य होते काय? त्यांच्या तक्रारींमुळे सर्वात जास्त खड्ड्यात कोण जात होते? सत्ता असताना सोमय्या यांच्यावर हल्ला झाला, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला. कशाचाच उपयोग झाला नाही, म्हणून अखेर सीडी आली.
ही सीडी आल्यानंतर मात्र राऊत २०१७ मध्ये लिहीलेले रोखठोक विसरलेले दिसतात. ‘मी गांधीजींचा भक्त आहे, वाईट पाहत नाही, वाईट ऐकत नाही, परंतु वाईटाचा अंत नक्कीच करतो’. कोणत्या गांधींचे भक्त आहेत, हे राऊतांनी उघड केलेले नाही. परंतु, राऊत मोठ्या गैरसमाजात आहेत. एका सीडीने कोणत्याही नेत्याचा अंत होत नाही. अन्यथा हार्दीक पटेलची कारकीर्द २०१७ मध्येच संपली असती. ही सीडी जारी झाल्यानंतर त्याने बिनधास्त विधान केले होते. ‘मी अविवाहीत आहे आणि मी नपुंसक नाही. मी जे करतो ते खुल्लमखुल्ला करतो’. अशी भूमिका घेतल्यानंतर विरोधक उताणे पडतात. सीडी काढणाऱ्यांचीही कधी तरी सीडी निघू शकते. सोमय्यांची सीडी ही अखेरची नाही. अशा अनेक सीडी आणि पीडी खिशात ठेवून तयार असलेले तयारीचे गडी महाराष्ट्रात कमी थोडेच आहेत.
सीडी प्रकरणानंतर हार्दिक पटेलला शिवसेनेने डोक्यावर घेतले होते. तो मुंबईत आला होता. मातोश्री निवासस्थानी त्याने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी हार्दिक शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल अशी विनोदी चर्चा तेव्हा जोरात होती. भाजपावर सीडी प्रकरणात २०१७ मध्ये आरोप करणाऱ्या त्याच हार्दिक पटेलने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रवेशाच्या भाषणात भाजपावर स्तुती सुमने उधळली आणि शिवसेनेचे तोंड काळे केले. राऊतांचे रोखठोक अगदीच वाया गेले.
सीडीमुळे ज्यांची कारकीर्द संपली असा एकमेव नेता म्हणजे संजय जोशी. ते सुद्धा भाजपाशी एकनिष्ठ असल्यामुळे संपले. इतर कोणत्याही पक्षात गेले असते तर ते राष्ट्रीय नेते म्हणूनच वावरले असते, त्यांच्या क्षमतेबाबत तर विरोधकांच्या मनात सुद्धा शंका नव्हती.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर नऊ कोटी फॉलोअर
मणिपूर प्रकरणात सरकारने कठोर कारवाई केली नाही तर आम्ही निर्णय घेऊ
मणिपूर; महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !
पीओपीच्या गणेशमूर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका
कधी काळी लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या एका प्रख्यात वकीलाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष प्रकरणात ठाकरेंची बाजू लढवली होती. हा वकील काँग्रेसचा नेताही आहे. जेव्हा त्या वकिलावर आरोप झाले, तेव्हा काही काळ तो बाजूला झाला होता. शांत बसला होता. प्रकरण थोडे जुने झाल्यानंतर तो पुन्हा सक्रीय झाला. त्याने राजकारणात पुनरागमन केले. वकिलीही जोरात सुरू झाली. त्यामुळे एका सीडीने सोमय्या यांची कारकीर्द संपली असे मानण्याचे काहीच कारण नाही. फक्त सत्तेवर असताना आपण ज्याचे वाकडे करू शकलो नाही, सत्ता गेल्यानंतर मात्र त्याची आपण लाज काढली, याचे समाधान शिउबाठाच्या नेत्यांना जरुर मिळेल. परंतु, सोमय्या यांच्यामुळे त्यांच्यावर जे कोसळलेले अरिष्ट काही कमी होणार नाही. कारण ठाकरे आणि त्यांच्या नेते मंडळीच्या विरोधात जे काही होत होते, ते सर्व किरीट सोमय्या करत होते हा निव्वळ भ्रम आहे. सोमय्या यांची भूमिका त्यात फक्त एक तक्रारदार एवढीच मर्यादीत होती. कर्तेकरविते वेगळेच होते.
कोविड घोटाळा प्रकरणी आज ईडीने सुजीत पाटकर याला अटक केली आहे. ही घटना अत्यंत सुचक आहे.
सोमय्या यांना रोखून त्यांच्यामुळे जी प्रकरणे बाहेर आलेली आहेत, ती थांबण्याची शक्यता शून्य आहे. विरोधकांच्या अपेक्षेप्रमाणे जर खरोखरीच ते राजकारणातून बाद झाले, तर असे किरीट सोमय्या अधिक धोकादायक असतील. कारण त्यावेळी त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)