सत्तेचे विसर्जन करणारे तेच दोघे मविआ बुडवायला निघाले…

मविआची सत्ता येण्याची शंभर टक्के खात्री द्यावी तर तसेही वातावरण आता उरलेले नाही

सत्तेचे विसर्जन करणारे तेच दोघे मविआ बुडवायला निघाले…

जागावाटपाच्या मुद्द्यावरून मविआमध्ये हाणामाऱ्या सुरू आहेत. काँग्रेस आणि उबाठाचे नेते एकमेकांच्या उरावर बसलेले दिसतात. महायुतीला गाफील ठेवण्यासाठी ही नूरा कुस्ती सुरू आहे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु त्यात फार तथ्य दिसत नाही. विदर्भातील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये राडे सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मविआमध्ये भूकंप झालाच तर त्याचे केंद्र विदर्भ असेल. उद्या २२ ऑक्टोबर रोजी जागा वाटप जाहीर होईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. जर उबाठा शिवसेनेने जागा वाटपाबाबत तात्कालिक माघार घेतली तरी निवडणुकीच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उट्टे काढणार ही बाब उघड आहे.

विदर्भातील १०-१२ जागांवरून ठाकरे आणि पटोले यांच्यात जुंपली आहे. हे दोघे तेच नेते आहेत, ज्यांच्यामुळे मविआचे सरकार धराशाई झाले होते. अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळेच सरकार पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. नाना जर त्या पदावर कायम राहिले असते तर पुढचे नाट्य कदाचित
घडलेच नसते. ते विधानसभा अध्यक्ष पदावरून हलले आणि सरकार डळमळायला सुरूवात झाली. पुढे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बुडत्याचा पाय खोलात घातला. विरोधकांना बळ दिले. ठाकरेंनी विधिमंडळात जर अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्याचा पर्याय स्वीकारला असता तर कदाचित एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवणे शक्य झाले असते.

या दोन्ही नेत्यांच्या अपरिपक्व आणि उतावीळपणामुळे महायुती सत्तेवर आली. जागावाटपाच्या बाबतीतही हेच दोन नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात हेच घोळ घालतील अशी शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी जवळीक वाढल्यामुळे उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत राज्यातील काँग्रेस नेत्यांना मोजत नव्हते. नानांच्या
स्वभावात वैदर्भीय तिखटपणा व्यवस्थित मुरलेला असल्यामुळे तेही राऊतांना व्यवस्थित फाट्यावर मारत होते. त्याचे पडसाद जागा वाटपाच्या चर्चेत सुरूवातीपासून दिसत होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून नानांनी अनेकांना तिकिटासाठी शब्द दिलेला आहे. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.

संजय राऊतांनी राहुल गांधी यांच्याशी जवळीक निर्माण केली हे निर्विवाद सत्य आहे. परंतु नाना पटोले यांची राहुल गांधींसोबत असलेली जवळीक त्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. कारण नाना हे भाजपाचे खासदार होते. खासदारकीचा राजीनामा देऊन ते काँग्रेससोबत आले. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नजरेत त्यांचे स्थान खूपच मोठे आहे. विदर्भात आपलीच ताकद असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करतायत, परंतु इथे १२ जागा अशा आहेत, जिथे मविआचे आमदाराच नाहीत, असा
युक्तिवाद उबाठाचे नेते करतायत. परंतु काँग्रेसचे नेते हा दावा मानायला तयार नाहीत. नागपूरातील सहा जागांपैकी एकही जागा मित्र पक्षांना सोडण्याची काँग्रेसची तयारी नाही. पूर्व नागपूरवर राष्ट्रवादीशप आणि दक्षिण नागपूरवर ठाकरे गटाने दावा केलेला आहे.

हे ही वाचा:

गुजरातमध्ये दोन वेगवेगळ्या कारवाईत ४०० किलोहून अधिक ड्रग्ज जप्त!

उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध

एअर इंडियाच्या विमानातून उड्डाण न करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी

फसवा कॉल दखलपात्र गुन्हा ठरणार

या दोन्ही पक्षांची विदर्भात ताकद नसल्यामुळे यांना जागा सोडणे म्हणजे भाजपाच्या विजयाचा मार्ग मोकळा करणे, असे काँग्रेस नेत्यांचे ठाम मत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात रामटेक आणि अमरावतीची जागा आम्ही काँग्रेससाठी सोडली होती. आता काँग्रेसची वेळ आहे, हा उबाठा शिवसेनेचा युक्तिवाद आहे. मुळात हा युक्तिवाद तकलादू आहे कारण
अमरावतीच्या खासदार होत्या नवनीत राणा आणि रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने होते. उबाठा शिवसेनेचे नेते कितीही ताणत असले ठाकरे कितीही आव आणत असले तरी ते स्वतंत्र लढण्याची शक्यता शून्य आहे. कारण त्यांच्याकडे
तेवढे बळच उरलेले नाही. काँग्रेस समर्थक तेहसीन पूनावालाने तर इथपर्यंत सांगितले आहे की उबाठाकडे स्वत:चा मतदारही उरलेला नाही. हे सत्यही आहे. त्यामुळे नाकमुठीत घेऊन ठाकरेंना काँग्रेससोबत जावे लागले.

काँग्रेसने ठाकरेंना चेपण्याचे काम केले, उबाठाला त्यांच्या मनाविरुद्ध तडजोड करावी लागली तर ठाकरे योग्य वेळी त्याचा वचपा काढणारच. कारण मुख्यमंत्री पद मिळणार नाही हे आता जवळजवळ निश्चित झालेले आहे. मविआची सत्ता येण्याची शंभर टक्के खात्री द्यावी तर तसेही वातावरण आता उरलेले नाही. त्यामुळे निवडणुकीपुरते एकत्र राहून ठाकरे रागरंग पाहतील आणि योग्य वेळी काँग्रेसचा कार्यक्रम करतील अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचा सांगली पॅटर्न गाजला होता. विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी सांगली पॅटर्न दिसण्याची शक्यता आहे. फरक एवढाच त्याचा वापर फक्त काँग्रेसवाले करतील याची शक्यता कमी आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version