राऊत हरणार म्हणतायत म्हणजे भाजपा जिंकणार?

पक्ष म्हणून काही जिंकण्याची शक्यता उरली नसल्यामुळे भाजपा कुठे हरतोय हे शोधणे एवढेच काम आता शिउबाठाच्या नेत्यांच्या हाती उरले आहे.

राऊत हरणार म्हणतायत म्हणजे भाजपा जिंकणार?

अलिकडे पक्ष म्हणून काही जिंकण्याची शक्यता उरली नसल्यामुळे भाजपा कुठे हरतोय हे शोधणे एवढेच काम आता शिउबाठाच्या नेत्यांच्या हाती उरले आहे. काँग्रेस पक्ष जिंकला तर आपल्याच घरात पोर झाल्यासारखं नाचायचं, जल्लोष करायचा, भाजपाचा विजय झाला तर इव्हीएमवर आगपाखड करायचे असे धंदे बराच काळ सुरू आहे. शिउबाठाचे ब्रह्मदेव संजय राऊत यांनी पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार असे भाकीत केले आहे. संजय राऊत यांची आजवरची भाकीतं ज्या प्रकारे तोंडावर आपटली ते पाहाता भाजपाला त्यांच्या भाकीतामुळे हायसं वाटण्याची शक्यता अधिक.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यात अलिकडेच निवडणुका पार पडल्या. शुक्रवारी एक्झिट पोलचे निकाल आले. सर्व सर्वेक्षण संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलचा निचोड काढला मध्य प्रदेश राजस्थानात भाजपा आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर, छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे पुनरागमन, तेलंगणात बीआरएस आणि काँग्रेसमध्य रस्सीखेच. मिझोराममध्ये स्थानिक पक्षाचे सरकार असा हिशोब मांडण्यात आलेला आहे. शिउबाठा ही काँग्रेसची तैनाती फौज बनलेली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते खूष होतील अशी वक्तव्य करण्याची स्पर्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात लागलेली असते. भाजपाला काँग्रेस मुक्त भारत करायचा होता, परंतु पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भाजपाला घाम फोडला असल्याची भलामण त्यांनी केली. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणात काँग्रेसचे आणि मिझोराममध्ये स्थानिक पक्षाचे सरकार येणार असे भाकीत त्यांनी केले.

राजकीय नेत्यांची भाकीतं म्हणजे अनेकदा विश फूल थिंकींग असते. जे होईल त्याबाबत भविष्यवाणी करण्यापेक्षा जे व्हावेसे वाटते त्याबाबत भविष्यवाणी करण्यात त्यांना रस असतो. २०१७ मध्ये गुजरातच्या विधानसभा निवणुका होत्या. एक्झिट पोलमध्ये भाजपाचे सरकार येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारमध्ये ठाकरेंचा पक्ष सामील होता. उद्धव ठाकरे एकाच वेळी सरकारमध्ये सामील असलेला पक्ष आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावत होते. एक्झिट पोलचे निकाल यांनी अगदीत निकाली काढले. गुजरातमध्ये भाजपाला बहुमत मिळेल असे आपल्याला वाटत नाही, अशी भविष्यवाणी केली. पुढे काय झाले हे सर्वश्रुत आहे.

संजय राऊतांच्या खंडीभर भविष्यवाण्या यापूर्वी तोंडावर आपटलेल्या आहेत. मविआ सरकार २५ वर्षे टीकेल या भविष्यवाणी पासून सध्याचे महायुती सरकार कसे कोसळेल, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून कसे पायउतार होतील, अशी सतराशे साठ भाकीतं त्यांनी केली होती. प्रत्यक्षात त्यातले अर्धे भाकीतही प्रत्यक्षात आले नाही. सतत तोंडावर आपटूनही राऊतांचा भाकीतं करण्याचा सोस कमी होत नाही. काँग्रेसने भाड्यावर ठेवले असल्यासारखे ते बोलत असतात. जगभरात काही खुट्ट जर झाले तर त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटतात. विधानसभा निवडणुकांकडे शेअर बाजाराचे बारीक लक्ष आहे. एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी शेअर बाजाराने उसळी घेतली. निफ्टी २०२०० चा महत्वाचा टप्पा ओलांडून २०२६७ वर बंद झाला. शेअर निर्देशांक ४९२ अंकांची उसळी घेत ६७४८१ पर्यंत वधारला. शेअर बाजाराने एक्झिट पोलचे आकडे सकारात्मक पद्धतीने घेतले.

हे ही वाचा:

पाकिस्तानातील सिंधींकडून रामलल्लासाठी पोशाख

महिलेलाही बलात्कारप्रकरणी दोषी ठरवले जाऊ शकते?

मुंबई महापालिकेतील कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार

तमिळनाडूत २० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक

सट्टा बाजारातही राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपाच्या बाजूने सट्टा लावण्यात आलेला आहे. तेलंगणा आणि छत्तीसगढमध्ये भाजपाची सत्ता नाही. त्यामुळे ही राज्य कोणाच्या पारड्यात जातायत हे भाजपाच्या यशाअपयशात मोजले जाणार नाही. राजस्थान आणि मध्य प्रदेशापैकी एक राज्य राखण्यात भाजपाला यश आलं तरी भाजपाच्या दृष्टीने परीस्थिती जैसे थे राहणार आहे. इथे एक राज्य आलं आणि एक गेलं असा विचार केला जाऊ शकतो. परंतु ही दोन्ही राज्य भाजपाच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. राजस्थानात भाजपाच्या पुनरागमनाची शक्यता जास्त आहे. आगामी लोकसभा निवडणुकींचा विचार केल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांनीही लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मतदान करणार असे स्पष्ट केले आहे.

उद्या ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ठाकरे आणि राऊत यांनी आता पासून काँग्रेसच्या मिरवणुकीत नाचण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधलेले आहे. पडत्या काळातही काँग्रेसला सेलिब्रेशनसाठी चिअर्स गर्ल्स फुकटात मिळतात, हे समाधानही राहुल गांधी यांच्या दृष्टीने थोडेथोडके नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version