देश-विदेशात घडणाऱ्या घटनाक्रमांबाबत पराकोटीचे अज्ञान, ही शिउबाठाचे नेते संजय राऊत यांची जुनी समस्या आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, की मध्यप्रदेशातील महूमध्ये हे सुद्धा माहीत नसल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले. आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत राऊतांनी पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत.
नेत्यानाहू हे इस्त्रायलमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहिलेले नेते आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्या आरोपामुळे भविष्यात गोत्यात येऊ नये म्हणून ते देशाच्या घटनेत बदल करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. तिथल्या बँका, विमानतळ कर्मचारी, बड्या खासगी कंपन्यांचे कर्मचारी, कामगार संघटना संपावर गेल्या आहेत. रस्त्यावर उतरून नेत्यानाहू यांचा निषेध करीत आहेत.
नेत्यानाहू यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि देशाचे संरक्षण मंत्री योआव्ह गॅलंट यांनी तर नेत्यानाहू यांच्या या निर्णयाच्या विरोधात तोफ डागली आहे. नेत्यानाहू यांच्या इराद्याबाबतच लोकांच्या मनात शंका आहे. भविष्यात पंतप्रधान असलो वा नसलो तरी, भ्रष्टाचार प्रकरणात कायद्याच्या कचाट्यात येऊ नये, आपली चौकशी होऊ नये, शिक्षा होऊ नये यासाठी कायदा बदलण्याचा नेत्यानाहू यांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न जेव्हा चव्हाट्यावर आला तेव्हा जनता रस्त्यावर उतरली.
लष्करातही दुफळी निर्माण झाली. इस्त्रायलमध्ये न भूतो न भविष्यति असे राजकीय संकट उभे राहिले आहे. या प्रयत्नांमुळे देशात मोठा अस्थिरता निर्माण होईल असा इशारा गॅलंट यांनी दिल्यामुळे त्यांचे नेत्यानाहू यांच्याशी बिनसले आहे. जनतेत नेत्यानाहू यांच्याविरोधात प्रक्षोभ निर्माण झाला आहे.
हा प्रक्षोभ भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात आहे. भ्रष्टाचारामुळे सर्व सामान्य जनता भिकेला लागते, हे पाकिस्तानच्या उदाहरणावरून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे इस्त्रायल असो वा पाकिस्तान भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. इस्त्रायलमध्ये नेत्यानाहू यांच्या भ्रष्टाचाराच्याविरोधात जनता उतरलेली आहे, ही बाब राऊत मोठ्या खूबीने दडवतायत. जनतेचा उठाव भ्रष्टाचाऱ्यांच्याविरोधात आहे, ही बाब भारतातील भ्रष्टाचाऱ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.
मोदी भारतात भ्रष्टाचाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे सगळे भ्रष्टाचारी नेते त्यांच्याविरोधात एकवटले आहेत. त्यात शिउबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अरविंद केजरीवाल, लालू यादव, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, हेमंत सोरेन अशा अनेकांचा समावेश आहे. राहुल गांधी या भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके आहेत.
हे ही वाचा:
बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक
कर्नाटकात एकाच टप्प्यामध्ये होणार निवडणुका
आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी
नामस्मरण हेच सर्वस्व सांगणारे गोंदवल्याचे श्री ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत भ्रष्ट राजकारण्यांवर प्रखर हल्ला केला. भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा झाली की हे लोक न्याय व्यवस्थेला लक्ष्य करतात. घटनात्मक संस्थांना लक्ष्य करतात. आता तर देशातील अनेक पक्षांनी एकत्र येऊन भ्रष्टाचार बचाओ आंदोलन सुरू केले आहे. मोदींचे आरोप स्पष्ट आणि स्वच्छ आहेत. परंतु मोदींशी लढताना विरोधक दिशाभूल तंत्राचा घाऊक प्रमाणात वापर करून घेतायत. नेत्यानाहू यांच्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली तशी ती मोदींच्या विरोधात रस्त्यावर उतरेल ही आवई त्याच प्रकारची आहे.
उद्योगपती गौतम अदाणी हा चेहरा असून गुंतवणूकदार नरेंद्र मोदीच आहेत, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यांचे सहकारी मंत्री मनिष सिसोदीया तुरुंगात गेल्यापासून केजरीवाल यांना तुरुंग खूणावतो आहे. त्यातून हे बेताल आरोप त्यांनी केलेले आहेत. राहुल गांधी यांच्याप्रमाणे केजरीवालही माफीवीर आहेत. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात केलेल्या आरोपप्रकरणी त्यांनी यापूर्वी न्यायालयात माफी मागितलेली आहे. मोदींवर केलेल्या आरोपाप्रकरणी त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
मुद्दा हा आहे की इस्त्रायलची जनता भ्रष्टाचाराच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. भारतात मोदींच्या विरोधात जनतेला रस्त्यावर उतरवणे विरोधकांना जमत नाही, कारण मोदींच्या प्रामाणिकपणाबाबत जनतेच्या मनात कोणताही संशय नाही. परंतु जनतेला मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याच्या समर्थनार्थ मात्र रस्त्यावर उतरावे लागेल. या लढ्याला त्यांचा मजबूत पाठिंबा आहे हे दाखवावे लागेल. नाही तर भ्रष्टाचार करून मीडियाच्या समोर निर्लज्ज तोंड पाटीलकी करत फिरणाऱ्या नेत्यांचे फावेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)