29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरसंपादकीयतर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते...

तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…

भाजपाशी संबंध टिकवले असते तर बंगळुरूतील विरोधकांच्या बैठकीत कोपऱ्यात बसलेले उद्धव ठाकरे मोदींच्या सोबत दिसले असते.

Google News Follow

Related

नवी दिल्लीत काल रालोआची बैठक पार पडली. या बैठकीत ३८ पक्षांनी सहभाग घेतला होता. बैठकीची क्षणचित्रे आपण पाहिलीत तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार विराजमान झालेले दिसले. बैठक आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांना प्रेमाने निरोप दिला. भाजपाशी संबंध टिकवले असते तर बंगळुरूतील विरोधकांच्या बैठकीत कोपऱ्यात बसलेले उद्धव ठाकरे मोदींच्या सोबत दिसले असते.

लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. काल एका बाजूला बंगळुरूमध्ये विरोधकांच्या २६ पक्षांच्या आघाडीची बैठक सुरू होती. दुसऱ्या बाजूला नवी दिल्लीत रालोआची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीला संबोधित केले. आसन व्यवस्था अशा प्रकारची होती की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गृहमंत्री अमित शहांच्या सोबत बसवण्यात आले होते. या दोन्ही नेत्यांना जाणीवपूर्वक हे महत्व देण्यात आले होते, हे उघडच आहे. इथे नकळत काहीच घडत नाही. सर्वकाही विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध. ठाकरेंच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम आहे हे. भाजपाला तो अधिकार ठाकरेंच्या कर्मांने बहाल केलेला आहे.

पंतप्रधानांनी भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यांचे सच्चे अनुयायी आजही आपल्यासोबत आहेत, असेही ते म्हणाले. एकाच वाक्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आणि उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला.

प्रणब मुखर्जी, मुलायम सिंह, गुलामनबी आझाद, तरुण गोगोई, एम.सी.जमीर, मुजफ्फर बेग आदी नेते कधीही एनडीएचे घटक नव्हते परंतु देशासाठी त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना आमच्या सरकारने पद्म पुरस्कार देऊन गौरविले, असे मोदींनी सांगितले. शरद पवारांचाही या यादीत त्यांनी उल्लेख केला. जेव्हा पंतप्रधान शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळत होते. तेव्हा शरद पवार बंगळुरूमध्ये अन्य विरोधी पक्षांसोबत मोदींना पाडायचे कसे या विषयावर खल करत होते. परंतु मोदींनी पवारांचा भाषणात उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या मनात संशयाची पाल नक्कीच चुकचुकली असेल. मोदी पवारांची ताऱीफ का करतात, पवार नेमके कुठे आहेत, असे प्रश्न पडले असतील. विधी मंडळ अधिवेशनादरम्यान अजित पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांना भेटले होते, तेव्हा बंद दारा आड दोन्ही नेत्यांची चर्चा झाली होती. काँग्रेसने या बंद दारा आड झालेल्या चर्चेवर आक्षेप घेतला होता. याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेसच्या मनात थोरल्या पवारांबाबत संशय निर्माण झालेला आहे. मोदींनी तो वाढवण्याचा प्रय़त्न केलाय एवढेच.

मोदी दोन वेळा देशाचे पंतप्रधान झाले त्याचे कारण केवळ त्यांनी जगभऱात भारताची मान उंचावली किंवा देशात विकासाला गती दिली एवढेच नाही. त्यांना राजकारणाची उत्तम जाण आहे आणि वेळ पडल्यास ते नागमोडी आणि निष्ठूर राजकारणही ते करू शकतात हेही आहे.

विरोधी पक्ष म्हणून गेल्या नऊ वर्षाच्या काळात काँग्रेसने जे काही केले, त्याचाही मोदींनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसला आघाड्या का हव्या असतात, त्याचे अचूक विश्लेषण मोदींनी केले. नव्वदच्या दशकात बनलेल्या आघाडी सरकारांच्या माध्यमातून काँग्रेसने देश अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा, इंदरकुमार गुजराल यांची उदाहरणे आहेत. या आघाड्या टीकल्या नाहीत कारण त्या नकारात्मकतेच्या पायावर उभ्या होत्या.

एनडीए कोणाच्या विरोधात बनलेले नाही, कोणाला सत्तेवरून हटवण्यासाठी बनले नाही. रालोआचा प्रयोग देशात स्थिरता आणण्यासाठी झाला. विरोधात बसून रालोआने सरकारचे वाभाडे काढले, घोटाळे बाहेर काढले परंतु जनादेशाचा अपमान केला नाही. विदेशी शक्तीची मदत नाही मागितली. विकासात अडथळे आणले नाही. अवरोध बनलो नाही, असा घणाघात मोदींनी केला.

मोदी केवळ रालोआची वैशिष्टे सांगत नव्हते. हे सगळे आम्ही केले नाही, परंतु तुम्ही केले. भाजपाला सत्तेवरून खाली खेचणे हाच तुमचा एक कलमी कार्यक्रम आहे, असे मोदी विरोधकांना सुनावत होते. फक्त त्यासाठी त्यांनी वेगळ्या शब्दांची निवड केली होती.

गेल्या नऊ वर्षात काँग्रेसचा मोदीद्वेष इतका बळावला की चीनसोबत कधीही संघर्ष भडकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना राहुल गांधी चीनी राजदूतासोबत गाठीभेटी करत होते. राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांचे निमंत्रक, त्यांच्यासोबत गाठीभेटी करणारे, वावरणारे लोक पाहिले तर त्यातल्या अनेकांचा कुठे तरी ओपन सोसायटीचे जॉर्ज सोरोस, आयएसआय, खलिस्तानी चळवळीशी संबंधित लोकांशी उघड संबंध होता. या आणि अशा अनेक मुद्यावरून कधी काळी राहुल गांधी आणि सोनिया गांधीना निशाणा बनवणारे उद्धव ठाकरे बंगळुरूच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करत होते. ती चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली असेल याबाबत जनतेच्या मनातही उत्सुकता आहे. मित्र बदलल्यावर फक्त माणसं बदलत नाहीत, गोतावळा आणि चर्चेचे विषयही बदलतात. उद्धव ठाकरे याचा अनुभव घेत असतील. सत्ता गमावलेल्या सोनिया, त्यांचे पुत्र राहुल आणि उद्धव ठाकरे हे तुर्तास तरी समदु:खी आहेत. त्यांच्यासारखे अनेक त्यांना बंगळुरूमध्ये भेटले असतील.

हे ही वाचा:

जनतेचा एकच पुकार, देशात पुन्हा मोदी सरकार

जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन

भागवत कराड घेणार सात कोटींचे घर

आंदोलनकर्त्या विनेशविरोधात युवा कुस्तीगीराची लढाई न्यायालयात

विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडीयन नॅशनल डेव्हलमेंटल इनक्लिव्हनेस अलायन्स हे नाव निवडले आहे. नावाचा संक्षिप्त रुप ‘इंडिया’ व्हावे म्हणून बहुधा इतक्या लंब्याचौड्या नावाचा आटापिटा. विरोधी आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण झाल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी त्यांच्या ट्वीटर प्रोफाईलवरून ‘इंडिया’ हा शब्द हटवून त्या ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला. भारत विरोधात इंडियाअसे त्यांना सुचवायचे असेल परंतु त्याची आवश्यकता नव्हती. देशावर राज्य करणाऱ्या आणि राज्य करताना लुटणाऱ्या ईस्ट इंडीया कंपनीच्या नावातही इंडीया होते. म्हणून ती कंपनी देशभक्त होती असे कोणी म्हणत नाही.

बंगळूरमध्ये झालेल्या विरोधकांच्या आघाडी बैठकीत उद्धव ठाकरे एका कोपऱ्यात कुठे तरी केजरीवाल यांच्या बाजूला बसले होते. पक्ष आणि निशाणी नसताना आपल्याला पाटण्याला बोलावले याचे ठाकरेंना कौतूक वाटले होते. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांशेजारी बसलो याचेही त्यांना कौतूक वाटले असेल. देवेंद्र फडणवीस यांना जे दोन नेते जलेबी सारखे सरळ वाटतात, त्यांचे एकत्रित दर्शन यानिमित्ताने देशातील जनतेला झाले. उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व कवटाळून भाजपासोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी अमित शहा यांच्या बाजूला ते बसले असते. अजित पवारांना तिथे बसवण्याची भाजपाला गरजच वाटली नसती. परंतु, मुख्यमंत्री पदाचा मोह इतका जबरदस्त होता की भविष्यात असे काही घडेल याचा विचार सुद्धा तेव्हा ठाकरेंच्या डोक्यात डोकावला नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा