महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपा- शिवसेना युतीच्या सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडलेली आहे. अजित पवार सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री म्हणून दाखल झालेले आहेत. दोघांत तिसरा आलेला आहे. या नव्या समीकरणामुळे आता राज्य सरकारमध्ये बळ कोणाचे वाढणार याची चर्चा सुरू झालेली आहे. २०१४ मध्ये शरद पवार यांनी खेळलेली खेळी भाजपाच्या पथ्यावर पडली होती. २०२३ मध्ये बहुधा त्याची पुनरावृत्ती होते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ४० आमदार घेऊन अजित पवार सामील झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट जवळ करण्यात आला. आता लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४० पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य अगदी सहज गाठता येईल. शिवसेनेवरील अवलंबित्व जागा वाटपात भाजपाच्या
पारड्यात जास्त जागाही येतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ मिळाल्यामुळे माढा, सोलापूर अशा अनेक लोकसभा मतदार संघाचे गणित बदलणार आहेत. शिवाय अजितदादांच्या एण्ट्रीमुळे सरकार पातळीवरील समीकरणेही बदलणार आहेत. सरकारमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जेवढे आमदार आले तेवढेच आमदार अजित पवारांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे बहुमताच्या आकड्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजितदादा असे दोन पर्याय भाजपाला उपलब्ध झाले आहेत. भाजपाच्या दोन्ही हातात लाडू आहेत. शिवसेनेला सरकारमध्ये जो वाटा मिळत होता, त्यात आणखी एक वाटेकरी आलेला आहे. अजित पवार सत्ता राबवण्याच्या बाबतीत पटाईत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत मविआमध्ये एकत्र काम केले असले तरी त्यांची सलगी देवेंद्र फडणवीस यांच्याशी अधिक आहे. हे नवे समीकरण त्याच सगलीमुळे जुळलेले आहे.
सत्तेत नव्याने होत असलेल्या विभागणीचा फायदा राष्ट्रवादी आणि भाजपा या दोघांना होणार आहे. अजितदादांनी भाजपाची बार्गेनिंग पावर वाढवली आहे.
हेच २०१४ मध्ये घडले होते. परंतु त्यावेळी हे घडवणारे थोरले पवार होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुका भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. भाजपाला १२२ जागा मिळाल्या, शिवसेनेना ६३, काँग्रेसला ४२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. शिवसेनेच्या मदती शिवाय सरकार बनवणे शक्य नव्हते. निवडणूक प्रचारात दोन्ही पक्षात कडवटपणा आल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज होते. निवडणुकीच्या आधीच त्यांनी भाजपाशिवाय सरकार बनतेय का याची चाचपणी केली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच हा गौप्यस्फोट केला होता. परंतु, त्यावेळी ते जुळून आले नाही.
हे ही वाचा:
पॅलेस्टाइनमधील वेस्ट बँक भागावर हल्ला; मध्य आशियाई देशांत तणाव वाढला
रोममधील कोलोजियमच्या भिंतीवर नाव लिहिणाऱ्या जोडप्याची ओळख पटली
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांची निवड?
इंदूर धुळे मार्गावर ट्रक हॉटेलमध्ये घुसला; ७ ठार
सर्वाधिक जागा भाजपाच्या वाट्याला आल्यामुळे शिवसेना सरकारमध्ये सामील झाली तरी मुख्यमंत्री भाजपाचा होणार हे नक्की होते. हीच उद्धव ठाकरेंसाठी मोठी पोटदुखी होती. किमान भाजपाने नाक घासत आपल्याकडे यावे काही तगडी ऑफर द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. भाजपा-शिवसेना एकत्र आल्यास बहुमताचा आकडा गाठणे सहज शक्य होते. परंतु दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली नसल्यामुळे शिवसेना सरकारमध्ये सामील होण्यास बांधील नव्हती. शिवसेनेला सरकारमध्ये आणण्यासाठी भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नाकदूऱ्या काढाव्या लागणार असे चित्र दिसत होते.
त्यावेळी शरद पवार भाजपाचे संकट मोचक बनले. निवडणूक निकाल जाहीर होत असताना भाजपाला सर्वाधिक जागा हे चित्र स्पष्ट दिसत होते. तेव्हा त्यांनी भाजपाला एकतर्फी पाठींबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेची मोठी गोची झाली. उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पावर शरद पवारांनी पार संपवून टाकली. पवारांच्या खेळीमुळे काही काल विरोधी बाकांवर बसलेल्या शिवसेनेला नाक मुठीत धरून सरकारमध्ये सामील व्हावे लागले. कारण आपण भाजपासोबत गेलो नाही, तर पवार जातील या भीतीने ठाकरे गारठले. पक्ष फूटण्याचाही धोका होता. अखेर उद्धव यांना भाजपासोबत जावे लागले. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला सरकारमध्ये अत्यंत दुय्यम भूमिका आली.
२०१४ आणि २०२३ च्या परिस्थितीत काही साम्य आहेत तर काही मुलभूत फरक आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि भाजपामध्ये असलेला कडवटपणा आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही. दोन्ही नेते समंजस आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्व कमी होणार नाही. भाजपा- शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस निर्माण होण्याची शक्यताही नाही. परंतु, भाजपाने आपल्या हातात हुकूमाचे आणखी काही पत्ते राहतील अशी व्यवस्था केलेली आहे. आधीच्या अनुभवामुळे भाजपा अधिक सजगपणे पावले टाकते आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)