पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील संपन्न भाग मानला जातो, तसा काही मराठवाड्याचा लौकिक नाही. बीड इथला एक जिल्हा जिथे कोट्यवधी रुपये खर्च करून रश्मिका मंदाना सारख्या महागड्या स्टार्सना बोलावले जाते. इव्हेंटवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. उत्पन्नाचा कोणताही ज्ञात स्त्रोत नसताना इतका पैसा येतो कुठून हा प्रश्न बीडमध्ये कुणाला पडत नाही, कारण त्यांना उत्तर माहिती आहे, बीड बाहेर मात्र हे एक कोडे आहे. इथे पैशाचा पाऊस पडतो का? तसं काही नाही. हा पैसा राखेच्या ढिगाऱ्यातून येतो, वीट भट्ट्यांच्या धुरातून येतो. हा पैसा अफाट आहे. वाल्मिक कराडसारख्या कधी काळ घरकाम करणाऱ्या पोराला करोडपती बनवण्याची ताकद या काळ्या धुरात आहे.
पुण्यात काल वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. कधी काळी गोपीनाथ मुंडे यांच्या घरात घरकाम करणाऱ्या या पोराला अवघ्या दोन दशकांत असा कोणता अल्लाउद्दीनचा चिराग मिळाला, ज्यामुळे त्याला इतकी बरकत आली? धनंजय मुंडे यांचा तो उजवा हात बनला? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हा बीडमधला अपवाद नाही. इथे जो काळ्या पैशाचा पाऊस पडतो, त्याच्या वादातून अशा अनेक हत्या झाल्या आहेत. यात मारले गेलेले अनेक या पैशासाठी सुरू झालेल्या टोळी युद्धात मारले गेले आहेत. देशमुख गावासाठी या टोळीवाल्यांना भिडायला गेले आणि त्यांचा बळी गेला.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडमधल्या इव्हेंटचा उल्लेख केला, त्याला वेगळे वळण लागले. धस नको तिथे घसरले. नको ते बोलले, परंतु त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेला इव्हेंटचा मुद्दा चुकीचा ठरत नाही. अलिकडेच पुष्पा टू रीलिज झाला. अल्लू अर्जुनच्या या सिनेमाचे दोन्ही भाग यशस्वी झाले. रणबीर कपूरचा एनिमलही पडद्यावर तुफान चालला. रश्मिका या तिन्ही सिनेमाची नायिका आहे. साऊथच्या सिनेमातला एक मोठा चेहरा. ती बीडमध्ये येते आणि कार्यक्रम करते. असे महागडे इव्हेंट बीडसारख्या जिल्ह्यातील नेत्यांना कसे परवडतात, असा प्रश्न जर कुणाला पडला तर तो चुकीचा कसा म्हणता येईल?
बीड जिल्ह्यात परळी येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात राखेची निर्मिती होते. एकेकाळी ही राख बीडमधील चार तळ्यांमध्ये फेकून देण्यात येत असे. वीटांच्या निर्मितीत मातीसोबत याचा वापर करण्याची आयडीया कुणाला तरी सुचली आणि त्यानंतर या राखेला किंमत आली. इमारतींसाठी सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठीही हा महत्त्वाचा कच्चा माल आहे. फुटकळ पैशात ही राख मिळवायची आणि बाहेर हजारपट किमतीला विकायची. असा धंदा इथे गेली अनेक वर्षे सुरू आहे. हा तमाम धंदा इथल्या माफीयांच्या हातात आहे. नागापूर रोड, गंगाखेड रोड, चांदापूर रोड, नंदागौळ या भागात याच राखेचा वापर करणाऱ्या सुमारे दोनशेच्या वर अनधिकृत वीट भट्ट्या या भागांत चालतात. यात मोठ्या प्रमाणात मुस्लीम लोकांचा भरणा आहे. काही प्रमाणात वंजारी समाजाचे लोकही आहेत. परळीची वीट हा ब्रँड बनला आहे.
परळीपासून हैदराबाद फक्त ३५० कि.मी अंतरावर आहे. परळीतील वीटांसाठी ही मोठी बाजार पेठ आहे. या अनधिकृत वीट भट्ट्यांकडून नियमितपणे खंडणीची वसूली होते. बीडमध्ये पैसा असा राखेच्या ढीगाऱ्यातून निर्माण होतो, वीट भट्टीच्या धुरातून निर्माण होता. हे असे कुरण आहे, जिथे सरकारी गैर सरकारी सगळ्या प्रकारची जनावरे व्यवस्थित चरत असतात. धष्टपुष्ट होत असतात. जेव्हा खंडणीतून मोठा पैसा येत असतो, तेव्हा या पैशाच्या वसूलीसाठी टोळ्या निर्माण होतात, त्यांच्यात टोळी युद्ध अपरीहार्य असते. बीडमध्ये अशा टोळी युद्धात संगीत दिघोळे, किशोर फड, काकासाहेब गरजे अशा अनेकांचे बळी गेले आहेत. सगळा गोरखधंदा आहे, वरपासून खालपर्यंत सगळ्यांचे हात गरम करून हा धंदा सुरू असतो.
गोदावरी नदीच्या वाळूचा अनधिकृत उपसाही इथल्या राजकीय माफीयांना बळ देतो. त्यामुळे परळीत पैसा असा धो धो वाहतो आहे. लोकांना या धंद्यांचा मोठा उपद्रव आहे. वीट भट्ट्यांच्या परिसरात आकाशात धुरांचे काळे ढग कायम दिसत असतात. सगळ्यांनीच नियम आणि कायदे धाब्यावर बसवल्यानंतर राखांचे ढीगारे घेऊन फिरणाऱे ट्रकवाले नियम कशाला पाळतील? ही राख व्यवस्थित झाकून नेणे अपेक्षित असते, परंतु या राखेची उघडीवाघडी वाहतूक सुरू असते. राखेचे लाखो कण हवेत उडत असतात. अनेकदा ही धूळ मोटारसायकल स्वारांच्या डोळ्यात गेल्यामुळे अपघात होतात. प्रदूषणामुळे इथे श्वसनाचे विकार मोठ्या प्रमाणात बळावले आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून खंडण्या वसूल करणे हा एकमेव धंदा इथे चालत नाही. इथे दोन नंबरच्या धंद्यांची भाऊगर्दी आहे. या धंद्यात सामील असलेल्या लोकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाची गरज असते. इथून राजकीय गॉडफादरची आवश्यकता निर्माण होते. वाल्मिक कराड नावाचा माफीया एका दिवसात निर्माण होत नाही. सरकारी अधिकारी आणि राजकीय माफीयांच्या अनैतिक संबंधातून ही अनौरस अपत्य जन्माला येत असतात.
हे ही वाचा :
जबलपूरमध्ये कुस्तीच्या आखाड्यातील हनुमानाच्या मूर्तीची विटंबना
मातोश्रीवर संजय राऊत यांना बुकलले? सोशल मीडियावर गरमागरम चर्चा
नव वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हत्याकांडाने हादरलं; चार बहिणींसह आईची हत्या
संतोष देशमुख प्रकरण, आरोपीच्या अटकेसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन!
या आधी मी म्हटल्याप्रमाणे या काळ्याधंद्यात संतोष देशमुख आडवे येत होते, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. कारण हात स्वच्छ असलेला एक माणूस कोट्यवधींच्या या काळ्या धंद्याला बत्ती लावू शकतो. एकविसाव्या शतकातील रौप्य महोत्सवी वर्षाचा आज प्रारंभ झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला असता १९९९ चे २०१४ आणि २०१९ ते २०२२ या काळात महाराष्ट्रातील सत्तेच राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होता. त्याच काळात धनंजय मुंडे मंत्रीही होते. वाल्मिक कराड याच काळात मोठा झाला. बीडमध्ये बड्या इव्हेंटचा सिलसिला आजचा नाही. तो जुना आहे. त्यामागे जे अर्थकारण आहे, ते असे काळवंडलेले आहे. संतोष देशमुख या अर्थकारणाचे बळी आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)