शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला आता ११ वर्ष उलटून गेली. ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर त्यांचे अखेरचे भाषण झाले होते. ‘माझ्या उद्धवला, आदित्यला सांभाळा’ असे भावनिक आवाहन त्यांनी या भाषणात केले होते. २०२३ मध्ये सुद्धा शिउबाठाला त्याच शब्दांचा आधार आहे. बाळासाहेबांनी आवाहन केले होते, तेव्हा उद्धव यांचे वय ५२ होते. वयाच्या ६१ नंतर ज्येष्ठ नागरिकत्वाचा शिक्का मिळतो. उद्धव ठाकरे यांचे वय आता ६३ त्यांना सांभाळायचे म्हणजे नेमके काय हे कोडे अनेकांना उलगडत नाही.
१७ नोव्हेंबर २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आधी त्यांची ठाण्यात सभा झाली होती. याच सभेत त्यांनी ते भावनिक आवाहन केले होते. उद्या शिवतीर्थीवर शिउबाठाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या गीताची सध्या जोरदार चर्चा आहे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे…
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशी गाणी उपयुक्त ठरतात. याच गाण्यात बाळासाहेबांचा तो व्हीडीओही वापरण्यात आला आहे. उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांचे चिरंजीव आदित्य मंत्री झाले. परंतु आपला चेहरा पाहून कार्यकर्त्यांना उभारी मिळेल, असा विश्वास या दोघांमध्ये नाहीच. त्यामुळे आजही त्यांना बाळासाहेबांचा चेहरा वापरावा लागतो आहे. शिवसेनाप्रमुखांनी उद्धवला सांभाळा, असे म्हणणे वेगळे. तेव्हा ते पक्षाचे सर्वेसर्वा होते. आपली क्षमता आणि मुलाची क्षमता यामध्ये असलेली तफावत, हा मुलगा पक्ष कितपत सांभाळू शकेल याबाबतची साशंकता, या आगतिकतेतून त्यांनी हे आवाहन केले असण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा:
फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया पवारांनीच रचला!
देशातील सहा टक्के नागरिक खटल्यांमध्ये गुंतलेले!
भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!
विराट कोहलीच्या ९५ धावांनी युवराज सिंग रोमांचित
परंतु त्यांच्या पश्चात पक्षाचे सर्वाधिकार हाती असलेल्या उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यासाठी बनवलेल्या गाण्यात हा व्हीडीयो वापरणे वेगळे. एखादा बाप माझ्या पश्चात माझ्या मुलाला आणि नातवाला सांभाळून घ्या असे आवाहन, संघटनेला करू शकतो. पक्षाचे नेते म्हणून पक्ष आणि संघटना सांभाळण्याची जबाबदारी उद्धव यांची असताना, ते बाळासाहेबांचा व्हीडीयो दाखवून आम्हालाच सांभाळा असे आवाहन कसे काय करू शकतात?
देशात अनेक राज्यात राजकीय घराणेशाही आहे. केंद्रात अनेक वर्षे गांधी-नेहरु घराण्याची घराणेशाही सुरू आहे. परंतु स्वत:ला सांभाळण्याचे वडिलांनी केलेले भावनिक व्हीडीयो वापरून आपले बळ वापरणारे उद्धव ठाकरे हे एकमेव असावेत. राहुल गांधी अनेकदा वात आणणारी वक्तव्य करतात, आजी आणि वडिलांच्या बलिदानाच्या कथा सांगून सहानुभूती मिळण्याचे आवाहन करतात. राजकारणातील त्यांची परीस्थितीही फारशी चांगली नाही, परंतु त्यांना सांभाळा असा व्हीडिओ करण्याची गळ त्यांनी सोनियांना अजूनपर्यंत घातलेली नाही.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण करणार? हा प्रश्न दरवर्षी पडत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढलेला आहे. यापुढे शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी अर्जही करणार नाही, असे त्यांनी जाहीर केलेले आहे. उद्धवना विनाकारण सहानुभूती मिळवू द्यायची नाही, असा उघड हिशोब या निर्णयामागे असणार. यापूर्वी त्यांनी शिवसेनाभवन, शिवसेनेचा निधी याबाबतही अशीच भूमिका घेतलेली आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या काळातील दसरा मेळावा आणि सध्या होत असलेला दसरा मेळावा यात प्रचंड फरक आहे. एकेकाळी शिवसेनाप्रमुख ज्यांच्यावर तोफा डागत असत, त्यांना कुरवाळण्याचे काम दसरा मेळाव्यात केले जाते. हा मेळावा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलकी टीका करण्याचे व्यासपीठ बनला आहे. एरव्ही पत्रकार परिषद, किंवा सभांमधून जे बोलले जाते त्या पेक्षा वेगळे काही दसरा मेळाव्यात ऐकायला मिळत नाही. सध्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनचे युद्ध पेटलेले आहे. मविआचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी इस्त्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यांचा उल्लेखही न करता पॅलेस्टाईनची तळी उचललेली आहे.
संजय राऊत यांनाही स्वाभाविकपणे तिच भूमिका घ्यावी लागली आहे. अर्थात इस्त्रायलच्या लेखी या अशा भूमिकांना काडीची किंमत नसली तरी महाराष्ट्रातील अल्पसंख्यकांची मतं मिळवण्यासाठी ती सोयीची असल्यामुळे ठाकरेही तीच भूमिका घेतील अशी दाट शक्यता आहे. कधी काळी जिथे शिवसेनाप्रमुखांच्या बुलंद आवाजात हिंदुत्वाची तुतारी फुंकली जात होती, तिथे उद्या अल्पसंख्यकांच्या मतासाठी पॅलेस्टाईनची पिपाणी वाजवली जाईल. अजान स्पर्धांपासून पॅलेस्टाईनपर्यंत अशा भूमिका सातत्याने घेतल्यामुळेच उद्धवना बाळासाहेबांचा भावनिक व्हीडीयो वापरून आपल्याला सांभाळून घेण्याचे आवाहन करावे लागते आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)