राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तिला हार पचवणे जमायला हवे. ज्याला हे झेपत नाही, त्यांनी राजकारणाच्या वाट्याला जाऊ नये. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच स्पिरीट गेली अडीच वर्षे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आता महाविकास आघाडीचा पराभव विसरून नव्या उमेदीने कामाला लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फक्त याला अपवाद ठरत आहेत. माशाचे अश्रू दिसत नाहीत, या शब्दात पुन्हा एखदा त्यांनी आसवं ढाळली आहेत.
जाणत्या पवारांचे वय ८१ वर्षे आहे. गेली सहा दशके ते राजकारणात आहेत. या दरम्यान अनेक उतार चढाव त्यांनी पाहिले. अनेक वर्षे राजकारण करून सुद्धा त्यांना क्वचित साडे- तीन जिल्ह्यांच्या पलिकडे यश मिळाले. त्यांच्या आमदारांचा आकडा कधी ५०- ५५ चा आकडा ओलांडू शकला नाही. तरी राजकीय डावपेचांच्या आधारे ते कायम सत्तेच्या वर्तुळात टिकून राहिले. त्यांच्या सत्ता केंद्रीत राजकारणावर आम्ही अनेकदा सडकून टीका केली. परंतु, राजकारणाची सूत्र इतक्या प्रदीर्घ काळ हातात ठेवण्याची क्षमता लेच्यापेच्या व्यक्तीत असूच शकत नाही. पवारांच्या काही क्षमता आणि गुणांचा आवाका वादातीत आहेत. मौके पे चौका मारण्याचे अफलातून कसब त्यांच्याकडे आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पावसात भिजून ५४ जागा कशाबशा निवडून आणल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या महत्वाकांक्षेचा वास आल्यामुळे योग्य वेळी गळ टाकून पवारांनी ठाकरेंना ताब्यात घेतले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणली. १०५ आमदार असलेल्या पक्षाला सत्तेच्या रिंगणातून भिरकावण्याचे काम त्यांनी केले. कारकिर्दीतील हा अखेरचा डाव ते ताकदीने खेळले. परंतु, अवघ्या अडीच वर्षांत शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी घाऊक फारकत घेतल्यामुळे सत्तेचा हा सारीपाट उधळला गेला. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा पवारांनी अनेकदा केला. परंतु, नेहमी प्रमाणे त्यांची भविष्यवाणी खोटी ठरली. सत्ता गेली. उर्वरित आयुष्यात पवारांना पुन्हा एकदा सत्तेचे दिवस दिसतील याची शक्यता कमीच. परंतु, तरीही पवार कपाळाला हात लावून बसले नाहीत, रडले नाहीत की त्यांच्या चेहऱ्यावर हळहळ दिसली नाही. त्यांचा तो स्वभाव नाही. त्यांनी नवा डाव मांडण्याची तयारी केली असावी.
गेल्या अडीच वर्षातही ते एखाद्या तरुणाला लाजवेल अशा आवेशात दौरे करत होते, सभा घेत होते. पक्षाचे पदाधिकारी, जनता, वरीष्ठ सरकारी अधिकारी यांच्या गाठीभेटी घेत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या गाठीभेटींचे केंद्र असे.
पवार हे वयाने जेष्ठ. तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे त्यांची भेट घ्यायला पवार वर्षा निवासस्थानी किंवा मातोश्रीवर जात असत. उद्धव ठाकरे कधी पवारांना भेटायला गेले, असे चित्र गेल्या अडीच वर्षात तरी महाराष्ट्राने पाहिले नाही. दोन वर्ष कोरोनाने ठिय्या दिलेला असताना फक्त दोनच नेते राज्यभर फिरत होते. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार. पवार यांनी वयाची आठ दशके पूर्ण केली असल्यामुळे त्यांचे कौतूक जास्त.
महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी पवार अखेरच्या क्षणी मैदानात उतरले हे खरे. तुम्ही कुठेही गेलात तरी एक दिवस तुम्हाला मुंबईत यावेच लागेल ना? या शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना दम भरला होता. प्रत्यक्षात सत्ता गमावल्यानंतर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. ‘पक्षातील चाळीस आमदारांना सोबत नेणे ही साधी गोष्ट नाही,’ हे जाहीरपणे सांगण्याचे धाडस तर पवारांनी दाखवलेच, शिवाय एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करतील, अशी अपेक्षा व्यक्त करून मन:पूर्वक शुभेच्छाही दिल्या.
पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे सुद्धा कौतुक केले. संघाच्या संस्कारामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची तयारी दाखवली, अशी स्तुतीसुमने त्यांच्यावर उधळली. पवार शिंदे- फडणवीस जोडीवर खूप खूष असतील अशातला भाग नाही, पण राजकारणात ही परीपक्वता महत्त्वाची असते. सत्तेवर असलेला कधी तरी विरोधी बाकावर येणार, विरोधी बाकावरचा सत्ताधारी होणार. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही याची जाण असणे यालाच परीपक्वता म्हणतात.
सत्ता गेल्यानंतर पवार घरी बसले नाहीत. ते आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या जुळवाजुळवीला लागले आहेत. अलिकडेच विरोधकांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी येऊन पवारांना भेटून गेले. सिन्हा यांच्यासोबत विविध राजकीय विषयांवर चर्चा केल्याचं ट्वीटही पवारांनी केलं.
‘भाजपा- शिवसेना सरकार सत्तेवर आले तरी ते सहा महिन्यांपेक्षा जास्त टीकणार नाही, तेव्हा कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं,’ अशी पुडी सोडून पवार कार्यकर्त्यांना नवा हुरुप देण्याचा प्रयत्न करतायत. अर्थात २०१४ मध्येही नरेंद्र मोदी यांचे सरकार १३ दिवसांत कोसळेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. मोदी आठ वर्षे सत्तेवर आहेत, २०२४ नंतरही तेच येतील याची शक्यता जास्त.
हे चित्र एका बाजूला आणि दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा शेलक्या भाषेत समाचार घेतायत असे चित्र आहे. सत्ता गेल्याची जळजळ व्यक्त करतायत. ठाकरे पिता- पुत्रांचे चेहरे उतरले आहेत. ‘जे काही घडलंय त्याचे मलाही तुमच्या इतकेच वाईट वाटले आहे, परंतु पाण्यातल्या माशाचे अश्रू दिसत नाही,’ या शब्दात उद्धव ठाकरे यांनी कालच शिवसेना भवनात शोक व्यक्त केला. एकेकाळी शिवसेनाप्रमुख आणि त्यांचे शिलेदार जिथे बसून डरकाळ्या फोडायचे तिथे त्यांच्या आसनाच्या बाजूला बसून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना उतरलेल्या चेहऱ्याने माशाच्या अश्रूच्या कथा सांगतायत, हे चित्र केविलवाणे आहे. पवारांच्या चेहऱ्यावर ही शोककळा तसूभरही दिसत नाही किंवा या वयातही पराभव पचवण्याची ताकद त्यांनी गमावलेली नाही.
हे ही वाचा:
द्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त
माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंच्या कार्यायातून रेड सर्व्हर जप्त
डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सन्मान
एके काळी राजेश खन्ना हा बॉलिवूडच्या अनभिशिक्त सम्राट होता. पहिला सुपरस्टार होण्याचा लौकिक त्याने मिळवला. राजेश खन्नाची क्रेझ इतकी जबरदस्त होती की, त्याच्या कारला स्पर्श करायलाही तरुणी तडफडायच्या. पण एका नव्या सुपरस्टारचा उदय होतोय, याचा अंदाज राजेश खन्नाला कधी बांधता आला नाही. अमिताभच्या आगमनामुळे सुपरस्टारपद गमावलेला राजेश खन्ना नंतरच्या काळात खूपच केविलवाणा बनत चालला. त्याला यश पचवता आले नाही, तसे अपयशही पचवता आले नाही. सुपरस्टार पद गेल्यानंतर त्याचा दिमाख गेला आणि रयाही गेली.
राजेश खन्नाचा बाजार उठवून सुपरस्टार बनलेला अमिताभही आज बॉलिवूडच्या शिखरावर नाही. पण तो आजही विकला जातो. त्याच्याकडे कामाची कमी नाही. मिळेल ती भूमिका उत्तमप्रकारे वठवण्याचा त्याचा कल असतो, आज तो नंबर वन नाही, पण त्याची क्रेझ अजून कायम आहे. पवार हे अमिताभ सारखे आहेत. त्यांनी सत्ता गमावली, पण ते थांबले नाहीत, केविलवाणे झाले नाहीत. उद्धव ठाकरे यांचा मात्र राजेश खन्ना झाल्याचे चित्र आज तरी पाहायला मिळते आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)