अलौकीक प्रतिभेसमोर नतमस्तक व्हा…

मेट्रो ठप्प असताना हजारो कोटी एसटी महामंडळासाठी वापरण्याची बुद्धी सुप्रिया सुळेंना का झाली नाही?

अलौकीक प्रतिभेसमोर नतमस्तक व्हा…

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे ज्यांचे पिताश्री शरदचंद्र पवार यांच्या कारकीर्दीत लवासा आणि आयपीएल असे भव्य दिव्य प्रकल्प राबवण्यात आले. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या कल्पनांची भरारी भव्य दिव्य असणे स्वाभाविकच आहे. १० एकरात शंभर कोटींच्या वांग्यांची लागवड ज्यांनी शक्य करून दाखवली, त्यांच्या प्रतिभेसमोर साष्टांग नमस्कार घालण्या वाचून पर्याय तरी कोणता उरतो? ‘मी जर महायुतीच्या सत्ताधाऱ्यांच्या जागी असते तर मेट्रोवर हजारो कोटी रुपये खर्च केले नसते’, असा उत्तुंग षटकार संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मारला आहे.

जगरहाटी अशी आहे की कर्त्तृत्ववान वडीलांचा मुलगा किंवा मुलगी कर्तृत्ववान निपजेलच याची हमी नाही. जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याने याच कारणासाठी लग्न केले नव्हते. अशी अनेक उदाहरणे आपल्याही आजूबाजूला दिसत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात याला दोन मोठ अपवाद आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे. वडिलांपेक्षा चार पावले पुढे असेलेले हे दोघे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली दोन रत्नच. वक्तृत्व असो, कर्तृत्त्व, राजकारण असो वा अन्य काही. दोघेही बापसे बेटा-बेटी सवाई.

सुप्रिया सुळे यांच्या डोक्यात तर एकेक भन्नाट कल्पना येत असतात. बहुधा संकष्टीच्या दिवशी मटण खाल्ल्याचा परिणाम असावा. बाई बारामतीच्या खासदार आहेत. शरद पवार इथूनच लोकसभेत जायचे, परंतु सुप्रिया सुळे यांच्यामुळे बारामतीचे नाव जगभरात पोहोचवले. काम एवढे मोठे की बाईंनी एकदा नाही, दोनदा संसद रत्न पुरस्कार मिळाला. त्यांची विधाने इतकी जबरदस्त असतात की प्रत्येक विधान लिहून ठेवावे. विधानांची ही वही पुढच्या अनेक पिढ्यांना सुविचार म्हणून कामी येऊ शकते.

संसदरत्न हा संसदेच्या वतीने किंवा भारत सरकारच्या वतीने देण्यात येतो असे कोणालाही वाटू शकेल. परंतु फारसे माहीत नसलेली चेन्नईतील एक बडी खासगी संस्था आणि ई मॅगझिनतर्फे हा पुरस्कार दिला जातो. असा जबरदस्त लौकीक असलेल्या बाईंनी पुणे मेट्रोबाबत अलौकीक उद्गार काढले आहेत. असे उद्गार की परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची कल्पना शक्ती थिटी वाटावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कर्तृत्व छोटे वाटावे. ‘मी जर त्यांच्या जागी असते तर मेट्रोवर हजारो रुपये खर्च केलेच नसते. त्या ऐवजी हा पैसा एसटी, पीएमटीवर खर्च केले असते नंतर मेट्रोवर खर्च केले असते.’

आपले हे विधान सर्वसामान्यांना पटणार नाही, हेही त्यांना ठाऊक होते. सामान्य बुद्धिमत्ता आणि बकुबाच्या लोकांनाही आपण काय म्हणतो ते लक्षात यावे म्हणून त्यांनी काय झकास उदाहरण दिले पाहा. रोटी, सब्जी, दाल आधी की मोदक आधी? इथे सुप्रिया सुळे यांनी गोडधोडासाठी फिरनी, बकलावा, शाही टुकडा, शाही फालूदाचे उदाहरण न देता मोदकाचा उल्लेख. ही मोठ्या आणि धुरंधर नेत्याची लक्षणे आहेत. जनतेला कळेल असे बोलायचे. कळत नसेल तर
समजावून सांगायचे.

राज्यात मविआची सत्ता असताना उद्धव ठाकरे यांचे बुलंद नेतृत्व आणि शरद पवारांचे तज्ज्ञ मार्गदर्शन असल्यामुळे बहुधा सुप्रिया सुळे दिल्लीतील घडामोडींकडे लक्ष ठेवून असाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळप्रसंगी न विचारता सल्ला देण्याची जबाबदारीही त्यांनी खांद्यावर घेतली होती. त्यामुळे बहुधा राज्यात काय घडते आहे याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळाला नसावा. त्यांचा दिल्लीतला फोकस ढळू नये म्हणून बहुधा त्यांच्या पिताश्रींनी सुद्धा त्यांना सांगितले नसावे की, बरेच महिने एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. संप सुरू होता. या संप बंद झालेले वेतन आणि भत्त्यांच्या मागणीसाठी होते. अनेक महिने चालले होते. त्यात अनेकांनी आपले जीवन संपवले. अनेकांच्या डोक्यावरचे छत्र हरपले.

हे ही वाचा:

बांगलादेशी पॉर्नस्टार उल्हासनगरात, पोलिसांकडून अटक

आसाम आयईडी प्रकरण: एनआयएकडून उल्फा (आय) च्या कार्यकर्त्याला अटक

“महिलेला कुणी जाणीवपूर्वक पाठविले असेल तर पाहून घेऊ”

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?, समितीचा अहवाल आला समोर!

त्यावेळी ठाकरे आणि त्यांच्या चिरंजीवांच्या कर्तृत्वामुळे मेट्रोचे कामही ठप्प होते. हे काम ठप्प असल्यामुळे वाचलेले हजारो कोटी एसटी महामंडळासाठी वापरण्याची बुद्धी सरकारला का झाली नाही कोण जाणे? बहुधा सत्ताधाऱ्यांची बुद्धी शेण खायला गेली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना एसटी, पीएमटीसाठी पैसे भरभरून पैसे वापरा असा सल्ला देता आला नसावा. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की असा अलौकीक मेंदू फक्त सत्ता नसताना अशा भन्नाट कल्पना प्रसवतो. सत्तेत असताना फक्त टोलवाटोलवी सुचते. सुप्रिया सुळे वाट्टेल ते बोलतात, एकदा एक एकदा एक बोलतात. आज एक बोलतील उद्या भलतंच, असा काही लोकांचा आक्षेप असू शकेल. असा संकुचित विचार फक्त सामान्य आणि कद्रु मनाचे लोकच करू शकतात. अलौकीक प्रतिभा लक्षात यायला त्याच उंचीची बुद्धीमत्ता हवी, त्यामुळे सुळेबाईंच्या सल्ल्याची, त्यांच्या विधानांची किंमत सर्वसमान्य माणसं करूच शकत नाहीत.

त्यामुळेच कदाचित आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं हा विचार करू शकतील की बरे झाले या बाई आणि त्यांचा पक्ष आज महाराष्ट्राच्या सत्तेवर नाहीत. नाही तर पुन्हा एकदा मेट्रोसारखे प्रकल्प ठप्प झाले असते, एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या. अर्थात चमकदार बुद्धीमत्ता पेलवत नसल्यामुळे असा विचार शक्य आहे. बाकी सुळे बाईंच्या विचारशक्तीला तोड नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version