प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळावर भाजपाचा मुकाबला करणार असे जाहीर केले. इंडी आघाडीचा बाजार उठल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मात्र आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले. आमच्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीत, असे स्पष्ट केले. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. काही ठिकाणी आघाडी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते असे सांगितले. सुळे यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातही आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इंडी आघाडीची जेव्हा जुळवाजुळव सुरू झाली तेव्हापासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. प.बंगालमध्ये काँग्रेसची ताकद उरलेली नाही, असा तृणमूलच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे प.बंगालच्या एकूण ४२ जागांपैकी दोन जागा तृणमूलने डावे पक्ष आणि काँग्रेसला देऊ केल्या. म्हणजे प्रत्येकी एक जागा. तेव्हाच प.बंगालमध्ये इंडी आघाडीची मृत्यू घंटा वाजणार हे निश्चित होते. अपेक्षे प्रमाणे आज हा सोक्षमोक्ष लागला. ममता बॅनर्जी यांनी स्वबळाची हाळी दिली. दिलेला प्रस्ताव काँग्रेसने फेटाळल्यामुळे बोलणी फिस्कटली असा दावा तृणमूलचे नेते करतायत. आघाडीत फूट पडल्याचा ठपका ते काँग्रेसवर ठेवतायत. परंतु स्वबळावर लढणार असलो तरी आपण इंडी आघाडीत आहोत असे ममता यांनी स्पष्ट केले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या निर्णयापेक्षा सुप्रिया सुळे यांनी त्यांचे केलेले समर्थन काँग्रेसला जास्त टोचण्याची शक्यता आहे. इंडी आघाडीत लोकशाही असल्यामुळे काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात असे संकेत त्यांनी दिलेले आहेत.
मुळात मैत्रीपूर्ण लढत या शब्द म्हणजे निव्वळ चकवा आहे. लढताना मैत्री कशी काय होऊ शकते? मैत्री आणि लढत हे दोन्ही शब्द परस्पर विरोधी. हा शब्द फक्त शरद पवार किंवा त्यांच्या कन्येच्या शब्द कोषात असू शकतो. मैत्रीपूर्ण लढत म्हणजे एका हाताने आलिंगन देताना दुसऱ्या हाताने पाठीत खंजीर खुपसणे. महाराष्ट्रात भाजपाची २५ वर्षे युती होती परंतु लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत कधीही मैत्रीपूर्ण लढत झाली नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत हा इंडी आघाडीचा यूएसपी ठरू शकतो.
मुळात इंडी आघाडी कधी अस्तित्वातच नव्हती. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यात आम आदमी पार्टीने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये ताकदीने निवडणूक लढवली होती. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेससोबत युती व्हावी अशी विनंती सपाचे अखिलेश यादव यांनी केली होती. परंतु काँग्रेसने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. याचा अर्थ एवढाच की इंडी आघाडी नावाची चीज आधीही अस्तित्वात नव्हती. जे काही चर्वितचर्वण होत होते ते मीडियातील ब्रेकींग न्यूज पुरते. मध्यप्रदेशात जे काँग्रेसने अखिलेश यांच्यासोबत केले तेच आज ममता बॅनर्जी प.बंगालमध्ये काँग्रेससोबत करतायत. त्यांनी स्बळाचा नारा दिला आहे.
हे ही वाचा:
‘इंडी’ आघाडी फुटली, लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा ‘एकला चलोचा नारा’!
राहुल गांधींना सुरक्षा द्या, खर्गेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र!
‘राम मंदिर उद्घाटन माझ्यासाठी अध्यात्मिकता; राजकारण नव्हे’
ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या शहाजहान शेखच्या घराचे कुलूप तोडले
प.बंगालमध्ये आणखी एक तिढा होता. काँग्रेसने जर तृणमूलसोबत आघाडी केली तर आम्ही इंडी आघाडीतून बाहेर पडू असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पत्रकच काढले होते. त्यामुळे काँग्रेसचे दोन्ही बाजूने मरण होते. प.बंगालमध्ये तृणमूल आणि काँग्रेसमध्ये वैर इतके जबरदस्त आहे की ईडीच्या कारवाईच्या मुद्द्यावर देशभरात भाजपाचा विरोध करणारे काँग्रेसचे नेते प.बंगालमध्ये मात्र तृणमूलच्या नेत्यांवर झालेल्या कारवाईचे समर्थन करतायत. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेसबाबत हीच भूमिका घेतली आहे. काँग्रेससोबत लढायचे नाही असे त्यांनी जाहीर केले आहे. पंजाबचे काँग्रेस नेतेही याच भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे हाणामाऱ्या तिथेही आहेत.
त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या दाव्यानुसार ठिकठिकाणी अशा मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. महाराष्ट्रातही हेच चित्र दिसण्याची शक्यता आहे. जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी विश्वप्रवक्ते संजय राऊत तीन दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. उबाठा गटाचे नेते कितीही दावा करत असले तरी दिल्लीश्वर काँग्रेस नेते त्यांच्या कटोऱ्यात जे टाकतील ते त्यांना आनंदाने स्वीकारावे लागले. महाराष्ट्रात मविआतील दोन पक्ष फुटले आहेत. न फुटलेला एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस. लोकसभा निवडणुकीच्या आधी जर काँग्रेस पक्ष फूट टाळण्यात यशस्वी झाला तर जागा वाटपाच्या चर्चेवर काँग्रेसचे प्राबल्य असण्याची शक्यता अधिक आहे.
महाराष्ट्र हे एकमेव मोठे राज्य आहे जिथे काँग्रेस काही घासाघीस करण्याच्या क्षमतेत दिसते. बाकी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये त्यांची डाळ शिजण्याची कोणतीही चिन्ह नाहीत. काँग्रेसने फेकलेला जागांचा तुकडा जर उबाठा गट आणि शिल्लक राष्ट्रवादीने निमुटपणे उचलला तर ठीक, नाही तर महाराष्ट्रात मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. सुप्रिया सुळे यांनी तसे संकेत दिले आहेत. अनेक जागांवर रस्सीखेच सुरू आहे. भिवंडी, ईशान्य मुंबई, अमरावती, रायगड अशा अनेक लोकसभेच्या जागांसाठी मविआमध्ये मारामाऱ्या सुरू आहेत.
२२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात जो माहोल होता, तो पाहिल्यानंतर इंडी आघाडीतील फटी आणखी रुंदावण्याची शक्यता आहे. कारण आघाड्यांची समीकरणे जिंकण्यासाठी जुळवली जातात. परंतु आघाडी करून जिंकण्याची शक्यता उरत नसेल तर कोण कशाला झुकते आणि नमते घेण्याच्या कसरती करेल? अशा परीस्थिती सुप्रिया सुळे यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा महामंत्र दिला आहे. इंडी आघाडीतील पक्ष येत्या काळात या मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एकमेकांना रक्तबंबाळ करण्याची शक्यता जास्त आहे. सुप्रिया सुळे यांनी ममतांचे निमित्त करून याचे संकेत दिले आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)