घटना थोडी जुनी आहे. जुनी अशासाठी की महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडीच वर्षांच्या काळात जे काही झालं ते अजिबातच आठवत नाही. एखाद्या अपघातात जुन्या स्मृती नष्ट व्हाव्यात, घटनांचे विस्मरण व्हावे असे त्यांचे झाले आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महीलांबाबत काढलेल्या तथाकथित अपशब्दांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून ज्या प्रतिक्रीया येतात निदान त्यावरून तरी तसे दिसते आहे.
२०१९ ची घटना आहे. एक महिला जिला एका महाविकास आघाडीच्या नेत्याकडून सतत धमक्या येत होत्या, वारंवार फोन कॉल करून तिचा छळ होत होता, ती महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बलार्ड पिअर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भेटायला गेल्या. आपली कैफीयत त्यांच्यासमोर मांडली. तो माणूस माझ्या जीवाचे काही बरे वाईट करेल, ही शक्यताही बोलून दाखवली. सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण प्रकरणावर थंड प्रतिसाद दिला. ‘ठिक आहे, मी बघते आणि तुम्हाला सांगते’, असे सांगून ही भेट संपवली. त्यानंतर पुन्हा त्या महिलेला पुन्हा कधीही सुप्रिया सुळे यांची भेट मिळाली नाही. त्या महिलेला न्याय मिळाला नाही, खासदारावर कारवाई झाली नाही, कारण स्पष्ट होते तो खासदार शिवसेनेचा नेता होता. महिलेचे नाव डॉ.स्वप्ना पाटकर आणि तो नेता म्हणजे संजय राऊत.
सुप्रिया सुळे यांना सत्तार प्रकरणानंतर महाराष्ट्राची परंपरा आठवली. असं बोलणं, वागणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या व्यक्तिंकडून अशी वक्तव्य अपेक्षित नसतात, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. सत्तार जे काही बोलले त्यावर आपण काही बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले. इथे खरे तर सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकरणावर मौन राहण्याची परंपरा जपली. कंगणा रनौट, नवनीत राणा, केतकी चितळे आणि डॉ.पाटकर प्रकरणात त्यांनी जे काही केले तेच त्यांनी सत्तार प्रकरणात केले.
राजकारणात या मानभावीपणाचा सुळसुळाट आहे. पण एका महिलेने किमान दुसऱ्या महिलेबाबत मानभावीपणा दाखवू नये अशी अपेक्षा असते. पण सुप्रिया सुळे यांनी तेवढेही सौजन्य दाखवलेले नाही. सत्तार फक्त बोलले त्याच्यामुळे इतके वादळ निर्माण झाले. सत्तार यांनी तर माफीही मागितली, परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेच्या नशेत किती महिलांच्या आयुष्याची राखरांगोळी केली, त्यांची माफी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते ज्यांच्यात सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे, ते कधी मागणार?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुंपणाने शेत खाल्याची उदाहरणे अनेक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी आवाज उठवला होता. धनंजय मुंडे यांचे करुणा मुंडे यांची सख्खी बहीण रेणू शर्मा यांच्याशी चाळे सुरू होते. याप्रकरणी रेणू हीने पोलिस ठाण्यात धनंजय यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवल्यानंतर शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम नेत्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. सगळी सरकारी यंत्रणा मागे लागली. ज्याच्याविरोधात तक्रार त्याची साधी चौकशी नाही, तक्रार करणाऱ्या महिलेला सहा तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. अखेर रेणू शर्मा यांना तक्रार मागे घेणे भाग पडले. आज त्या कुठे आहेत याचा कोणालाच पत्ता नाही.
कुरुणा मुंडे यांच्या आईने धनंजय मुंडे यांच्याकडून आपल्या धाकट्या मुलीचे शोषण होत असल्याचा धसका घेऊन १५ डिसेंबर २००८ रोजी आत्महत्या केल्याचा आरोप स्व:ता करुणा मुंडे यांनी केला आहे. ही सगळी प्रकरणे महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेली. ही अशी प्रकरणे आहेत, ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी आणि राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेतृत्वाशी घसीट असलेल्या नेत्याशी संबंध आहे. ही प्रकरणे घडत होती, तेव्हा शरद पवार यांनी रेणू शर्मा यांच्या चारीत्र्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती. रेणू शर्माने इतरांनाही त्रास देण्यासाठी अशा तक्रारी केल्याचे समोर आले आहे, असा दावा करत धनंजय मुंडे यांना क्लीनचीट दिली होती. या दोन्ही प्रकरणात अपशब्द वापरण्याच्या पलिकडे बरेच काही झाले होते. स्वप्ना पाटकर यांना धमक्या येत होत्या, शिवीगाळ होत होती. याबाबत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत दाद मागितली. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.
तेच उद्धव ठाकरे सरकार गमावल्यानंतर महिलांबाबत इतके संवेदनशील झाले की अयोध्या पोळ नावाच्या कार्यकर्तीला धमक्या येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तिच्याशी संवाद साधला. काहीही झाले तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत अशी हमीही दिली. या दोघांनी एकमेकांशी फोनवर केलेला संवाद कसा कोण जाणे रेकॉर्ड झाला आणि समाज माध्यमांवर व्हायरलही झाला. तेच उद्धव ठाकरे राऊत प्रकरणात स्वप्ना पाटकर यांना भेट द्यायलाही तयार नव्हते. अब्दुल सत्तार प्रकरणातही म्हणे ते आक्रमक झालेत. स्वत:चे सरकार असताना महिलांवर अत्याचार करणाऱ्या पक्षांचे नेते आता इतके संवेदनशील कसे झाले? आक्रमक कसे झाले?
हे ही वाचा:
लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण?
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली नव्या सरन्यायाधीश पदाची शपथ
‘खोक्या’बद्दल लवकरच सुप्रिया सुळेंना नोटीस देण्याची तयारी
दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
मनसुख हिरेनची हत्या झाल्यानंतर त्याच्या पत्नीबाबत उद्धव ठाकरेंना कळवळा का वाटला नाही. तिला दिलासा देण्याचा प्रयत्न तेव्हा महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्याने केला? त्यात सुप्रिया सुळेही नव्हत्या. मग आता अचानक
त्यांना महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याची उपरती कशी झाली, असे अनेक प्रश्न
लोकांना पडले आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)