स्वामी, सलाहउद्दीन राहुल गांधी यांचा बाजार उठवणार ? इतिहासाची पुनरावृत्ती होणार…

स्वामी राहुल गांधी यांच्याबाबत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करणार

स्वामी, सलाहउद्दीन राहुल गांधी यांचा बाजार उठवणार ? इतिहासाची पुनरावृत्ती होणार…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ग्रह सध्या वक्री दिसतात. एका बाजूला सलाहउद्दीन शोएब चौधरी हा पत्रकार त्यांचे समाज माध्यमांवरून वस्त्रहरण करीत आहे. दुसऱ्या बाजूला राहुल हे ब्रिटीश नागरीक आहेत, असा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. आरोप फक्त राहुल गांधी यांच्यावर नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही त्यांनी आरोप केलेला आहे. गृहमंत्रालयाकडे माहिती मागून सुद्धा याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा स्वामी यांनी केलेला आहे. त्यामुळे स्वामी यांचे लक्ष्य राहुल गांधी आहेत, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेच स्पष्ट होत नाही. स्वामी हे जायंट किलर मानले जातात. ते आता राहुल यांच्या मागे लागलेले आहेत. जे त्यांनी भूतकाळात सोनिया गांधीबाबत केले होते. राहुल गांधी यांना त्याच मार्गावरून जावे लागणार असे चित्र सध्या तरी दिसते आहे.

ब्लीट्झचे संपादक असलेले सहालउद्दीन शोएब चौधरी यांचे ट्वीट्स सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालतायत. राहुल गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत त्यांनी अनेक खुलासे केलेले आहे. राहुलबाबा हे अविवाहित नसल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. त्यांची प्रेम प्रकरणे, भारतीयांना माहीत नसलेली त्यांची पत्नी, मुलं. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रेम प्रकरणं, अशा अनेक बाबतीत, त्यांनी लिहिले आहे. बांगलादेशात जे काही घडले त्यात राहुल यांचा हात असल्याच्या दाव्या व्यतिरिक्त यात देशाने लक्ष घालावे असे फार काही नाही. बांगलादेशातील उठावापूर्वी राहुल गांधी हे खालिदा झिया यांच्या चिरंजीवांना भेटले होते, असा दावा चौधरी यांनी केलेला आहे.

नेहरु-गांधी कुटुंबाबाबत अनेक गूढ चर्चा समाज माध्यमांवर होत असतात. काही खऱ्या, काही खोट्या. त्यामध्ये नेहरु, इंदीरा, सोनिया, राहुल यांची प्रेम प्रकरणे आहेत, काही लफडी आहेत, काही भानगडी आहेत. त्यातल्या अनेक बाबी हॉर्सेस माऊथमधून आलेल्या आहेत. अर्थात ही प्रकरणे अगदी पुराव्यासह सिद्ध झाली तरी त्यामुळे भारताच्या राजकारणात काही विशेष परिणाम होण्याची शक्यता नाही. आंबट चर्चेच्या पलिकडे त्याला फारसे महत्व नाही. परंतु सुब्रमण्यम स्वामी यांनी जे काही ब्रह्मास्त्र काढले आहे, ते मात्र राहुल गांधी यांच्य खासगी आयुष्याबाबत नसून राजकीय कारकीर्दीशी संबंधित आहे. ज्यांना स्वामींचा ट्रॅक रेकॉर्ड माहीत आहे, त्यांना आता राहुल गांधी यांची काळजी वाटू लागली आहे.

हे ही वाचा:

पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शाळेमध्येच मुली सुरक्षित नसतील तर, शिक्षण अधिकाराचा उपयोग काय?

दिल्ली पोलिसांना मोठे यश; ‘अल कायदा प्रेरित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश’

एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब? धमकीनंतर प्रवाशांना उतरवले !

जुलै महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयात एस.विघ्नेश शिरीष यांनी राहुल गांधी यांच्या ब्रिटीश नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका फेटाळली होती. राहुल गांधी बालबाल बचावले होते. परंतु दिल्ली उच्च न्यायालयात मात्र ते तेवढे भाग्यशाली ठरले नाहीत. कारण याचिकादार सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखा वजनदार माणूस आहे. स्वामी खटला दाखल करतात आणि तो स्वत:च लढवतात. युक्तिवाद करतात.

पाच वर्षांपूर्वी आपण राहुल गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती. परंतु गेली पाच वर्षे याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. गृहमंत्रालयाने याप्रकरणी कोणती कारवाई केली याबाबत अहवाल मागवावा आणि करण्याचे आदेश करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती स्वामी यांनी या याचिकेद्वारे केलेली आहे. राहुल गांधी यांनी भारतीय नागरिकत्व कायद्याचे उल्लंघन केले असल्यामुळे त्यांचे नागरिकत्व रद्द होऊ शकते.

स्वामींनी जे प्रकरण काढलंय ते वाऱ्यावरची वरात नाही. आपल्याकडे राहुल गांधी यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नची कागदपत्रे आहेत, असे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केलेले आहे. सबळ पुरावे आणि जबरदस्त युक्तिवाद हीच स्वामी यांची बलस्थाने आहेत. याच बलस्थानांच्या आधारावर भ्रष्टाचार प्रकरणात जनहीत याचिका दाखल करून बड्या बड्या राजकीय पुढाऱ्यांची स्वामी यांनी विकेट काढली आहे. ज्यांच्या विरोधात स्वामींनी जनहीत याचिका दाखल केल्या, त्यांना तुरुंगात किंवा तुरुंगाच्या दारापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. स्वामींचा दरारा मोठा आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी, एअरसेल मॅक्सेस भ्रष्टाचार प्रकरणात पी. चिदंबरम, 2-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात ए.राजा यांच्या विरोधात, आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्थि चिदंबरम यांच्या विरोधात त्यांनी जनहित याचिका दाखल केल्या. त्यांचा सक्सेस रेट जबरदस्त आहे.

२००३ साली राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये बॅकॉप्स नावाच्या कंपनीची नोंदणी केली. ते या कंपनीत डायरेक्टर होते. नागरिकत्वाच्या कॉलममध्ये त्यांनी ब्रिटीश असल्याची माहिती दिली होती. २००९ मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली. ही सगळी माहिती कागदोपत्री उपलब्ध असल्याचा स्वामी यांचा दावा आहे. राहुल गांधी हे सध्या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. ते ब्रिटीश नागरीक होते हे सिद्ध झाले तर त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. अर्थातच त्यांचे विरोधी पक्षनेते पदही राहणार नाही. त्यामुळे स्वामी यांची ही याचिका त्यांचे राजकीय अस्तित्व संपवू शकते.

स्वामी यांच्यामुळेच सोनिया गांधी यांचे पंतप्रधान पद हुकले होते. २००४ मध्ये यूपीएला बहुमत मिळाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती सोनिया गांधी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण केले होते. दरम्यान स्वामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून भेट मागितली. जन्माने विदेशी असलेल्या सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत काही मुलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. या दोन्ही कारणांमुळे सोनियांना पंतप्रधान बनवता येत नाही, असे त्यांनी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे सोनिया गांधी यांचे पंतप्रधान पद हुकले आणि डॉ.मनमोहन सिंह यांचे भाग्य फळफळले. स्वामी राहुल गांधी यांच्याबाबत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version