पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार पवार होते, आता सूत्रधार वेगळा असेल….

अजितदादांच्या भाजपा प्रवेशावर शरद पवार त्वरीत बोलते झाले. त्यामुळे याबाबतचा संशय अधिकच गडद झाला आहे.

पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार पवार होते, आता सूत्रधार वेगळा असेल….

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा जोरात सुरू आहे.  अजितदादांना वारंवार खुलासे करावे लागतायत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही याबाबत खुलासा केलेला आहे. कोणत्याही मोठ्या राजकीय निर्णयासाठी कार्यकारण भाव लागतोच, मनमानी पद्धतीने निर्णय होत नाहीत. गरज किंवा फायद्याची गणिते या आधारावरच या खेळी खेळल्या जातात. अजितदादा आणि भाजपाला एकमेकांची गरज आहे का, हे गणित त्यांच्यासाठी फायद्याचे आहे का, हे कळीचे मुद्दे आहेत.

एखाद्या मातबर नेत्याबाबत अशा प्रकारच्या वावड्या उगाचच उठत नाहीत. एका इंग्रजी दैनिकाने या संदर्भात बातमी दिली होती.  अजित पवार भाजपासोबत जातायत, त्यांच्याकडे ४० आमदारांच्या सहीचे पत्र तयार आहे, असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही बातमी खोटी आहे, असा खुलासा केला. पवार इतक्या तातडीने कोणत्याही मुद्द्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. परंतु अजितदादांच्या भाजपा प्रवेशावर मात्र ते त्वरीत बोलते झाले. त्यामुळे याबाबतचा संशय अधिकच गडद झाला आहे.

भाजपा सोबत जाण्यासाठी माझ्या कुटुंबियांवर दबाव आहे, असे पवार म्हणाल्याचा दावा यापूर्वी शिउबाठाच्या काही नेत्यांनी केला आहे. आज अजित पवार यांच्या ट्वीटर प्रोफाईलच्या वॉलवरून पक्षाचे नाव, चिन्ह आणि सगळे फोटो गायब झाल्यामुळे अजित पवार पक्ष सोडणार या चर्चेला पुन्हा जोर आला. अजित पवार यांनी कॅमेरासमोर येऊन या बातमीचे खंडन केले. खुलाशाचे हे लोण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांपर्यंत गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. दादा कुठेही जात नाहीत, अशी ग्वाही दिली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा जपान दौरा अर्धवट सोडून परतल्यामुळे संशयाचे धुके अधिकच गडद झालेले आहे.

अलिकडेच अजितदादा अचानक ताफा सोडून गायब झाले होते. त्यांचा फोनही काही तास स्वीच ऑफ होता. काही तासांनंतर अवतरलेल्या अजितदादांनी आपल्याला पित्ताचा त्रास होत असल्यामुळे काही काळ आपण मोबाईल बंद ठेवला होता, असा खुलासा केला होता. अजितदादांचे पित्त हल्ली वारंवार चाळवते आहे, त्यामुळे त्यांची चीडचीडही वाढली आहे. आणि त्यांचे खुलासे थांबताना दिसत नाही. हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर अजित पवारांबाबत होणारी चर्चा अगदीच बिनबुडाची वाटत नाही.

हे ही वाचा:

महाराष्ट्राला हे भूषण आहे का?

अतिक अहमदची बेहिशोबी मालमत्ता, ११,६८४ करोडच्या घरात !

लंडनच्या खलिस्तानी समर्थकांविरोधात एनआयए करणार चौकशी

चापेकरांच्या प्रखर राष्ट्रभक्ती आणि शौर्याचे स्मरण

भाजपा आणि शिवसेना यांचे संख्याबळ पाहाता सध्याचा आकडा राज्य सरकारच्या स्थैर्यासाठी पुरेसा आहे. १६ आमदारांच्या निलंबनाच्या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कोणत्याही क्षणी अपेक्षित आहे. याप्रकरणी निर्णय जर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेला तर अजित पवार हा भाजपाचा प्लान बी आहे, अशी एक चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयातील याप्रकरणाची सुनावणी होत असताना करण्यात आलेल्या तर्कांवर नजर टाकली तर निकाल एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जाण्याची शक्यता कमी वाटते. दुसरा मुद्दा लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. भाजपाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातून लोकसभेचे ४८ खासदार निवडून जातात. हा आकडा गाठण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट किंवा संपूर्ण पक्ष सोबत आणण्याची गरज भाजपा नेतृत्वाला वाटते आहे, असा दुसरा तर्क दिला जातो आहे.

महाविकास आघाडी हे बुडते तारू आहे. अजितदादांनी भाजपामध्ये जाणार नाही हा खुलासा करताना शिउबाठाची बिनपाण्याने हजामत केली आहे. तुमच्या मुखपत्रात तुमची बाजू मांडा आमचे प्रवक्ते बनण्याची गरज नाही, असे त्यांनी नाव न घेता सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना सुनावले आहे.

पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्या अनुमतीने झाला होता. तेव्हा राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी या शपथविधीचा वापर करून थोरल्या पवारांनी भाजपा आणि अजितदादा या दोघांना तोंडावर पाडले होते. त्यामुळे दादा आता थोरल्या पवारांच्या कलाने पुन्हा एकदा उखळीत डोकं घालण्याची चूक करणार नाहीत. ते ताकही फुंकून पितील. तेव्हा संगनमताने ही खेळी होत असेल अशी शक्यता कमी दिसते. पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार थोरले पवार होते. परंतु यावेळी मात्र सूत्र त्यांच्याकडे असण्याची शक्यता कमी आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना दोनदा खिंडीत गाठणे सोपे नाही. यावेळी खेळाचा सूत्रधार वेगळा आहे. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहातो आहे. कुठे तरी आग लागल्याशिवाय धूर येत नाही. तुर्तास फक्त धूर दिसतो आहे, आग कोण लावतोय, ती कुठे लागली आहे, याचा खुलासा लवकरच होईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version