26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरसंपादकीयराज्यातील वातावरण स्फोटक की पोळी शेकण्यासाठी उपयुक्त?

राज्यातील वातावरण स्फोटक की पोळी शेकण्यासाठी उपयुक्त?

परिस्थिती कितीही स्फोटक असो आपली पोळी शेकण्याचे कसब महाराष्ट्रातील काही राजकारण्यांना लाभलेले आहे.

Google News Follow

Related

ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात स्फोटक वातावरण आहे. ‘राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हीच हे वातावरण शांत करू शकता’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केले आहे.

भुजबळ आज सिल्व्हर ओकवर शरद पवारांना भेटले. तिथे त्यांनी पवारांशी सविस्तर चर्चा केली. ते अगदी योग्य व्यक्तिला भेटले आहेत. गेल्या काही महिन्यातील घडामोडी पाहाता शरद पवार हेच महाराष्ट्रात पेटलेला वणवा शांत करू शकतात हा भुजबळ यांचा अंदाज अगदी शंभर टक्के योग्य आहे. आश्चर्य म्हणजे आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकी संदर्भात रविवारी भुजबळांनी पवारांचे नाव न घेता एक खळबळजनक विधान केले होते.

 

शरद पवार आणि भुजबळ यांचे गेल्या काही महिन्यातील नाते पाहिले तर तुझे माझे जुळत नाही, तुझ्या वाचून करमत नाही, असे काहीसे झालेले आहे. काल पवारांच्या विरोधात छगन भुजबळ यांनी विधान केले, आरोप केला म्हणा हवं तर आणि आज त्यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. दोहोंचा नक्कीच संबंध आहे. परंतु हा संबंध स्पष्ट करण्यापूर्वी महाराष्ट्रात वातावरण स्फोटक आहे, या भुजबळ यांच्या विधानाचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

हे ही वाचा:

महिलांना मोफत बस प्रवास देणाऱ्या कॉंग्रेसच्या शक्ती योजनेमुळे कर्नाटक परिवहन बुडाली

पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा, नाव बदलून यूपीएससीची दिले दोन अटेंम्प्ट !

वजन कमी करण्यासाठी डबाच न खाण्याचा केजरीवाल फॉर्म्युला

चीन समर्थक केपी ओली पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी !

 

मराठा आणि ओबीसी समाजाचे नेते एकमेकांच्या उरावर बसल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य लोकांमध्येही मोठा तणाव निर्माण झालेला दिसतो. भुजबळ सांगतात, काही लोक मराठा समाजाच्या दुकानात जात नाहीत, मराठा समाजतील लोकही ओबीसींशी असेच वागतायत. भुजबळ यांनी सांगितले, ते तंतोतंत खरे आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या बाजूने मतदान करणाऱ्या मराठा आमदारांनाही पाडा, असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. ओबीसी नेत्यांच्या बाबत जरांगेंच्या मनात असलेली मळमळ त्यांनी लपवून ठेवलेली नाही. ते जाहीरपणे ती बाहेर काढत असतात. मुस्लिमांच्या गळ्यात गळे घालणारे जरांगे ओबीसींना मात्र पाण्यात पाहतायत.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळीही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पवारांनी हा वाद शांत केल्याचा दावा भुजबळ यांनी केलेला आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून आता मराठा-ओबीसीतील वाद शरद पवारांनीच पुढाकार घेऊन संपवावा, असे आवाहन भुजबळ यांनी केलेले आहे. पवार महाराष्ट्र शांत करू शकतात हे भुजबळ सांगत असले तरी त्याचा संदर्भ वेगळा आहे.

याच भुजबळांनी काल रविवारी एक महत्वाचे विधान केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला पवारांनीच सुरूंग लावला, असा भुजबळांच्या विधानाचा अर्थ होता. सर्वपक्षीय बैठकीला येण्यासाठी मी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलणे केले होते. शरद पवार यांनीही बैठकीला बोलवा असे मी आव्हाडांना सांगितले होते. बैठकीला येणार असे सगळ्यांनी मला सांगितले होते, परंतु अचानक बारामतीतून संध्याकाळी पाच वाजता एक फोन आला आणि सगळ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली.

बारामतीतून अजित पवार फोन करणे शक्य नव्हते. कारण ते सरकारचा एक भाग आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करून विजय वडेट्टीवार, आव्हाड बैठक टाळतील, अशी शक्यता नाही. त्यामुळे शरद पवारांनीच फोन केला हे उघड आहे. भुजबळांनी नाव न घेता पवारांवर निशाणा साधला. तेच भुजबळ पवारांना आवाहन करण्यासाठी आज थेट सिल्व्हर ओकवर गेले. त्यांनी पवारांना सांगितले की तुम्हीच पुढाकार घेतला पाहिजे.

 

दोन्ही घटनांचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला असता किंवा नसता, परंतु ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, या सरकारच्या भूमिकेपेक्षा विरोधकांची भूमिका वेगळी नाही, हा मुद्दा जनतेपर्यंत आणि जरांगेंपर्यंत पोहोचला असता. सगळे नेते एकाच सुरात बोलले असते तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात या मुद्द्यावर मतभेद नाहीत, असे चित्र स्पष्ट झाले असते आणि राज्यात निर्माण झालेला तणाव कमी झाला असता. परंतु शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोन करून बैठकीला जाऊ नका असे सांगितले, अर्थात हा तणाव कमी व्हावा ही पवारांचीच इच्छा नाही, हेच भुजबळांनी सुचवले आहे.

या बैठकीनंतर शरद पवारांनीही स्पष्ट केले की ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे योग्य नाही. हेच जेव्हा भुजबळ सांगत होते, तेव्हा जरांगे शिवराळ भाषेत त्यांचा समाचार घेत होते. परंतु शरद पवारांच्या विरोधात त्यांनी तोंड उघडलेले नाही. शिवराळ भाषा तर सोडा, साधा निषेधही केलेला नाही. पवारांनी यापूर्वी जरांगे यांचा पाणउतारा करून सुद्धा जरांगे पवारांच्या विरोधात बोलले नाहीत, हेही महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहे. भुजबळांनी सुद्धा हे पाहिलेले आहे. जरांगे यांना पवारांच्या ऊर्जेचे प्रचंड कौतुक असल्यामुळे ही ऊर्जाच त्यांना शांत करू शकते, ते शांत झाले तर महाराष्ट्रातला तणावही शांत होईल असे वाटल्यामुळे कदाचित भुजबळांनी पवारांवर विनंती केली असावी.

पवार ही विनंती मनावर घेतील याची शक्यता कमी आहे. कारण भुजबळांना भेटीसाठी दीड तास तंगवण्यात आले. साहेबांची तब्येत बरी नाही, ते आराम करतायत, असे सांगण्यात आले. पवारांचे वय आणि आजारपण पाहाता हे सत्य असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना काय आश्वासने दिली ते मला माहीत नाही, तुम्ही लक्ष्मण हाकेंना काय आश्वासन दिले ते मला माहीत नाही, असे सुनावल्यानंतर. दोन दिवसानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेईन असे पवार म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांची साथ सोडून अनेक जण शरद पवारांसोबत जाण्यास इच्छुक आहेत, अशी चर्चा आहे. भुजबळांच्या या भेटीत नव्या राजकीय समीकरणाबाबत चर्चा झाली अथवा नाही, हे कळायला मार्ग नाही. कारण वणवा कितीही भडकलेला असो, परिस्थिती कितीही स्फोटक असो या तापलेल्या वातावरणातही आपली पोळी शेकण्याचे कसब महाराष्ट्रातील काही राजकारण्यांना निश्चित लाभलेले आहे. त्यामुळे या भेटीत असे काही घडले नसेलच, असे ठामपणे सांगण्याइतके चांगले दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात उरलेले नाहीत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा