भाजपा खासदार निशिकांत दुबे हे पक्षाचे असे नेते आहेत, ज्यांचा वापर भाजपाचे नेतृत्व लाऊडस्पीकर सारखा करीत असते. संसदेत जेव्हा जेव्हा गांधी परिवाराबाबत किंवा अन्य एखाद्या संवेदनशील विषयावर बोलायचे असते तेव्हा दुबे यांना बोलण्याची संधी दिली जाते. दुबे बोलायला उभे राहतात आणि अत्यंत कठोर शब्दात प्रहार करतात. त्यांनी सुतोवाच केले आहे की, ‘भारतात निकाह करून आलेल्या पाच लाख पाकिस्तानी महिला आहेत, ज्यांच्याकडे नागरिकत्व नाही.’ हे विधान म्हणजे मोदी सरकारने स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केल्याचे हे संकेत आहेत.
अल्पसंख्य मतांसाठी लाळ गाळणारे नेते या स्वच्छता अभियानातील सगळ्यात मोठा अडसर बनण्याची शक्यता आहे.
फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेली आपली पत्नी आणि मुलांना परत आणण्याची कथा आपण सगळ्यांनी गदर या सिनेमात पाहीली. ज्यांची पत्नी पाकिस्तानी आहे, असे पाच लाख तारा सिंग भारतात आहेत. फरक एवढाच ते हिंदू नाहीत. आपल्या एक्स या सोशल मीडियावर दुबे म्हणतात, ‘पाकिस्तानातून भारतात निकाह करून आलेल्या पाच लाख महिला आहेत. देशात घुसखोरी करणाऱ्या या शत्रूंशी आपण कसे लढणार’, असा सवाल त्यांनी केलेला आहे.
पहलेगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने देशातील सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे खरे तर दुबे यांना हा प्रश्न पडू नये. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे या महिलांची हकालपट्टी केली जाईल यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत, कारण ते सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. ज्या पाच लाख महिला देशाचे नागरीकत्व घेतल्याशिवाय भारतात राहातात, त्यांची हकालटपट्टी कशी होणार? हा सवाल सर्वसामान्य भारतीयांना पडू शकतो. तो निशिकांत दुबे यांना पडू नये, कारण ते सर्वसामान्य जनतेत मोडत नाहीत. ते सत्ताधारी भाजपाचे प्रभावी खासदार आहेत.
पहेलगाम घडल्यानंतर देशात अधिकृतपणे किंवा अनधिकृतपणे घुसलेल्या पाकिस्तानींबाबत सरकारला जाग आली, देर आये दुरुस्त आये असे म्हणून आम्ही स्वत:चे समाधान करून घेऊ. मोदी सरकार पाकिस्तानींची साफसफाई करणार ही चांगली गोष्ट आहे. गुजरात सरकारने या कामी पुढाकार घेतलेला आहे. ४८४ पाकिस्तानींची हकालपट्टी केली, घुसखोरी करणाऱ्या १०२४ बांगलादेशी रोहिंग्यांची धरपकड करून त्यांची वरात काढली. महाराष्ट्रात ५०५३ पाकिस्तानींची हकालपट्टी करण्याच्या तयारीत आहे. हे सहजासहजी बाहेर पडणार नाहीत. कॉलरला पकडून त्यांची हकालपट्टी करावी लागणार आहे. या कारवाईत सगळ्यात मोठा अडसर भारतातील छुप्या पाक समर्थकांचा. मानवाधिकार, माणुसकी, अशा गोंडस नावाखाली त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतील. भाजपा राजकीय फायद्यासाठी, देशात धार्मिक उन्माद निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करतो आहे, अशा प्रकारचा दावा करत ही मंडळी या कारवाईत खोडा घालण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
नरेश टिकैत यांना भूपेंद्र चौधरी यांनी काय दिला सल्ला ?
कर्नाटक: रेल्वे परीक्षेला येण्यापूर्वी मंगळसूत्र, जानवे काढून ठेवण्यावरून वाद
युपीतून पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवले
भारतातील राजकीय नेत्यांपैकी काही जण इतके मठ्ठ आहेत, की त्यांना पडणारे प्रश्न जगातील कोणत्याही बथ्थड डोक्याच्या माणसाला पडणार नाहीत. परंतु तरीही ही मंडळी नेते म्हणून मिरवतात. महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार अशा अक्कलशून्य विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. ‘दहशतवाद्यांना धर्म विचारून गोळ्या घालण्या इतपत वेळ तरी असतो का?’ असा ताजा सवाल करत त्यांनी आपल्या बिनडोकपणाचे नव्याने प्रदर्शन केलेले आहे. देव जेव्हा अक्कल वाटत होता, तेव्हा वडेट्टीवार कुठे होते, असा प्रश्न आम्ही विचारत नाही. ते तिथेच असतील. मला अक्कल घ्यायला वेळ कुठे आहे, असे
सांगितल्यामुळे देवाचाही नाईलाज झाला असावा. तेव्हा पासून ते अशी अर्धवट विधाने करतायत. बहुधा प्रसिद्धी त्यांना अलिकडे मिळू लागली आहे. दहशतवाद्यांना वेळ कुठे असतो, या प्रश्नातला आत्मविश्वास पाहीला की असे वाटू लागते, जणू पहेलगाममध्ये येण्यापूर्वी दहशतवाद्यांनी आपले संपूर्ण वेळापत्रक त्यांना पाठवले होते. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांना शेतात जाऊन गवताचे भारे बांधण्याचे टार्गेट दिले होते, अशीही वडेट्टीवारांची माहिती असावी.
किशोरी पेडणेकर हा दुसरा नमुना. हिंदू-मुस्लीम केल्यामुळे पहलगाम घडल्याचा साक्षात्कार झालेला आहे. उबाठा शिवसेनेने अल्पसंख्यांक मतांचे शेण चिवडायला सुरूवात केल्यानंतर त्यांच्या नेत्यांची ही अशी विधाने वारंवार येत आहेत. मुळात मुंबई सारख्या शहराचे महापौरपद भूषवण्याची योग्यता या बाईंकडे होती का ? इथ पासून प्रश्न सुरू होतात. जिथे तिथे फाळके मारण्याची जी क्षमता आहे, त्याच आधारावर त्यांना पदावर बसवण्यात आले. जेणे करून त्यांनी यथेच्छ
लुटपाट करावी आणि त्या वाटमारीतील एक मोठा हिस्सा वरपर्यंत पोहोचवावा. भूराजकीय विषयांबाबत यांचा अभ्यास किती? समज किती? खरे तर कोविड भ्रष्टाचारात नखशिखांत माखलेल्या पेडणेकर बाईंची रवानगी तुरुंगात झाली
पाहिजे होती. परंतु ती होत नसल्यामुळे यांचा धीर चेपतो आणि क्षुद्र राजकारणासाठी देशहिताला चुड लावणारी विधाने बाई करीत असतात.
१९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंचा जो वंशविच्छेद झाला, तोही भाजपामुळे झाला होता का? असा सवाल यांना विचारण्याचीही सोय नाही. देशात असे काही घडले होते, याची माहिती यांना असण्याची शक्यता नाही, कारण यांना भ्रष्टाचाराचे उकीरडे
फुंकण्याच्या पलिकडे काहीच येत नाही. दहशतवादाचे आणि त्यांच्या आश्रयदात्यांचे आडून आडून समर्थन करणारे हे नेते
ही स्वच्छ भारत अभियानातील सगळ्यात मोठी समस्या आहे. त्यांना दणका दिल्याशिवाय ही कारवाई निर्वेध होऊ शकत नाही. पाकिस्तानातील महिला निकाह करून भारतात येतात, नागरिकत्व घेतल्या शिवाय इथे बस्तान बसवतात. भारत-पाकिस्तानात युद्ध पेटले तर या महिलांची निष्ठा कुठे असेल? यांना जी मुलं होतील, त्यांची देशावर कितपत निष्ठा असेल.
या प्रश्नांची उत्तरे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. ज्यांना आपल्या देशाशी काहीही घेणेदेणे नाही, अशा लोकांना आपण भारतात का पोसायचे?
देशात काय चालले आहे लक्षात घ्या. स्टुडंट व्हीसावर इथले तरुण पाकिस्तानात जातात. पाकिस्तान सारख्या भिकारी देशात शिक्षण सुद्धा तितकेच भिकार आहे. तरीही गेल्या काही वर्षात दोन अडीच हजार तरुण पाकिस्तानात शिकायला गेले.
तिथे दहशतवादाचे धडे घेऊन भारतात आग लावण्यासाठी परतले. महिला निकाह करून भारतात प्रवेश मिळवतात. हे तरुण, या महिला भारतात हेरगिरी करत नसतील कशावरून? हा सगळा कचरा बाहेर काढण्याची गरज आहे. पहलगाममध्ये जी दुर्दैवी घटना घडली, त्यामुळे या विषयाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. भारतातील राजकीय नेते, राजकीय पक्ष यात अडथळा बनण्याची शंभर टक्के शक्यता आहे. वडेट्टीवार, पेडणेकर,
पवार अशी अनेक मंडळी यात मोडता घालतील. त्यांना वठणीवर आणून ही कारवाई मार्गी लावावी लागेल. भारतात हे स्वच्छता अभियान यशस्वी करावेच लागेल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)