दंगलींसाठी उतावीळ कोण? का हव्या आहेत दंगली?

महाराष्ट्रात राज्य सरकारविरोधात दंगली व्हाव्यात यासाठी उबाठा शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष उतावीळ झालेत.

दंगलींसाठी उतावीळ कोण? का हव्या आहेत दंगली?

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना, अचानक शिवप्रेमाचे उमाळे येत आहेत. सत्तारुढ महायुती सरकारच्या विरोधात मविआच्या नेत्यांनी जोडे मारो आंदोलन केले. ही सगळी धडपड आणि तडफड कशासाठी सुरू आहे, याचा उलगडा उबाठाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या एका विधानाने झाला आहे. महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे. कुठल्याही गावात एखादा पुतळा मग तो आंबेडकरांचा असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा असो, पुतळ्याला एखाद्या विघ्नसंतोषी माणसांने काही केले तर दंगली उसळतात. राजकोटमध्ये इतका मोठा पुतळा कोसळला, दंगली का झाल्या नाहीत राज्य सरकारच्या विरोधात? हा खैरे यांचा सवाल आहे. हा सवाल विचारून खैरे थांबत नाहीत. अशा दंगली झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही व्यक्त करतात.

महाराष्ट्रात दंगली घडाव्यात ही मविआतील अनेकांची इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून शरद पवारांपर्यंत अनेकांनी ही इच्छा आडून-आडून बोलून दाखवली आहे. खैरेंनी ती उघड बोलून दाखवली एवढाच फरक. खैरेंच्या विधानाकडे असे एकाकी पाहाता येणार नाही. दंगलींची चिथावणी देण्याची सुरुवात अयोध्येतील रामलाल प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून झालेली आहे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून उबाठाचे पक्षप्रमुख आणि त्यांचे कार्यकारी संजय राऊत यांना दंगलीच्या उचक्या लागत आहेत. दंगली घडवण्याचा डाव आहे, असे ते वारंवार सांगत होते. सुदैवाने राज्य सरकार, केंद्र सरकार दक्ष असल्यामुळे काहीही अनुचित झाले नाही. महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती निर्माण होईल, ही चिथावणी शरद पवारांनी अलिकडेच दिली. बदलापूरमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात, स्थानिकांनी आंदोलन केले. परंतु या आंदोलनात घुसखोरी करून जाळपोळ आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न करणारे उपरे होते, ही बाबही उघड झालेली आहे.

बांगलादेशात झालेल्या जिहादी उठावानंतर काँग्रेस आणि त्यांची इको सिस्टीम भारतात त्याची पुनरावृत्ती करण्याच्या कामाला लागलेली आहे. ही मंडळी देश पेटवण्याच्या संधीच्या शोधात आहेत. त्यांना एक निमित्त हवे आहे. जनता केंद्र सरकारच्या कारभाराला कंटाळलेली आहे. सरकारच्या विरोधात जनता उठाव करते आहे, हे दाखवण्यासाठी जिथे तिथे जाळपोळ, दगडफेक व्हावी यासाठी आगीत तेल ओतण्याचे काम हे लोक करीत आहेत. महाराष्ट्रात आग पेटावी यासाठी ही मंडळी सक्रीय झाल्याचे संकेत मिळत आहेत. राजकोट येथील शिव पुतळा पडला नसून पाडला आहे, असा संशय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यापूर्वी माजी खासदार निलेश राणे यांनी असाच दावा केला होता. तेव्हा लोकांच्या मनात संशय निर्माण झाला होता. त्यानंतर आलेले चंद्रकांत खैरे यांचे विधान ऐकले की, महाराष्ट्रात आगडोंब उसळावा म्हणून विरोधक जोरदार ताकद लावत असल्याच्या संशयावर शिक्कामोर्तब होते आहे.

हे ही वाचा:

मैतई-कुकी गटात पुन्हा गोळीबार, महिलेचा मृत्यू !

जम्मूत लष्करी तळावर हल्ला

मद्यधुंद प्रवाशाने बेस्ट बसच्या ड्रायव्हरकडून स्टेअरिंग हिसकावलं आणि…

निषाद कुमारची २.०४ मीटर ‘उंच उडी’ मारत रौप्य पदकाला गवसणी

महाराष्ट्रात राज्य सरकारविरोधात दंगली व्हाव्यात यासाठी उबाठा शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष किती उतावीळ झालेले आहेत. त्यांना दंगली हव्या आहेत, याची काही ठोस कारणे आहेत. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदान एकतर्फी मविआच्या बाजूने झाले. हे मतदान मुस्लीमांनी मोदींच्या विरोधात केले होते. त्यात कोणतीही सौदेबाजी नव्हती. त्यांना मोदी नको होते. मोदींच्या विरोधात जे कोणी आहेत, त्यांना मुस्लीम मतदारांनी जवळ केले. या काळात उद्धव ठाकरे मुस्लिमांचे मसिहा का झाले? याचे उत्तर सोपे आहे. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात फिरकले नाहीत, ते सोहळ्यावर वारंवार टीका करत होते. मुस्लीमांचे मेळावे, बैठका घेत होते. त्यांनी हिंदू आणि हिंदुत्व हे दोन्ही शब्द वाळीत टाकले होते. उद्धव ठाकरे हे मोदींना शिव्या घालतायत, त्यांच्याविरोधात अर्वाच्च भाषेत बोलतायत एवढेच मुस्लिमांना खूष करण्यासाठी पुरेसे होते.
विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी मुस्लीम तयार आहेत. परंतु यावेळी हा सौदा फुकटात होणार नाही. मुस्लिमांना आता मतांची किंमत वसूल करायची आहे. त्यासाठी निवडणुकीच्या आधी सौदेबाजी करायची आहे. मतांची किंमत ठरवायची आहे. विधानसभा निवडणुकीत २० टक्के जागा, उपमुख्यमंत्री पद अशी किंमत मुस्लीमांच्या नेत्यांनी ठरवली आहे. मविआच्या नेत्यांकडे या सौद्याबाबत घासाघीस सुरू आहे.

ही किंमत मोजणे मविआतील कोणत्याही घटक पक्षाला शक्य नाही. २० टक्के सोडा पाच टक्के जागाही मविआतील एकही पक्ष मुस्लीमांना देण्याची शक्यता नाही. अशा परीस्थिती दंगली पेटवल्या की मुस्लीम मतदारांमध्ये पराकोटीची असुरक्षेची भावना निर्माण होते. अशावेळी पाठीवर हात फिरवणारे, त्यांच्या सुरक्षेची गॅरेण्टी देणारे कोणी तरी लागते. तीच वेळ यावी ही मविआच्या नेत्यांची इच्छा आहे. म्हणून ती वेळ आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. दंगल झाली की कोणत्याही सौदेबाजी शिवाय मुस्लीम मतदार आपल्या दावणीला बांधला जाणार याची मविआच्या नेत्यांना खात्री आहे. म्हणून दंगली घडाव्यात यासाठी मविआचे नेते देव पाण्यात घालून बसलेले आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version