किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…

अनेक लफडी त्यांनी बाहेर काढली. स्वाभाविकपणे तेव्हापासून सोमय्या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या हिटलिस्टवर होते.

किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची तथाकथित सीडी बाहेर आली असून त्यावरून पुन्हा एकदा घमासान सुरू झालेली आहे. सोमय्या यांनी सबळ पुराव्या सहित भ्रष्टाचाराचे आरोप करून ठाकरे गटाच्या इतक्या नेत्यांच्या विकेट काढल्या आहेत, की त्यांच्यावर कधी तरी अशा प्रकारचा प्रतिहल्ला होईल हे अपेक्षित होते. जे काही दाखवण्याचा प्रयत्न होतोय त्यातले सत्य बाहेर येण्यासाठी सखोल चौकशीची गरज आहे.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महिलांच्या कथित शोषणाच्या प्रकरणावरून घणाघाती टीका केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर उत्तर द्यायला उभे राहिले, ‘तेव्हा कोही ठोस असेल तर आमच्या हाती द्या, सखोल चौकशी करू, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही’, अशी नि:संदिग्ध ग्वाही त्यांनी दिली.

‘राजकारणात असे प्रसंग येतात, ज्यावेळी माणसाचे संपूर्ण राजकीय आय़ुष्य, पुण्याई पणाला लागते’, असेही ते यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीची सत्ता असताना किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांना सळो की पळो करून सोडले होते. संजय राऊत, अनिल परब, हसन मुश्रीफ, अशी अनेक नावे सांगता येतील. ते थेट ठाकरेंनाही भिडले. मातोश्रीशी संबंधित अनेक लफडी त्यांनी बाहेर काढली. स्वाभाविकपणे तेव्हा पासून किरीट सोमय्या हे ठाकरे गटाच्या नेत्यांच्या हीटलिस्टवर होते. त्यांच्यावर या आधीही जमीन हडपणे, एफएसआय घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. सोमय्या यांच्या पत्नी मेधा आणि नील सोमय्या यांनाही गोवण्याचा प्रयत्न झाला. किरीट सोमय्या हे ईडी चौकशी लावून ब्लॅकमेल करतात, असे आरोप झाले.

हे तमाम आरोप संजय राऊत यांनी केले होते. परंतु यापैकी एकही आरोप त्यांचे सरकार असतानाही सिद्ध होऊ शकला नाही. उलट हे बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पाठी अब्रुनुकसानीच्या दाव्यांची भुणभुण लागली.   सोमय्या बेदागच राहीले. मविआ सरकार पायउतार झाल्यानंतरही सोमय्या शांत बसले नाहीत. त्यांनी कोविड महामारीच्या काळात महापालिकेत झालेला घोटाळा बाहेर काढला. उद्धव ठाकरे यांच्या कोर्लई गावातील बंगल्यांचे प्रकरण, रवींद्र वायकर यांच्या पंचतारांकीत घोटाळ्याचे प्रकरण बाहेर काढले. त्यामुळे सोमय्यांचा काटा ढिला कसा करावा हा ठाकरे गटाच्या नेत्यांसमोर प्रश्नच होता. आता या सीडीच्या निमित्ताने सोमय्या यांचा निकाल लावण्याचा प्रयत्न झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंबादास दानवे यांनी याप्रकरणी काही महिलांनी आपल्याकडे तक्रार केल्याचा दावा केलेला आहे. आठ तासाचे रेकॉर्डींग आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सोमय्या यांच्याविरोधात ठाकरे गट, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी राज्यभरात आंदोलन केले. मविआचे सरकार सत्तेवर होते तेव्हापासून बहुधा पोलिसांवर जनतेचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे पोलिस किंवा महिला आयोगाकडे तक्रार न करता महिलांनी दानवे यांच्याकडे तक्रार करण्याचा पर्याय स्वीकारला. दानवे जे काही म्हणाले आहेत ते खरे असेल तर सोमय्या यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. फडणवीस यांनीही हे स्पष्ट केले आहे. परंतु ते हेही म्हणाले आहेत की, ‘राजकीय आयुष्य आणि पुण्याई पणाला लागते’, असे काही प्रसंग आयुष्यात येतात. सोमय्यांच्या आयुष्यातला हा असाच प्रसंग आहे.

सोमय्या हे लढवय्ये आहेत. आरोप झाल्यानंतर त्यांनी पाठ दाखवली नाही. उलट या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केलेली आहे. ज्या महिलांनी आरोप केले आहेत, त्यांच्याबाबत पूर्ण गोपनियता पाळून चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. अशीच एक ऑडीओ सीडी मविआच्या काळात सुद्धा व्हायरल झाली होती. त्यात एक नेता एका महिलेला अत्यंत अर्वाच्च शिव्या घालतोय, धमकावतोय असे स्पष्ट ऐकू येत होते. हा नेता कोण हे जनतेला समजले. परंतु त्या नेत्याने स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करा, असे म्हटल्याचे आठवत नाही. ना त्यावेळच्या सरकारने त्याची चौकशी केली.

सोमय्याप्रकरणावर भास्कर जाधव यांनी फडणवीसांना आव्हान दिले होते की या प्रकरणाची चौकशी करण्याचे धाडस गृहमंत्री दाखवणार काय? फडणवीसांनी विधान परिषदेत अत्यंत निसंदीग्ध शब्दात चौकशी होणार, असे ठणकावून सांगितले. बाकी भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया खूपच मजेदार होते. त्यांना करुणा शर्मा, पूजा चव्हाण यांच्यावर झालेल्या अन्यायाची आठवण झाली. मविआचे सरकार असताना करूणा शर्मा यांच्या कारमध्ये पिस्तूल ठेवून त्यांना अटक करणाऱ्या सरकारचे घटक असलेल्या जाधवांना करूणा शर्मा यांचे नाव घेताना थोडी तरी लाज वाटायला हवी होती.

हे ही वाचा:

बंगालमध्ये का चर्चेत आहे ‘बॅलट पेपर संदेश’ नावाची मिठाई

जम्मू- काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार

भारत सर्वाधिक पाच जीडीपी असणाऱ्या देशांच्या पंक्तीत

दहशतवादविरोधी पथक हे अमली पदार्थविरोधात नोडल पथक

महिलांच्या जीवीताचे, अब्रुचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे सरकारने अत्यंत तटस्थपणे सोमय्या यांच्यावर झालेल्या आरोपाची चौकशी करायला हवी. सोमय्या यांची देखील हीच मागणी आहे. सरकारनेही चौकशीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. परंतु जर महीलांची ढाल वापरून सोमय्यांचा काटा काढण्यासाठी हा बनाव असल्याचे सिद्ध झाले, तर सरकारने त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारायला हवा.

भाजपा नेते गणेश नाईक यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली बलात्काराची तक्रार अलिकडेच एका महिलेने मागे घेतली. ही तक्रार करण्यासाठी आपल्याला भरीस पाडण्यात आले असा दावा तक्रार मागे घेताना महिलेने केला. बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षभराने तक्रार मागे घेण्यात आली. परंतु वर्षभर या आरोपामुळे जी मानहानी झाली त्याचे काय. बलात्कार आणि लैंगिक शोषणासारखे गंभीर विषय राजकारणाचे हत्यार बनू नयेत, एवढीच राजकीय नेत्यांकडून माफक अपेक्षा आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
Exit mobile version