राज्यात गेल्या वर्षांनंतर पहिल्यांदाच जल्लोषात दिवाळी साजरी झाली. रोषणाईचा झगमगाट, फटाके, गोडधोड असे दिवाळ सणाचे सर्व रंग या वर्षी दिसले. पण फटाक्यांनी झाले नसेल इतके प्रदूषण राजकीय वक्तव्यांनी झालेले दिसले. राज ठाकरे यांचा दिवा विझण्यापूर्वी तेजोमय झालाय, असे वक्तव्य शिवसेनेच्या आमदाराने केले आहे.
शिवसेना उद्धव गटाचे नेते अलिकडे बोलताना, वागताना आणि वावरताना साधे साधे शिष्टाचारही पाळत नाहीत असे चित्र आहे. सत्ता गमावल्याच्या जखमा सुखता सुखत नाहीत, अशी शिवसेनेच्या नेतृत्वाची स्थिती आहे. राजकारणात वावरणाऱ्या लोकांना राजकीय शिष्टाचार पाळावे लागतात. नावडती व्यक्ति समोर आली तरी हसावे लागते, त्यांच्याशी हस्तांदोलन करावे लागते. बोलावे लागते. वाढदिवशी शुभेच्छा द्याव्या लागतात. पण हे शिष्टाचार उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य यांच्या गावीही नाहीत. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवशी त्यांच्या अभिनंदनाचा ट्वीट करण्याची इच्छा ठाकरे पिता-पुत्रांना झाली नाही. अमित शहा हे फक्त भाजपा नेते नाहीत, देशाचे गृहमंत्री आहेत. राजकारणात विरोध असतो, वैर नसते. परंतु ठाकरेंचा स्वभावात इतका मोठेपणा बसत नाही.
हा कद्रूपणा त्यांच्या नेत्यांमध्येही झिरपलेला दिसतो. वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी राज ठाकरे यांना विझता दिवा म्हटलं आहे. दिवा जेव्हा तेजोमय असतो तेव्हा तो विझण्याच्या तयारीत असतो. अशा स्थितीत कोण कोणाला आधार देऊ पाहतोय. बुडत्याला काडीचा आधार अशी स्थिती आहे. असे सुनील शिंदे म्हणाले आहेत. सुनील शिंदे हे हाडाचे शिवसैनिक आहेत. वरळीची जागा त्यांनी मोकळी करून दिली तेव्हा कुठे आदित्य ठाकरे आमदार झाले. पण त्यांना आदित्य यांचा वाण आणि गुण दोन्ही लागलेला दिसतोय.
मनसेचे भोंगा आंदोलन जेव्हा जोरात होते, तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देताना, संपलेल्या पक्षावर काय बोलायचे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. तारीख होती १० एप्रिल २०२२. लोकांना नेत्यांचा अहंकार फार रुचत नाही. माज तर अजिबात खपवून घेतला जात नाही. आदित्य ठाकरे यांच्या विधानानंतर अवघ्या दोन महिन्याच्या काळात होत्याचे नव्हते झाले. शिवसेनेचा बाजार उठला. आता रोज सकाळ संध्याकाळ एकनाथ शिंदे यांच्या नावाने ठणाणा करणे ठाकरे पिता-पुत्रांच्या नशीबी आले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या अरेरावीला नियतीने इतके सडेतोड उत्तर दिल्यानंतरही सुनील शिंदे यांना पुन्हा तशीच माती खावीशी वाटावी हे आश्चर्य आहे. आदित्य ठाकरे जेव्हा अहंकाराचे प्रदर्शन घडवत होते तेव्हा किमान शिवसेनेकडे माज दाखवायला सत्ता आणि पक्ष तरी होता. आज या दोन्हीचा बाजार उठलाय आणि चिन्ह राहील की जाईल अशी परिस्थिती आहे. ज्या पक्षाकडे जेमतेम १५ आमदार आणि ६ खासदार शिल्लक आहेत. त्यातले किती राहतील आणि किती कधी जातील याचा नेम नाही, अशा परिस्थितीत सुनील शिंदे यांच्यासारखा आमदार राज ठाकरे यांना विझता दिवा म्हणतो हा मोठा विनोदच आहे.
राज ठाकरे यांची उंची त्यांच्या पक्षाचे आमदार आणि नगरसेवक यांच्या संख्येवरून ठरत नाही. महाराष्ट्रात असे किती लोक आहेत की ज्यांची भाषणे ऐकायला लोक गर्दी करतात? ज्यांच्या सभांमध्ये उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट होतो? असे किती नेते आहेत ज्यांच्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरायला तयार आहेत?
हे ही वाचा:
धनत्रयोदशीला धन धना धन!! ३९ टन सोन्याची विक्री
शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन
आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये अयोध्येला जाणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा राज ठाकरे यांच्या टीकेची दखल घेतात. पवार भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, पवार हे नास्तिक आहेत, या राज ठाकरे यांच्या टीकेमुळे चमत्कार घडला. पवार त्यांच्या प्रत्येक भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करू लागले. त्यांना दगडू शेठ मंदिरात जाण्याची बुद्धी झाली. पवारांनीही अनेकदा राज यांच्या दिनचर्येवरून त्यांना झोडले आहे. परंतु अशी टीका करण्याचा नैतिक अधिकार पवारांना आहे. कारण वयाच्या ८१ वर्षी सुद्धा पवार हे राज यांच्यापेक्षा जास्त सक्रीय आहेत. परंतु राज हे विझता दिवा आहेत, अशी टीका करायला पवारही धजावणार नाहीत.
सुनील शिंदे यांना संपलेला पक्ष आणि विझलेला नेता कसा असतो हे पाहायचे असेल तर त्यांनी स्वत:च्या उरल्यासुरल्या पक्षाकडे आणि आपल्या नेतृत्वाकडे पाहावं. सत्य त्यांच्या चटकन नजरेस येऊ शकेल. ते सत्य त्यांनी इतरांना सांगण्याचीही गरज नाही, फक्त लक्षात ठेवावे, म्हणजे यापुढे अशी विधाने करण्यास ते धजावणार नाहीत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)