संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग

तुरुंगातून सुटल्यानंतर व्यक्त केली होती इच्छा

संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग

शिवसेना नेते, खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत पत्राचाळ प्रकरणात १०३ दिवसांचा कारावास भोगून परतले आहेत. आपण लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असे सांगून त्यांनी अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांनाही भेटणार असे सांगून आश्चर्याचा धक्का दिला आहे. तुरुंगातून परतलेल्या राऊत यांच्या पवित्र्याने मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांब ढग निर्माण झालाय, हे मात्र नक्की. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यासह अनेकांना गोंधळात टाकणाऱ्या या खेळी मागे नेमका गेम काय असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

पीएमएलए न्यायालयाने राऊत यांची अटक बेकायदा असल्याचा निर्वाळा दिलाय. अनेकांना हा दिलासा घोटाळा वाटतोय. या शब्दाचे पितृत्व राऊतांचेच. न्यायालयाने इतरांना दिलेल्या दिलाशावर टीका करताना राऊतांनीच या शब्दाची निर्मिती केली आहे. परंतु आपण न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान झाला केला पाहिजे. न्यायालयाचा निर्णय मान्यही केला पाहीजे.
न्यायालयाच्या दिलाशानंतर बाहेर आलेले राऊत भाजपाच्या केंद्रीय नेत्यांवर डाफरतील, तोंडसुख घेतील, त्यांच्यावर शाब्दिक हल्ले करतील असे अनेकांना वाटत होते. विपरीतच घडले.

राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतायत आणि त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत, असे ते म्हणाले. म्हाडाचे अधिकार काढून घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बदललाय. आमच्या सरकारने चुकीचा निर्णय घेतला होता, तो फडणवीसांनी बदललाय हे चांगलेच झाले.

राऊत जे काही बोलले ते अनपेक्षित आहे. ते त्यांच्या प्रकृतीला साजेसे नाही. आजवर जे राऊत लोकांनी पाहिलेत, ऐकलेत त्याच्याशी राऊतांच्या या देहबोलीची तुलनाच करता येणार नाही. काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी टीका केली ती फक्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर. म्हणजे लढाई बाहुबली आणि भल्लाल देव यांच्यात सुरू आहे आणि अचानक भल्लाल देव बाहुबलीला सोडून कटप्पावर बाण चालवतो असा काहीसा हा प्रकार आहे.

हे ही वाचा:

मुंबई-बर्मिंगहॅम विमानसेवा हवीय!

भारताचा पराभव; आठवण आली धोनीची

सर्वाधिक रुंदीचा मिसिंग लिंक बोगदा तयार होतोय

जॅकलिनवरची टांगती तलवार कायम

‘संजय राऊतांना लवकरच ईडीकडून अटक होणार आहे, त्यांनी आता एकांतात स्वत:शीच बोलण्याची प्रॅक्टीस करावी’, असे राज ठाकरे म्हणाले होते. ‘ राज ठाकरे आमचे मित्र आहेत, राजकारणात आपला शत्रूही तुरुंगात जाईल अशी भावना कोणी व्यक्त करू नयेत’, असे राऊत म्हणाले. इथेही राऊतांच्या स्वरात आक्रमकता कमी आणि वेदना जास्त होत्या.
तुरुंगातील भिंती खूप उंच असतात, इथे बोलायलाही कोणी नसते. तुरुंगातले दिवस खडतर असतात, असा अनुभव त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवला. राऊतांची बदललेली देहबोली त्या उंच भिंतीआड १०३ दिवस केलेल्या चिंतनातून निर्माण झालेली आहे काय, या निष्कर्षावर इतक्या लवकर येण्याचे काही कारण नाही.

राऊत यांनी तुरुंगातील कर्मचारी, तिथल्या समस्या आदींबाबात चर्चा करण्यासाठी फडणवीसांची भेट घेणार असे जाहीर केलेले असले तरी ते त्यांना भेटतीलच असे नाही. यापूर्वी फडणवीसांची मुलाखत घेण्याचे त्यांनी जाहीर केले होते. अद्यापि तसा योग आलेला नाही. होय, दोन वर्षांपूर्वी २६ सप्टेंबर २०२० मध्ये ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलात राऊत फडणवीसांना भेटले होते. तेव्हाही राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता होती. त्यावेळी दिशा सालियन प्रकरण तापलेले होते. भाजपा महाविकास आघाडी सरकारबद्दल खूप आक्रमक असताना झालेल्या या भेटीबाबत मोदी भक्तांनी प्रचंड नाराजीही व्यक्त केली होती. सामनासाठी फडणवीसांची मुलाखत घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण त्यांना भेटलो असे राऊत यांनी सांगितले होते. महाराष्ट्रात सत्ताधारी नेते सुद्धा विरोधकांना भेटत असतात. इथे उत्तरेतील राजकारणाप्रमाणे विरोधकांना शत्रू मानण्याची परंपरा नाही. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत, राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना भेटणे गैर नाही, असे राऊत यांनी त्यावेळी सांगितले होते. परंतु ज्या मुलाखतीच्या निमित्ताने राऊत फडणवीसांना भेटले ती मुलाखत झालीच नाही.

त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात जमीन आस्मानचा फरक आहे. तेव्हा राऊत हे शिवसेनेतील सर्वात वजनदार नेते होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करीत होता. मविआची सत्ता आणण्याचे श्रेय मीडियाने संजय राऊत यांना बहाल केले होते. आता नेमकी उलट परीस्थिती आहे. शिवसेना फुटली आहे, सत्ता गेलेली आहे, राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील कटूता कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्या विधानाचेही राऊत यांनी स्वागत केले आहे. भाजपाशी लढणारे, बेताल वाटतील अशी तिखट वक्तव्य करून भिडणारे संजय राऊत हे ठाकरेंचे शस्त्र होते. परंतु आज सकाळची मातोश्रीवर झालेली पत्रकार परिषद पाहिली तर ते संजय राऊत भाजपाबद्दल त्याच शैलीत प्रहार करायला फार उत्सुक नसल्याचे दिसले. उलट त्यांच्या बाजूला बसलेले ठाकरे पिता-पुत्र मात्र भाजपावर तुटून पडत होते. तुरुंगातील १०३ दिवसांच्या मुक्कामामुळे राऊत नरमले असतीलही. परंतु हा परिणाम फार काळ राहण्याची शक्यता कमी आहे. पुन्हा ते ताकदीने भाजपावर प्रहार करतील अशी शक्यता आहे. परंतु जर असे घडले नाही. अजित पवार जशी भाजपावर टीका करत असतात तशी गुळगुळीत टीका राऊतांनी सुरू केली तर ठाकरेंच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता संपुष्टात येईल. आणि पक्षातील महत्वही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version