ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…

शिवसेना आपला नैसर्गिक मित्रपक्ष नाही, अशी कबुलीच नाना पटोलेंनी दिली आहे.

ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…

गोष्ट जुनी आहे, इसापनीती किंवा पंचतंत्रातील. एकदा ओरडणारे गाढव पाहून एका कोल्ह्याला गाढवाची गंमत करण्याचा मोह झाला. तो गाढवा जवळ जाऊन बोलू लागला, ‘अरे वा गवई महाराज तुमचा आवाज भारी गोड आहे, तुम्ही इथे उकीरडे कशाला फुंकताय? आपल्या कलागुणांची झलक जगाला दाखवा आणि जग जिंका.’ एवढं बोलून कोल्हा निघून गेला. दूर लपून गाढवाकडे बघू लागला. कोल्ह्याच्या कौतूकामुळे फुगलेला गाढव जोरजोरात रेकू लागला. त्याच्या आवाजामुळे झोपमोड झालेला त्याचा मालक तिथे आला आणि त्याला बदड बदड बदडू लागला. क्षमता नसताना लोक कौतूक करू लागले की, शहाणी माणसं सावध होतात आणि येडे लाथा खातात. बेस्ट मुख्यमंत्री म्हणून कौतूक करताना न थकणारे काँग्रेसचे कोल्हे आता उद्धव ठाकरे यांना जागा दाखवू लागले आहेत.

सत्ता आज गेली तर उद्या येईल अशी शक्यता असते. स्वत्व गमावलेल्यांचा बाजार उठला की मात्र पुन्हा झळाळी येण्याची शक्यता कमीच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काही पोतेरे होते आहे, ते यामुळेच. महाविकास आघाडीतील अडीच वर्षांच्या सुखी संसारानंतर सत्ता गेली, पण महाविकास आघाडीचे अस्तित्व मात्र कायम आहे. परंतु त्यात उद्धव सेनेला सत्ता असताना जो मान होता तो आता उरलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मनाला येईल तेव्हा या पक्षाला लाथा घालत असतात. काल तर शिवसेना आपला नैसर्गिक मित्रपक्ष नाही, अशी कबुलीच त्यांनी दिली आहे.

भाजपा सोबत २५ वर्षे आम्ही युतीत सडलो असा साक्षात्कार उद्धव यांना झाला होता. हे सडणे इतके बोचत होते की त्यांनी ते सतत बोलून पण दाखवले. पण काँग्रेससोबतची आघाडी तर अडीच वर्षात सडू लागल्याची चिन्ह आहेत. दुर्गंधी यायला सुरूवात झाली आहे.

महाविकास आघाडीचे समीकरण टीकवण्यासाठी उद्धव ठाकरे वाट्टेल ते करायला सज्ज होते. अडीच वर्षांच्या काळात त्यांनी कमरेचे सोडून डोक्याला बांधले. मुख्यमंत्री असताना दर जयंती पुण्यतिथीला गांधी नेहरु घराण्यातील प्रत्येक नेत्यासमोर आवर्जून नतमस्तक होत. काँग्रेसवाल्यांना वाईट वाटेल म्हणून त्यांनी कधी स्वातंत्र्यवीर सावरकर, दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कधी आठवणही काढली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामीही उद्धव ठाकरे यांनी तोंड दाबून सहन केली. परंतु एवढी निष्ठा दाखवून सुद्धा काँग्रेसवाले विरघळले नाहीत. नाना पटोले यांनी शिवसेनेसोबतची मैत्री नैसर्गिक नसल्याचे सांगितले आहे.

जे नैसर्गिक नाही, ते अनैसर्गिक आहे. त्यामुळे अडीच वर्षात काँग्रेसने उद्धव यांच्या पक्षाशी असलेले संबंध अनैसर्गिक होते. असे संबंध अनैतिक सुद्धा असतात आणि बेकायदेशीरही. परंतु सत्तेचा मलिदा मिळत असल्यामुळे ठाकरे पिता-पुत्रांना या अनैतिक आणि अनैसर्गिक संबंधांमध्ये काही गैर वाटत नव्हते. किंबहुना ते या अनैसर्गिक संबंधामध्ये असे काही रमले होते, की त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांनाही सोडचिट्ठी दिली. याच दरम्यान हिंदुहृदयसम्राट हरवले आणि तिथे जनाब चिटकवण्यात आले. सामनातून हिंदुत्व बाद झाले, बोगस धर्मनिरपेक्षते टाळ कुटणे सुरू झाले. नेहरु-गांधींची भलामण सुरू झाली. आणिबाणीचे समर्थन होऊ लागले. हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपामुळे देशात फूट पडते आहे, ही काँग्रेसची कॅसेट सामनातून वाजू लागली.

एकेकाळी डाव्यांनी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला होता, नेहरुंच्या कुख्यात चीन धोरणाचे कर्ते कृष्ण मेनन, सुरेंद्रमोहन कुमार मंगलम, चंद्रशेखर, जयराम रमेश, महाराष्ट्राचा विचार केल्यास यशवंतराव मोहीते ज्याना यशवंतराव चव्हाण रेखे बुद्रुकचे कार्ल मार्क्स म्हणायचे असे अनेक नेते होते. काँग्रेसची वैचारीक भूमिका तयार करण्याचे काम ही मंडळी करत. ही कामगिरी बजावल्याबद्दल काँग्रेसच्या काळात जेएनयू, एफटीटीआय, सारख्या कैक संस्थांचा ताबा बहाल केला होता. त्यातूनच काँग्रेसची कुप्रसिद्ध इकोसिस्टीम सज्ज होत होती. शिवसेना इथेही काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेऊन चालली. भाजपापासून दूर गेल्यानंतर महाराष्ट्रातील समाजवादी भूतं ज्याप्रकारे उद्धव ठाकरे भोवताली गोळा झाली.

महाराष्ट्रातील समाजवाद्यांची परीस्थिती सुरूवातीपासून अशी आहे की, त्यांना कोणाच्या तरी नावाचे कुंकू लागते. म्हणजे एखादं पिशाच्छ जसं पछाडण्यासाठी कोणाचं तरी शरीर शोधत असतं तसं काहीसं. पूर्वी ही मंडळी शरद पवार यांच्या अवतीभोवती घुटमळायची. त्यांच्या आरत्या ओवाळायची. तेव्हा समाजवाद्यांना बरे दिवस होते. समाजमाध्यमं नसल्यामुळे त्यांचा दांभिक कारभार पुरता उघड झाला नव्हता. आता बरे ते दिवस इतिहास जमा झालेत. त्यांचाही बाजार उठलाय आणि उद्धव ठाकरेंचे दुकानही बंद झाले आहे. त्यामुळे उघडा गेला नागड्याकडे आणि त्यातून ही आघाडी बनली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत काही कॉम्रेडही उद्धव सेनेला बळ देण्यासाठी गेले होते.

सांगण्याचा मुद्दा एवढाच की, काँग्रेस नेतृत्वाचे मन जिंकण्यासाठी उद्धव सेनेने काही करायचे बाकी ठेवले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा अतोनात द्वेष आणि सत्तेच्या मोहापायी २५ वर्षांची भाजपाशी असलेली नैसर्गिक मैत्री तोडली. भाजपाचे वाढते वजन उद्धवना पाहावत नव्हते, म्हणून त्यांनी नाक कापून अवलक्षण करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून देवेंद्र फडणवीसांपर्यत सर्व नेत्यांना रोज सकाळ संध्याकाळ लाखोली वाहीली. हिंदुत्वाच्या तमाम प्रतिकांचा अनादर सहन केला. वैचारीक सुंता करून घेतली.

हे ही वाचा:

वेंगसरकर अकादमीची पकड; हर्ष आघावचा बळींचा षटकार, रोहन नाबाद ८३

मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!

चोरांनी साजरा केला शाहरुख खानचा वाढदिवस

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रण द्यायला काँग्रेस नेते मातोश्रीवर गेले होते. या यात्रेत सहभागी होण्याचे उद्धव यांनी मान्यही केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले की ज्यांचा पोटशूळ उठायचा. दिल्लीसमोर मुख्यमंत्री झुकले असा जी मंडळी गलका करायची ते आता भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन निष्ठा व्यक्त करणार आहेत. तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला नैसर्गिक मित्र मानत नाही अशी जळजळीत टीका पटोले करतायत. आमच्या विचारसरणीशी ज्यांचे जुळते ते आमचे मित्र असे पटोल म्हणतायत. काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी इतके काय काय करूनही काँग्रेसने त्यांना नैसर्गिक मित्र म्हणून मान्यता देणेही स्वीकारले नाही. सगळी खुषमस्करेगिरी, चाटुकारीता सगळं वाया गेलं.
गाढव गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं.

 

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version