शिवसेनेला उत्तर-पश्चिम मुंबईत उमेदवार सापडेना

शिवसेनेला उत्तर-पश्चिम मुंबईत उमेदवार सापडेना

भाजपाने उत्तर मध्य मुंबईतून प्रख्यात विधीज्ञ उज्वल निकम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. महायुतीने मुंबईतील सहा जागांपैकी चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईत मात्र शिवसेनेला जागांचा तिढा अद्यापि सोडवता आलेला नाही. दोन्ही जागांवर उमेदवार घोषित न करण्याची कारणे मात्र परस्पर विरोधी आहेत.

भाजपाने मुंबईतील आपले तिन्ही उमेदवार बदलले. विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आणि पूनम महाजन यांचा पत्ता कापला. मोठी शस्त्रक्रीया करत मुंबईत तीन नवे चेहरे दिले. त्याचा फायदा भाजपाला होताना दिसतो आहे.
ईशान्य मुंबईत भाजपाने मिहीर कोटेचा, उत्तर मुंबईतून पियूष गोयल, उत्तर-मध्य मंबईतून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. शिवसेनेने मध्य दक्षिणमध्ये राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. परंतु, दक्षिण मुंबई आणि उत्तर-पश्चिम मुंबईत उमेदवारांबाबत विलंब होतो आहे. दक्षिण मुंबईत अनेक पर्याय आहेत म्हणून उमेदवार निश्चित होत नाही, असे चित्र आहे. शिवसेनेच्या यामिनी जाधव, मिलिंद देवरा आणि भाजपाच्या वतीने इथे मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर इच्छूक आहेत. परंतु उत्तर पश्चिममध्ये मात्र शिवसेनेला उमेदवार सापडत नाहीत, अशी परीस्थिती आहे.

गजानन किर्तिकर इथून विजयी झाले होते. महायुतीमध्ये महाराष्ट्रात काही मतदार संघाची अदबाबदल करण्यात आली काही, ठिकाणी देवाण-घेवाणही झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जागा वाटपाबाबत अत्यंत लवचिक धोरण स्वीकारले. मिळालेल्या पाच जागा आढेवेढे न घेता, त्यांनी स्वीकारल्या. प्रचाराचा धुरळा उडवून दिला. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक जागेबाबत आग्रही आहेत. २०१९ च्या लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार होते. त्यापैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे किमान तेवढ्या जागा मिळाव्यात असा त्यांचा प्रयत्न आहे.

उत्तर-पश्चिम मुंबई सुरूवातीला भाजपाच्या वाट्याला जाणार अशी चर्चा होती. परंतु एकनाथ शिंदे ही जागा शिवसेनेलाच हवी यावर ठाम राहिले. गजानन किर्तिकर शिवसेनेसोबत असले तरी त्यांचे वय झाले आहे. शिवाय त्यांचे चिरंजीव अमोल किर्तिकर यांना उबाठा शिवसेनेने उमेदवारी दिल्यामुळे ते इथून लढण्यास फारसे इच्छूकही नव्हते. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची हा पेच कायम आहे.

शिवसेनेकडून काही मराठी कलाकांरांची चाचपणी झाली. त्यात दोन सचिन होते. दोघांशी चर्चा झाली. परंतु त्यांनी साफ नकार दिला. सत्ताधारी पक्षाकडून ऑफर येऊन सुद्धा शिवसेनेच्या तिकीटावर उत्तर-पश्चिममधून लढण्यास दोन मराठी कलाकार तयार नाहीत, हे निव्वळ आश्चर्य आहे. परंतु हे घडताना दिसते आहे. सध्या रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. रवींद्र वायकरही फारसे इच्छूक नाहीत, परंतु त्यांना घोड्यावर बसवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे. वायकर यांनी मतदार संघात फिरायला सुरूवात केलेली आहे. सध्या तरी त्यांच्याशिवाय शिवसेनेला पर्याय दिसत नाही. परंतु वायकर यांची ईडी मार्फत चौकशी सुरू असल्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपा कार्यकर्त्यांकडून नकारात्मक प्रतिक्रीया येऊ शकते. शिवसेनेलाही त्याची जाणीव असल्यामुळे वायकर यांच्या उमेदवारीबाबत आस्ते कदम सुरू आहे.

भाजपाने उत्तर मध्य मुंबईतून एड. उज्वल निकम यांच्यासारखा स्वच्छ प्रतिमेचा, कार्यक्षम आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे घराघरात माहीती असलेला उमेदवार दिला आहे. निकम यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपाने प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचे तिकीट कापण्याचे धाडस दाखवले. पूनम महाजन संघटनात्मक पातळीवर फार सक्रीय नव्हत्या. पक्षाच्या बैठकांमध्ये, कार्यक्रमांमध्ये त्यांचा फारसा सहभाग नसायचा. त्यामुळे भाजपाने इथे भाकरी परतली.
भाजपाने ४०० पारचे लक्ष्य ठेवलेले आहे. त्यामुळे उमेदवाराच्या प्रेमात न पडता, लक्ष्य गाठता कसे येईल याचा विचार भाजपाचे केंद्रीय नेतृत्व करते आहे. भाजपाने गेल्या दोन वर्षात प्रत्येक मतदार संघाचे किमान तीन सर्व्हे करून विद्यमान खासदार आणि संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी करून घेतलेली आहे. भाजपाचा हाती या सर्व्हेची आकडेवारी असल्यामुळे दिल्ली-मुंबईसह अनेक ठिकाणी भाजपाने मागेपुढे न पाहाता वरवंटा चालवलेला आहे.

उत्तर-मध्य मुंबईत भाजपाने चांगला उमेदवार शेजारच्या मतदार संघात दिल्यामुळे शिवसेनेवर उत्तर-पश्चिम मुंबईत चांगला उमेदवार देण्याबाबत निश्चितपणे दबाव वाढणार आहे. कारण एका बाजूला पियूष गोयल आहेत आणि दुसऱ्या बाजूला उज्वल निकम. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना त्याच तोडीचा उमेदवार द्यावा लागणार आहे.

हे ही वाचा..

आमच्याविरुद्ध लढू न शकणारे आमचे फेक व्हीडिओ पसरवत आहेत!

अमित शहांच्या फेक व्हीडिओप्रकरणी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीना समन्स

नागपूर, जयपूर आणि गोवा विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

मानखुर्दमध्ये लव्ह जिहाद: निजामने हिंदू तरुणीची केली हत्या, शरीराचे तुकडे करून भरले बॅगेत!

एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधी गेले तरी खाली मात्र त्यांना करंट नाही, अशा प्रकारचा प्रचार ठाकरे गटाकडून सातत्याने केला जातो. मराठी मीडियाचीही त्याला साथ आहे. लोकसभेच्या निवडणुका हा प्रचार पोकळ आहे, हे सिद्ध करण्याची संधी आहे. ही संधी साधायची असल्यास दमदार उमेदवार मैदानात उतरवणे एकनाथ शिंदे यांना भाग आहे. असे उमेदवार सापडत नाहीत, ही त्यांची चिंता आहे. ठाण्यातही परीस्थिती वेगळी नाही.

मुंबईत २० मे रोजी निवडणुका होणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख ४ मे आहे. उत्तर मुंबईचे उमेदवार पियूष गोयल उद्या ३० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्ते खोलण्यासाठी फार वेळ शिल्लक नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version