महिलांमध्ये विशेष लोकप्रिय काँग्रेस नेते शशी थरूर हे त्यांच्या फर्ड्या इंग्रजीसाठी आणि बिनतोड युक्तिवादासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विधानाची नेहमीच चर्चा होत असते. ‘ लोकसभा निवडणुकीत आमची आघाडी जिंकू शकते. तसे घडले तर पंतप्रधान पद काँग्रेसकडे येईल. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देशाचे पंतप्रधान होतील, काँग्रेस हा कुटुंब संचालित पक्ष असल्यामुळे कदाचित राहुल गांधीही पंतप्रधान होतील. केरळमध्ये थरूर यांनी केलेल्या या विधानामुळे महाराष्ट्रात ठाकरेंना गुदगुल्या होण्याची दाट शक्यता आहे.
केरळच्या तिरुअनंतपुरम येथे एका जाहीर कार्यक्रमात थरूर यांनी पंतप्रधान पदाबाबत हे भाकीत केलेले आहे. थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी खरगे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. खरगेंनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे खरगेंचा वचपा काढण्यासाठी त्यांनी हे विधान केले की काय असा अनेकांना संशय येऊ शकतो. खरगे हे देशाचे पहिले दलित पंतप्रधान बनू शकतील असे विधान करून त्यांनी राहुल गांधी यांना प्रचंड अस्वस्थ केलेले आहे. कधी सत्ता येतेय आणि कधी पंतप्रधान होतोय, अशी अवस्था असलेले राहुल गांधी थरूर यांच्या विधानामुळे अस्वस्थ होतील आणि खऱगेंचा परस्पर काटा काढतील असा बहुधा थरुर यांचा होरा असावा.
केंद्रात काँग्रेसची सत्ता येणार, राहुल गांधी पंतप्रधान होणार ही भविष्यवाणी शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रचंड उत्तेजित आणि रोमांचित करणारी आहे. कारण एकदा का केंद्रात काँग्रेस आली की देशभरात सुरू असलेले ईडीचे खोदकाम पूर्ण बंद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ईडी अतिश्रमाने वाकली आहे. परंतु देशात गेल्या दोन दशकांत झालेल्या भ्रष्टाचाराचेही पुरेसे खोदकाम झालेले नाही. तरीही देशातील तमाम विरोधी पक्ष हवालदील झालेले आहेत.
काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ईडीला सक्तीची विश्रांती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेस सत्तेत येणार ही भावना आज ठाकरेंसह अनेकांच्या दृष्टीने अंतरंग सुखावणारी आहे. थरूर यांच्या विधानामुळे फक्त गांधींच्या नव्हे तर ठाकरेंच्या घराणेशाहीवरही शिक्कामोर्तब होते हा दुसरा मुद्दा. थरूर यांच्या विधानाचे अनेक अर्थ आहेत. पंतप्रधान पदासाठी त्यांनी खरगेंचे नाव घेतले हे समजण्यासारखे आहे. देशाच्या राजकारणात खरगे यांनी काही दशके काढली आहेत. अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. एक अनुभवी दलित नेता, अशी त्यांची ओळख आहे. परंतु थरूर फक्त खरगेंचे नाव घेत नाहीत. ते राहुल गांधींचेही घेतात. हे नाव घेताना थरुर जे कारण पुढे करतात ते प्रामाणिक आहे.
काँग्रेस हा गांधी कुटुंब संचालित पक्ष असल्यामुळे राहुल गांधी देखील पंतप्रधान होऊ शकतात. थरूर यांनी लोकशाहीच्या बाता करणाऱ्या काँग्रेसचे जाहीर वस्त्रहरण केले आहे. गांधी-नेहरू कुटुंबातील व्यक्ति म्हणून राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, असे ते उच्चारवाने सांगतायत. काँग्रेसने पक्षांतर्गत लोकशाहीची कशी तिरडी बांधली आहे, काँग्रेसमध्ये पंतप्रधान बनण्याचा निकष काय, हे थरूर यांच्या विधानामुळे स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे ज्या कारणामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच कारणामुळे राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. क्षमतेशी, पात्रतेशी किंवा अनुभवाशी त्याचा काडीचाही संबंध नाही.
हे ही वाचा:
पाकिस्तानकडून जम्मू सीमेवरील विक्रम चौकीवर गोळीबार; दोन जवान जखमी
पाकिस्तानमधील एअर लाईन्स डबघाईला; २४ उड्डाण रद्द
ड्रग्स प्रकरणी सर्व आरोपी गजाआड; ललित पाटील १५ वा आरोपी
ड्रीम ११ वर दीड कोटी जिंकलेले पीएसआय झेंडे निलंबित
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांची थेट शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली. पक्षाची सूत्रे भविष्यात त्यांच्या हाती राहतील याची व्यवस्था शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्यांच्या पश्चात तसे घडलेही. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. ठाकरे कुटुंबातील असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. कारण शिवसेना हा देखील थरुर यांच्या भाषेत ‘फॅमिली रन’ पक्ष होता. थरूर यांच्या विधानामुळे इंडी आघाडीत खळबळ निर्माण होणार हे नक्की. काँग्रेस पक्ष पंतप्रधानपदाचा दावेदार नाही, असे विधान खरगे यांनी काही काळापूर्वी केले होते. देशात जर मोदीविरोधी आघाडी करायची असेल तर पंतप्रधानपदाचा मनसुबा झाकल्याशिवाय ते शक्य नाही हे खरगेंना चांगले ठाऊक आहे.
इंडी आघाडीत पंतप्रधान होण्याची इच्छा असलेल्या नेत्यांची संख्या किमान अर्धा डझन आहे. पंतप्रधानपदी राहुल गांधींचे नाव ही मंडळी कधीच स्वीकारणार नाहीत. राहुलना पंतप्रधान करण्यासाठी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नीतीश कुमार ही मंडळी आपले खांदे वापरू का देतील? थरूर यांना हे समजत नाही, असे नाही. तरीही त्यांनी खरगेंचे, राहुल यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले. त्यातून त्यांनी खरगेंचा गेम केला आहेत, परंतु एक प्रकारे राहुल गांधी यांच्या बुडाखालीही बॉम्ब ठेवला आहे. थरूर यांच्या वक्तव्याचे दूरगामी परिणाम काहीही होवो, ठाकरे मात्र काही क्षण का होईना सुखावले आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)