लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाला महायुतीच्या कोटाला पडलेल्या भेगा, तडे बुजवण्यात यश येते आहे. मतविभागणीला कारणीभूत ठरणाऱ्या सर्व शक्यता संपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी ताकद पणाला लावली आहे. त्यांना यशही येते आहे. मविआतील सुंदोपसुंदी मात्र संपताना दिसत नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातातील तुरुपाची पाने एका बाजूला फडणवीसांनी काढून घेतली आहेत. दुसरीकडे मविआतील बुरुजांना पडलेली खिंडारे भगदाडांमध्ये रुपांतरित झालेली पाहायला मिळतायत.
लोकसभा निवडणुकीच्या आधी बुद्धीबळाच्या पटावरील सोंगट्या वेगाने हलताना दिसतायत. आपली मतपेढी एकसंध ठेवताना महायुतीच्या मतांमध्ये फाटाफुट होईल अशा सोंगट्या पवार टाकत होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना भाजपापासून दूर करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकी आधी धनगर समाजाला भाजपापासून तोडण्याचे पवारांचे प्रयत्न सुरू होते. बारामती मतदार संघात धनगरांची संख्या मोठी असल्यामुळे तिथेही जानकर नावाच्या हुकूमाच्या पत्त्याचा फायदा होईलच हा हिशोब पवारांच्या खेळी मागे होता. सत्ता काळात धनगर समाजाच्या भल्यासाठी एकही योजना न आणणारे शरद पवार, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे सातत्याने धनगरांसाठी आरक्षणाची मागणी करत होते.
‘एखादी तरी जागा धनगर समाजासाठी सोडण्याची माझी इच्छा आहे’, हे विधान म्हणजे त्याचीच पोच पावती. पवार जानकरांना गाळात घेण्यासाठी गाजराची पुंगी वाजवण्याचे काम करीत होते. रासपाच्या महादेव जानकर यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी जोरदार प्रय़त्न करत होते. दुसऱ्या बाजूला जानकरही राज्यात ४८ जागांवर लढण्याची भाषा करत होते.
फडणवीसांनी सर्वप्रथम जानकरांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले होते. धनगर समाजात जानकरांना मानणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाच्या मतांचा टक्का बऱ्या पैकी असून हा समाजगट भाजपाचा मतदार आहे. भाजपाने कधी काळी सोशल इंजिनिअरींगचा दृष्टीकोन ठेवत ‘माधव’ समीकरणावर काम केले होते. माळी, धनगर, वंजारी समाजात भाजपाचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला यशही मिळाले. अलिकडेच एका भाषणात फडणवीस यांनी ओबीसी हा भाजपा डीएनए असल्याचे वक्तव्य करून आपली बांधिलकी स्पष्ट केली होती. पवार जानकरांना ताब्यात घेऊन हे समीकरण संपवण्यासाठी जोरदार ताकद लावत होते. जानकर पवारांच्या कॅंपमध्ये दाखल होतील, असे चित्र निर्माण झाले असताना एक दिवस अचानक फडणवीसांनी काय खेळी केली कोण जाणे, जानकरांना एक जागा देऊन त्यांना महायुतीत दाखल करण्यात आले.
काल पुरंदरचे माजी आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक विजय शिवतारे यांची भेट घेऊन फडणवीसांनी पवारांना आणखी एक दणका दिलेला आहे. शिवतारे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी सांगून पाडले होते. तेव्हा पासून दोघा नेत्यांमध्ये विस्तव जात नाही. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढणार हे स्पष्ट झाल्यापासून शिवतारे अजित पवारांना आव्हान देत होते. शिवतारेंची पुरंदरमधील ताकद सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूने उभे राहणार की काय, असा सवाल निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात शिवतारे यांनी भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेतली. शिवतारे बारामतीत काही गडबड करण्याच्या तयारीत आहेत, असे चित्र असताना काल देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विजय शिवतारे यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली. पुष्पगुच्छाचे आदान प्रदान झाले. शिवतारे यांनी बंडाचे निशाण खाली उतरवल्याचे संकेत मिळाले.
हे ही वाचा:
भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नवीन जिंदाल यांच्या मातोश्री सावित्री जिंदाल यांचा काँग्रेसला रामराम!
रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द
हैदराबादच्या २७७ धावांपुढे मुंबईची शरणागती
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचार सुरू असलेल्या एमडीएमके खासदाराचा मृत्यू
शिवतारे यांचे बंड ‘मिशन बारामती’साठी अडसर ठरू शकले असते. महायुतीतील एकूणच वातावरण बिघडवण्यास कारणीभूतही ठरले असते. शिवतारे जर अजित पवारांच्या विरोधात विधाने करत असतील तर शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अशी घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. शिंदे-फडणवीसांच्या कुटनीतीमुळे हे घडले नाही, सारे काही पूर्वपदावर आले. महादेव जानकर आणि शिवतारेंना शांत केल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयातील मोठा अडथळा दूर झाला.
एका बाजूला महायुती एकेका जागेचा विचार करून फासे टाकते आहे. शिंदे-फडणवीस-पवारांचे त्रिकूट एकेक मतदार संघ सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असताना मविआमध्ये मात्र एकेका जागेवरून राडे सुरू आहेत. उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगलीचा मुद्दा धगधगता असताना भिवंडीवरून नवा पेच सुरू झाला आहे. भिवंडीची जागा जर पवार गटाच्या वाट्याला आली तर काँग्रेसचे सगळे पदाधिकारी राजीनामा देतील अशी धमकीच स्थानिक नेत्यांनी दिलेली आहे.
सांगलीच्या वादामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मविआच्या बैठकीपासून दूर राहणार असल्याचे समजते. उबाठा गटाने सांगलीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलेला दिसतो. सांगलीचा मुद्दा ताणून काँग्रेसने आपले पंतप्रधानपद धोक्यात आणू नये, असा हास्यास्पद दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर आम्ही खुर्चीसाठी नाही तर देशासाठी लढतो असे अधिक हास्यास्पद उत्तर पटोले यांनी दिले आहे. एकूणच मविआत आनंदी आनंद गडे… इकडे तिकडे वाद झडे, असे वातावरण आहे. वंचित आघाडी आणि स्वाभिमानी राजू शेट्टींनी रागरंग पाहून आधीच काढता पाय घेतलेला आहे.
काँग्रेसवाले दु :खी आहेत. शरद पवारही नाराज आहेत. मविआतील तिन्ही पक्षांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर केले पाहिजे होते, असे म्हणत उबाठा गटावर नाराजी व्यक्त केली आहे. मविआतील साठमारीचा तमाशा पवार मूकपणे पाहातायत. महायुतीसाठी आता फक्त अमरावतीच्या जागेचा तिढा आहे. तिथे नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी दिलेली असली तरी शिवसेनेचे आनंद अडसूळ इथून लढण्याबाबत ठाम आहेत. बच्चू कडू यांनीही राणा यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. अमरावतीमध्ये एकदा अडसूळ आणि कडू यांनी पांढरे निशाण फडकवले की महायुतीसाठी मैदान मोकळे आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)