वारकरी आणि पवारकरी

शरद पवार प्रतिमा बदलण्याच्या तयारीत

वारकरी आणि पवारकरी

वारकरी संप्रदाय आणि भक्ती मार्गात वेगवेगळ्या शक्ती घुसखोरी करतायत. वारकऱ्यांचा वेष धारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. या भावना व्यक्त करण्यासाठी वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली.
पवारांनीही वारकरी परंपरा जोपासण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या मंडळींना दिले.

गेल्या काही दिवसांत पवार जाणीवपूर्वक काही प्रयत्न करताना दिसतायत. त्यात सातत्य आहे, निश्चित अशी दिशा आहे. बदलत्या राजकारणाचे भान आहे. पवार प्रतिमा बदलण्याचा जोरदार प्रयत्न करतायत, असे स्पष्ट संकेत या उठाठेवीतून मिळू लागलेत.

चार दिवसांपूर्वी दिल्लीतील तालकटोरा स्टेडीयमवर त्यांच्यात कार्ल मार्क्स संचारला होता. धर्म ही अफूची गोळी आहे, त्यापासून सावध रहा असा सावधगिरीचा इशारा पवारांनी दिला होता. इथे पवारांनी धर्म म्हणून ज्याचा उल्लेख केला तो हिंदू धर्म होता हे उघड. कारण ते इस्लाम बद्दल नक्कीच बोलणार नाहीत. कारण कुराणातील प्रत्येक वाक्य त्यांना शिरोधार्य आहे. ट्रीपल तलाक हा कुराणाचा आदेश आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. समाजाला धर्माला अफूची गोळी म्हणणारे पवार अचानक कोणाच्याही न कळत. त्याच अफूचे चाटण करताना दिसतायत.

वारकरी पंथातील घुसखोरीमुळे अचानक कोणत्या वारकऱ्यांना कापरं भरलं? त्यांनी या संकटातून बाहेर येण्यासाठी पवारांची भेट का घेतली? पवारांनीही लगोलाग त्यांना सहकार्याचे आश्वासन कसे देऊन टाकले? या बैठकीचे फोटो तात्काळ ट्वीटरवरही अपलोड केले? असे अनेक प्रश्न जाणकारांना पडले आहेत. पवारांनी वारकरी शिष्टमंडळाचा फोटो तर त्यांच्या ट्वीटरवर दिला आहे. परंतु त्यांचे नाव-गाव मात्र स्पष्ट केलेले नाही. हे वारकरी एखाद्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत का, हे देखील स्पष्ट होत नाही.

‘मी नास्तिक नाही, परंतु मला माझ्या आस्थांचे प्रदर्शन करणे आवडत नाही’, असे पवार कितीही म्हणोत ते नास्तिकच आहेत. ‘देशाला रामायण-महाभारताची गरज नाही’, ‘राम मंदीर बांधून कोरोना जाणार आहे का?’ ही विधाने एखाद्या आस्तिक व्यक्तिची असू शकत नाहीत. पवारांनी ही विधाने खासगीत केलेली नाहीत. जाहीरपणे आणि डंके की चोट पे केलेली आहेत. अशी हिंदूविरोधी विधाने केली, की अल्पसंख्यांक तात्काळ खूष होऊन पारड्यात भरभरून मतं टाकतात, असा पवारांचा अनुभव असावा. त्यामुळे राम मंदीरासाठी ट्रस्टची निर्मिती झाली, परंतु बाबरीसाठी ट्रस्ट का बनवला नाही, असे प्रश्न ते उपस्थित करत असतात.

याच मुद्यावरून ‘पवार हे हिंदूविरोधी आहेत, त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका’, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परीषदेने २०२० मध्ये केले होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना हे आवाहन करण्यात आले. सर्वसाधारणपणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यास लोक धजावत नाहीत, परंतु राष्ट्रीय वारकरी परिषदेने मात्र जाहीर पत्रक काढून महाविकास आघाडी सरकारचे रीमोट कण्ट्रोल असलेल्या पवारांशी पंगा घेतला होता.

ही घटना अवघ्या दोन वर्षांपूर्वीची, म्हणजे फार जुनी नाही. त्यामुळे पवार अचानक वारकऱ्यांचे तारणहार कसे बनले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पवारांची कारर्कीर्द पूर्णपणे वादग्रस्त आहे. परंतु जुने वाद हे भ्रष्टाचार, दाऊद टोळीशी संबंध अशा प्रकारचे होते. परंतु अलिकडे त्यांच्यावर जे आरोप होतात ते मात्र पूर्वी कधी झालेले नाहीत. पवार हे हिंदूविरोधी आहेत, नास्तिक आहेत, ब्राह्मण विरोधी आहेत, असे उघडपणे बोलले जात आहे. ते नास्तिक असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीरपणे केला होता. पवारांना याबाबत खुलासाही करावा लागला होता.

हिंदूंना शिव्या घालून राजकारणाची पोळी शेकण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. हिंदू समाज राजकीय दृष्ट्या जागरुक होतो आहे. देशात भाजपाची सत्ता टिकली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे, परंतु भाजपाच्या सत्ताकारणाचे अच्छे दिन आले ते मात्र हिंदुत्वाच्या राजकारणामुळेच आले. पवारांना याची जाणीव होते आहे. त्यामुळे त्यांच्या बोलचालीत गेल्या काही दिवसात काही सुक्ष्म बदल जाणवतायत. छत्रपती संभाजी राजे यांना जेव्हा भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं, तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत, इथे मात्र पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केली, असा टोला पवारांनी लगावला होता.

हे ही वाचा:

के. सुरेश कोस्टगार्डचे १४ वे तटरक्षक दल प्रमुख

समरकंदला पंतप्रधान नरेंद्र मोदी- झी जिनपिंग येणार आमनेसामने

प्रतिमेचे जड झाले ओझे???

भारत-चीन सीमा भागात उभारणार ६०० नवीन गावे

 

पवारांनी अनेकदा छद्मी पणाने देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख पेशवे, श्रीमंत असा केलेला आहे. यातून एकाच वेळी देवेंद्र फडणवीस, पेशवे आणि ब्राह्मणविरोधी एजेंडा राबवला आहे. त्याच पवारांनी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पेशव्यांबद्दल गौरवोद्गार काढले.

पुण्याच्या दगडूशेठ मंदिराला दिलेली भेट, पेशव्यांचे कौतूक, वारकरी शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा ही सगळी उठाठेव म्हणजे हिंदूविरोधी प्रतिमा पुसण्याच्या पवारांच्या रणनीतीचा भाग आहे. सातत्याने होणाऱ्या काँग्रेसच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेसने ए.के.एण्टनी यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली होती. हिंदूविरोधी राजकारणामुळे काँग्रेस रसातळाला गेली असा अहवाल त्या समितीने दिला. या अहवालानंतर काँग्रसने हिंदूविरोधी राजकारण काही सोडले नाही. परंतु राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्या मंदिरातील फेऱ्या मात्र वाढल्या. पवारही येत्या काळात मंदिरांच्या फेऱ्या मारू लागले तर फार आश्चर्य़ वाटायला नको.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version