बारामती, बाबरमती, औरंगमती…

प्रश्न हिंदूंच्या भावनांचा येतो तेव्हा पवारांनी अशी चिंता व्यक्त केल्याचे कधी ऐकीवात नाही.

बारामती, बाबरमती, औरंगमती…

‘देशाच्या साधनसामुग्रीवर पहीला हक्क अल्पसंख्यकांचा आहे’, असे विधान यूपीए-१ च्या कार्यकाळात पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी केले होते. पुढे याच मानसिकतेने यूपीएचा कडेलोट केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या कारणांचे विश्लेषण करणाऱ्या ए.के.एण्टनी समितीने अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणामुळे काँग्रेसला बुडवले असाही एक निष्कर्ष काढला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनमोहन सिंह यांची आठवण होईल असे विधान केलेले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी एक गोष्ट अत्यंत स्पष्ट केली, की हिंदूविरोधाचे राजकारण देशात यापुढे चालणार नाही. हाच नरेंद्र मोदी यांच्या विजयाचा अर्थ होता. मतदारांचा कौल कलम ३७० रद्द करणे, समान नागरी कायदा, राम मंदीर, भ्रष्टाचार मुक्त शासन या मुद्द्यांना होता. परंतु अल्पसंख्यकांच्या मतावर पोसलेल्या पक्षांचे नेते मात्र ही बाब मान्य करायला तयार नाही. २०१४ मध्ये अवघ्या ४४ जागांवर आटोपलेल्या काँग्रेसने जिथे एण्टनी यांचे निष्कर्ष मनावर घेतले नाहीत, तिथे शरद पवार का मनावर घेतील. त्यांचे ताजे विधान हेच सांगून गेले आहे.

‘मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत चिंता वाटवी असे चित्रे देशात पाहायला मिळते आहे’, असे पवार म्हणाले आहेत. ओरीसामध्ये चर्चवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात हे विधान आहे. एकाच पत्रकार परिषदेत पवारांची विधाने परस्परांना छेद देणारी आहेत. कोल्हापूरात काही तरुणांनी स्टेटसवर औरंगजेबाचे चित्र ठेवले, त्यासाठी पुण्यात आंदोलन कशाला? असा प्रश्न पवारांना पडतो. ते याबाबत उद्वेग व्यक्त करतात. तिथे घटना घडली तर तिथेच आंदोलन व्हावे, हा पवारांच्या विधानाचा अर्थ.

 

परंतु ओडीशात चर्चवर हल्ला होतो, म्हणून महाराष्ट्रात ख्रिस्ती समाजाबाबत चिंता व्यक्त करण्यात त्यांना काही गैरवाटत नाही. बरं ओडीशामध्ये भाजपाचे सरकारही नाही. शरद पवारांनी ठरवलेले आहे. मुस्लीम मतांसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने औंरगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर असे केले. परंतु आपण संभाजीनगरला औरंगाबाद असेच म्हणार असे शरद पवारांनी जाहीर केलेले आहे. पवार अल्पसंख्यांकाच्या मतांसाठी काहीही करायला तयार आहेत.

 

मुस्लीम आणि ख्रिस्ती समाजाचा विचार करण्यात किंवा त्यांच्याबाबत चिंता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु जेव्हा प्रश्न हिंदूंच्या भावनांचा येतो तेव्हा पवारांनी अशी चिंता व्यक्त केल्याचे कधी ऐकीवात नाही. श्रद्धा वालकरची अत्यंत निर्घृण हत्या झाली. अनेक तरुणी लव्ह जिहादच्या शिकार बनल्याचे एक नवे प्रकरण दर दोन दिवसांनी लोकांच्या समोर येतेय. पण पवारांना चिंता वाटत नाही. उरूसामध्ये औरंगजेबाचे चित्र नाचवले जाते आहे. पण पवारांना ना त्रास होत, ना ते या प्रकाराचा निषेध करत.

पवारांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे ट्रीपल तलाकचे उघडपणे समर्थन करतात त्यातही पुरोगामी पवारांना काही वावगे वाटत नाही. पवार मनमोहन सिंह यांच्या चुकीतून काही शिकले नाही त्याचे कारणही आहे. भारतातील बहुसंख्यांक समाज हिंदू म्हणून पाठीशी उभा राहात नसेल, पण जातीचे गणित मांडले की पाठीशी येतोच, हा आजवर तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांचा अनुभव राहीलेला आहे. त्यामुळे सेक्युलर नेत्यांना कधी हिंदू मतांबाबत चिंता करावीशी वाटत नाही, त्यांना लव्ह जिहाद ही समस्या वाटत नाही. असे विषय अनावश्यक तापवले जातात, असे मत ते बेधडक व्यक्त करतात.

 

केवळ अल्पसंख्यकांचे हित कुरवाळणारी अशी विधाने करूनही २०२४ मध्ये देशात वेगळे काही घडेल असा पवारांना आशावाद आहे. आपला सर्वसामान्य माणसावर विश्वास आहे, असेही पवार सांगतात. देशातील सर्वसामान्य माणूस शहाणा आहे, एखादा राजकारणी चुकीच्या मार्गावर गेला तर त्याला वठणीवर, असे विधानही पवारांनी केलेले आहे. तरीही त्यांना वाटते की लोकसभा निवडणुकीनंतर देशात वेगळे राजकीय चित्र असू शकेल. सर्वसामान्यांच्या याच राजकीय शहाणपणामुळे नरेंद्र मोदी दोन वेळा देशाचे पंतप्रधान झाले. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जास्त जागा त्यांना मिळाल्या. २०२४ मध्ये पुन्हा तेच येतील अशी भाकीतं देशातील एकजात सर्व राजकीय पंडीतांनी केलेली आहेत. तरीही पवारांचा आशावाद कायम आहे.

हे ही वाचा:

१६ हजाराहून अधिक हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कोल्हापूरमध्ये व्हाट्सऍपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक

पु. ल. स्मृतीदिनानिमित्त रसिकांसाठी पर्वणी!

बीकॉम, मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन्स अभ्यासक्रमांना वाढता प्रतिसाद

पवारांची मोदीविरोधी भाकीतं मीडियातील एका गटाला प्रचंड प्रिय आहेत. त्यामुळे त्याला प्रसिद्धीही मोठी मिळते. गुजरात, आसाम आणि उत्तर प्रदेश वगळता देशातील राज्यात भाजपाविरोधी ट्रेंड आहे, हा ट्रेंड कायम राहीला तर चित्र वेगळं दिसेल, अस पवार म्हणालेत. पवार कायम सोयीची विधानं करीत असतात. राज्यातील ट्रेंड कधीही लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळत नाही. २०१४ मध्ये दिल्लीत आम आदमी पार्टी आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता होती. परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले.

२०१९ मध्ये दिल्लीत पुन्हा आम आदमी पार्टीची सत्ता आली. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आले. परंतु तेव्हाही लोकसभेत भाजपानेच इथे मुसंडी मारली. नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात भरभरून मतं टाकली, त्यांना देशाचे पंतप्रधान बनवले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत जे काही झाले ते चित्र लोकसभेच्या निवडणुकीत दिसेल हा पवारांचा भाबडा आशावाद आहे.
मोदी यांचा पराभव होण्याची शक्यता आजवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही सर्वेमध्ये दिसलेली नाही. अर्थात सर्वे हा काही निवडणुकीचे यशापय़श सांगणारा अचूक मानदंड नाही. हा मानदंड आहे, सर्वसामान्य माणसाकडे असलेली राजकीय समज.

पवार म्हणतात, त्यांचा सर्वसामान्या माणसावर विश्वास आहे, त्याच्या राजकीय शहाणपणावर सुद्धा. त्यात सर्वसामान्य माणसाने सर्व मीडियाविरोधात असताना सुद्धा मोदींना २०१४ मध्ये पंतप्रधान पदावर भक्कम बहुमतासह आरुढ केले. २०१९ मध्ये त्याची पुनरावृत्ती केली. मोदींना कुठेही एण्टी इंकंबन्सीचा फटका बसलेला नाही. उलट त्यांच्या विश्वासार्हता वाढत चालली आहे. कारण सर्वसामान्यांना मोदींचे निर्णय पटतात.

 

मोदी पुन्हा सत्तेवर येतील याची पुरेपुर काळजी विरोधकही घेतायत. हिंदूंना सजग करणारी विधाने करून पवारांनी याची नव्याने झलक दाखवली आहे. पवारांना जर फक्त देशातील अल्पसंख्यकांची चिंता वाटत असेल तर हिंदूंनी त्यांची चिंता वाहणाऱ्या, देशाच्या सुरक्षेची काळजी वाहणाऱ्यांना निवडून दिले तर पवारांनी त्याचे फार वाईट वाटू घेता कामा नये.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version