गौतम अदानींचा कंठ दाटून का आला?

गौतम अदानींचा कंठ दाटून का आला?

देशात मोदी सरकार अस्तित्वात नसून अदानी आणि अंबानी यांचे सरकार आहे. मोदी तर केवळ कठपुतळी आहेत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०२० मध्ये केली होती. पंजाबमध्ये शेतकरी कायद्याच्याविरोधात खेती बचाव आंदोलनामध्ये ते बोलत होते. तुमचा पैसा आणि तुमची जमीन मोदींना त्यांच्या श्रीमंत दोस्तांना बहाल करायची आहे, अशी विखारी टीका राहुल यांनी सभेला उपस्थित जमावासमोर केली. हे एकदाच घडलेले नाही, या बदनामी मोहीमेत
सातत्य आहे. देशाच्या पंतप्रधानांचे नाव दोन बड्या उद्योगपतींसोबत जोडून त्यांना वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

उद्योजक देशाच्या संपत्तीमध्ये भर घालत असतात, परंतु जणू अदानी-अंबानी हे उद्योजक नसून खतरनाक रंगा आणि बिल्ला आहेत, अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्यात आलं. शेतकरी आंदोलना दरम्यान हे चित्र वारंवार दिसलं. पण मोदीविरोधकांचे दुर्दैव असे की त्यांनी निर्माण केलेलं मळभ दूर करण्याची गरज मोदींना कधीच भासत नाही. हे काम परस्पर कोणी तरी करून जाते. यावेळी ते काम शरद पवारांनी केले आहे.

बारामती येथे राजीव गांधी सायन्स, इनोव्हेशन ऍण्ड ऍक्टीव्हीटी सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी पवार कुटुंबियांनी गौतम अदानी आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रीती अदानी यांना निमंत्रण दिलं होतं. शरद पवारांचे नातू आणि शेतकरी कायद्याचे कडवे विरोधक रोहीत पवार अदाणी यांना आणण्यासाठी गेले होते. स्वतः गाडी चालवत त्यांनी अदानी यांना कार्यक्रम स्थळी आणले. यावेळी शेतकरी आंदोलनाच्या आणखी एक कडव्या विरोधक सुप्रिया सुळे यांनी अदानी यांचे पवार कुटुबियांशी संबंध किती जुने आहेत त्याचा उपस्थितांसमोर उलगडा केला. हे संबंध २५-३० वर्षे जुने असून दर दिवाळीला अदानी बारामतीत येतात असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

बारामतीत झालेल्या कार्यक्रमाचा अर्थ केवळ एवढाच आहे की शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणते आणि भावी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले नेते असल्यामुळे अदानींशी संबंध ठेवण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहे. हे संबंध इतके घट्ट आहेत की सुप्रिया सुळे त्यांना गौतमभाई अशी प्रेमळ साद घालतात. दिवाळ सणाला अदानी बारामतीला रिकाम्या हाताने तर जात नसतील? या पवार- अदानींच्या प्रेम संबंधांबाबत आम्हाला आक्षेप असणाचे कारण काय? अदानी हे देशातील मान्यवर उद्योगपती आहेत. अनेक देशांमध्ये त्यांच्या उद्योगाचा विस्तार झाला आहे. देशाच्या आर्थिक विकासात ते घसघशीत भर घालतायत. पण मग प्रश्न पडतो की, ते जर ते इतके आदरणीय आहेत तर पंतप्रधान मोदींना बदनाम करण्यासाठी त्यांचा वापर का करण्यात आला? मोदींसोबत त्यांच्या संबंधांमुळे देश विकला जाईल असे इशारे देणारे, अलबर्ट आईनस्टाईनचे आधुनिक अवतार राहुल गांधी यांना पवारांशी त्यांचे संबंध कसे चालतात?

मोदी सरकारने शेतकरी कायदा आणला त्यात शेतकरी त्यांचा माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेरही विकू शकतात, अशी तरतूद होती. विरोधकांनी या तरतूदीवर प्रचंड गदारोळ केला. अदानी-अंबानींना शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने विकत घेता यावा म्हणून सरकारने ही तरतूद केली असल्याची ओरड विरोधकांनी केली होती.

त्यावेळी शरद पवार यांनी गेली २५ वर्षे दिवाळ सणाला भेटायला येणाऱ्या मित्राची बाजू घेऊन विरोधकांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही. राहुल गांधीना समजवण्याच्याही ते भानगडीत पडले नाहीत. पवारांना कधी कधी उद्योगपतींशी असलेल्या संबंधांचा विसर पडतो. शाहीद बलवा यांना २जी स्पेक्ट्रम प्रकरणात अटक झाली होती. तेव्हा त्यावेळी भाजपामध्ये असेलेल्या एकनाथ खडसे यांनी बलवा यांचे शरद पवार यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तेव्हा पवारांनी कानावर हात ठेवून आपण बलवांना ओळखत नाही, त्यांना कधी भेटलो नाही अशी बतावणी केली. परंतु तेव्हा ख़डसे यांनी विधानसभेत पुराव्यांसह आरटीआयमध्ये काढलेल्या माहितीत पवार बलवांसोबत एकाच चार्टर्ड फ्लाईटमधून दुबईला गेले होते अशी माहीती उघड झाली.

हे ही वाचा:

मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली

पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!

लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपची जय्यत तयारी

अग्निपथ योजनेसाठी केंद्र सरकारने वाढवली वयोमर्यादा

पण देर आये दुरुस्त आये. अदानी यांच्या अपमानाचा बदला पवारांनी अगदी वेगळ्या प्रकारे घेतला आणि त्यांचे गेली २५ वर्षे बारामतीत येणे अगदीच वाया गेले नाही हे त्यांनी सिद्ध केले. राहुल गांधी यांच्या नाकावर टिच्चून रोहीत पवार यांनी अदानी यांचे सारथ्य केले. राहुल गांधी यांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करून सुप्रिया सुळे यांनी अदानी यांनी गौतमभाई अशी कौटुंबिक प्रेमाने भिजलेली हाक मारली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील व्यासपीठावर होते. त्यांच्या ठाकरे सरकारने सत्तेवर आल्यापासून अदानी यांच्या कंपनीला अनेक मोक्याचे प्रकल्प बहाल केले आहेत. सर्वाचा कडेलोट म्हणजे उठसुट अदानी यांचे नाव घेऊन मोदींना दोष देणाऱ्या राहुल गांधी यांच्या पिताश्रींचे नाव पवार कुटुंबियांनी सायन्स सेंटरला दिले आहे. याला म्हणतात बारामतीच्या करामती.

राजकारणात सक्रीय असलेले सर्व पवार बारामतीत झालेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर हजर होते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे देखील मंचावर उपस्थित होते. अदानी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमात भाषण ठोकणे अपेक्षित होते, परंतु अदानी या कार्यक्रमात एकही शब्द बोलले नाहीत. राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानाचा पवार कुटुंबियांनी ज्या प्रकारे वचपा काढला ते पाहून बहुदा त्यांचा उर भरून आणि कंठ दाटून आला असावा.

Exit mobile version