पवारांनी सोयीचा निर्णय घेतला, पण तोच अंगाशी आला

फडणवीसांना हाताळण्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना हाताळणे सोयीचे आहे, असा हिशोब पवारांनी केला होता.

पवारांनी सोयीचा निर्णय घेतला, पण तोच अंगाशी आला

पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोलणी झाली होती. त्यांना याबाबत पूर्ण कल्पना होती, या दाव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरोच्चार केला आहे. सरकार बनवण्याचे ठरले असताना ऐनवेळी पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन संसार थाटला. दोन्हीकडे सत्ता असताना त्यांनी भाजपाला सोडून शिवसेनेचा पर्याय का स्वीकारला त्याची कारणे अगदी स्पष्ट आहेत.

चार महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत गौप्यस्फोट केला होता. २०१९ च्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचे फोन उचलणे बंद केले. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करता येते आहे का, याची चाचपणी सुरू केली. शरद पवारांच्या सोबत चर्चा झाली. मंत्रिमंडळाचे खातेवाटप ठरले. महामंडळांचे वाटपही ठरले. परंतु ऐनवेळी पवारांनी माघार घेतली. भाजपाला अंधारात ठेवून शिवसेना-काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. काल रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी हा विषय अधिक विस्ताराने सांगितला आहे एवढंच.

 

 

चार महिन्यांपूर्वी फडणवीसांच्या मुलाखतीनंतर पवारांची प्रतिक्रिया आली होती. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट कशी उठली असती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले असते? पवारांनी कोणताही आडपडदा न ठेवता अगदी स्पष्टपणे सांगितले कि उद्धव ठाकरे हीच त्यांची निवड होती.

 

 

भाजपासोबत गेले तरी सत्ता होती, तिथेही पवारांचा पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करणार नव्हता. शिवसेनेसोबतही तेच मिळणार होते. परंतु तरही पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची तुलना केली. पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्याने हे पाऊल उचलले त्याचे कारण स्पष्ट आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी पाहीला होता. या काळात त्यांना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला झाकोळून टाकले होते. शिवसेनेच्या मंत्र्याना फार वाव नव्हता. राज्य भाजपा-शिवसेना युतीचे नसून भाजपाचेचे आहे, अशा तऱ्हेने फडणवीस कारभार करत होते. त्यांना हाताळण्यापेक्षा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना हाताळणे सोयीचे आहे, असा हिशोब पवारांनी केला होता.

 

 

उद्धव ठाकरेंना अनुभव नव्हता, पार मेहनत करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे ते नामधारी मुख्यमंत्री राहतील आणि कारभाराची सूत्र आपल्याच हाती राहतील असा होरा पवारांनी बांधला होता. मविआची सत्ता आल्यानंतर पवारांच्या अंदाजानुसार घडत गेले. राज्याची तिजोरी फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी उघडली गेली. राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी मिळाल्याचे आकडे समोर आले.

 

 

शिवसेनेचे आमदार हताश व्हावेत इतपत सरकारी यंत्रणा राष्ट्रवादीच्या बाजूला कलली होती. उद्धव ठाकरेंकडे तक्रार करून सुद्धा न्याय मिळत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावही राज्यात वाढत होता. मविआच्या सत्ताकाळात ग्रामपंचायत, नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचे निकाल राष्ट्रवादीला सत्ता फळली आहे हे स्पष्ट सांगत होते.

 

पवारांचा गेम प्लान यशस्वी ठरला असता परंतु कोरोना महामारीमुळे सगळी गणितं उधळली गेली. राज्यावर संकट कोसळलेले असताना दिवसरात्र काम करणारे नेतृत्व हवे होते. त्या काळात उद्धव ठाकरे घरी बसून राहिले. मविआच्या नेत्यांना त्यांना भेटायचे असेल तर त्यांच्या घरी जावे लागे. पवारांना भेट हवी असेल तर रश्मी ठाकरे यांच्याकडून वेळ घेऊन त्यांना जावे लागे. इथेच पवार फसले.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला पवारांचे गोलमोल उत्तर

येणार तर ‘नरेंद्र मोदीचं’; नितीन गडकरी यांची ‘भविष्यवाणी’ !

केदारनाथमध्ये खेचरांनी हेलिकॉप्टरपेक्षा २६ कोटी अधिक कमावले!

वीरेंद्र सेहवाग म्हणतो, यंदाचा वर्ल्डकप विराटसाठी जिंका!

 

सर्वसामान्य जनता भडरली जात असल्यामुळे असंतोषाचे खापर सरकारवर फोडले जाणार हे निश्चित होते. प्रशासन ठप्प होते, सरकार कुचकामी असल्याचे चित्र निर्माण झाले होते. राज्याचा मुख्यमंत्री घरी बसलाय, अशी टीका करून विरोधकांनी मविआला सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे पवार सुद्धा नाराज होते. आता मुख्यमंत्र्यांवर खापर फोडले नाही, तर त्याचा फटका राष्ट्रवादीलाही बसेल असे चित्र निर्माण झाल्यानंतर पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली होती. पुढे लोक माझे सांगाती या आत्मचरीत्राच्या दुसऱ्या भागात, त्यांनी उरली सुरली कसर काढून टाकली.

 

 

उद्धव ठाकरेंना राज्यातल घडामोडींची बित्तंबातमी नसे, उद्या काय घडेल याचा अंदाज घेण्याची क्षमता नव्हती, राजकीय चातुर्याचा अभाव होता, अनुभव नसल्यामुळे सगळं घडत होते. मुख्यमंत्री त्यांच्या कारकीर्दीत फक्त दोनदा मंत्रालयात जाणे लोकांच्या पचनी पडले नाही, या शब्दात पवारांनी ठाकरेंवर झोड उठवली. पवारांच्या टीकेचा अर्थ स्पष्ट होता.

 

 

फडणवीसांचा गेम करण्यासाठी त्यांनी ठाकरेंना झुकते माप दिले होते. परंतु ठाकरेंच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांचा गेम उधळला गेला. पवारांच्या खेळीमुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. परंतु शिवसेनेचा झालेला फायदा तात्कालिक होता हे आता स्पष्ट झाले आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळाले, परंतु आधी मुख्यमंत्री पद गेले, नंतर पक्ष फुटला, आता ठाकरे नाव-चिन्ह नसलेल्या पक्षाचे धनी झाले आहेत. हिंदुत्ववादी मतं गमावलेल्यामुळे आता अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करण्याची वेळ ठाकरेंवर आली आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version