राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यव्यापी दौरा काढतायत. पवार तेच करतायत जे वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केले होते. फरक एवढाच आहे की, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याची फक्त घोषणा केली होती. पवार फक्त घोषणा करून थांबणार नाहीत. ते प्रत्यक्षात मैदानात उतरतील. एकूण चित्र पाहता पवार आता ठाकरे यांच्या मार्गाने जातायत असे दिसते. ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालतील अशी शक्यता.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भाळी एकच भवितव्य लिहिलेले आहे हे वर्षभरापूर्वी कोणी म्हटले असते तर त्यावर कुणी फार विश्वास ठेवला नसता. राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची म्हणजे ५४ पैकी ३६ आमदार फोडणे गरजेचे होते, अजित पवारांना हे झेपणार नाही, असे सगळे मानत होते. परंतु, आज ते घडलेले दिसते आहे. अजित पवार तीच भाषा बोलतायत जी पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे बोलत होते आणि शरद पवार तेच करतायत जे ठाकरे यांनी केले होते.
सुप्रिया सुळे यांनी बाप चोरल्याचा आरोप अद्यपि केलेला नसला तरी फुटीरांनी आपला फोटो वापरू नये अशी सक्त ताकीद थोरल्या पवारांनी दिलेली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा कटप्पा केला आहे. ते थोरल्या पवारांच्या पाठीत वार करीत असल्याची पोस्टर्स दिल्लीत लागली आहेत. हा लढा आता, जनता, निवडणूक आयोग आणि न्यायालय अशा तीन पातळीवर लढला जाईल असे दिसते. म्हणजे जे ठाकरेंनी केले तसेच. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, गरज पडली तर कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवू असे विचित्र विधान थोरल्या पवारांनी केलेले आहे.
२०२२ मध्ये पवारांची अध्यक्षपदी झालेली निवडणूक बेकायदेशीररित्या झाली होती, असा आक्षेप अजित पवार यांच्या गटाने घेतला आहे. थोरल्या पवारांना हटवून अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा ताबा घेतलेला आहे. आता या दाव्याचा आधार काय आहे, हे अद्यापि गुलदस्त्यात आहे. परंतु जे काही झाले आहे ते नियोजनपूर्व आणि पद्धतशीर झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई जिंकली त्यात या नियोजनाचा भाग अधिक होता. त्यामुळेच कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्यासारखे दिग्गज उभे करूनही ठाकरेंच्या वाट्याला पराभव आला. शिवसेना फुटली तेव्हा पक्षाच्या घटनेत केलेले बदल निवडणूक आय़ोगाला कळवले नसल्यामुळे नव्या घटनेनुसार केलेल्या नियुक्त्या बेकायदा ठरल्या आणि लोकप्रतिनिधींच्या संख्याबळावर पक्ष कोणाकडे हे ठरले. आता पवारांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदा ठरल्याचा दावा अजित पवार यांनी केली आहे.
हे ही वाचा:
भारताचे पुरी जगन्नाथ मंदिर किती श्रीमंत आहे?
गुहागारच्या कासवाचा श्रीलंका दौरा
चांद्रयान ३ झेपावणार १४ जुलैला आणि चंद्रावर उतरणार २३ ऑगस्टला
सांताक्रूझच्या बड्या रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरांचा लैगिंग छळ, सहकारी डॉक्टर विरोधात गुन्हा
दिल्लीच्या अधिवेशनात शरद पवारांना मतदान केलेल्या मतदारांची कोणतीही नोंद नाही. पक्षातील अन्य नियुक्त्या पक्षाच्या घटनेनुसार झाल्या नसल्याचा दावा अजित पवार यांनी केलेला आहे. आम्ही कायदेशीर सल्ला घेऊनच पावले उचललेली आहेत, असे भुजबळ म्हणतायत. त्यामुळे अजित पवार गट निवडणूक आय़ोगासमोर नेमक्या कोणत्या कायदेशीर त्रुटीवर बोट ठेवून पवारांची अध्यक्षपदी नियुक्ती बेकायदा ठरवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शिवसेना फुटल्यानंतर अचानक उदयाला आलेले घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचे नव्या दमाने चॅनलच्या पडद्यावर आगमन झालेले आहे. गेल्या वेळी जितक्या ठामपणे ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होणार असे ठामपणे सांगत होते तितक्याच ठामपणे पक्षाचे नाव आणि चिन्ह शरद पवारांच्याकडेच राहणार असे सांगतायत. त्यामुळे थोरल्या पवारांचे समर्थक जास्त धास्तावले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शिउबाठाची बैठक झाली. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी महाप्रबोधन यात्रा काढण्याची घोषणा केली. महाराष्ट्र पिंजून काढणार असे ठाकरे पक्ष फुटल्यानंतर अनेकदा बोलले असले तरी प्रत्यक्षात वज्रमूठ आणि निर्धार सभांचा अपवाद वगळता ते घरातून बाहेर पडले नाहीत. ठाकरे घरातून बाहेर पडून फायदा तरी होता. कारण नेते गेले तरी पक्षाची संघटना त्यांना काही प्रमाणात आपल्याकडे वळवता आली असती. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर मात्र असा दौरा काढण्याचा थोरल्या पवारांना फार फायदा होईल असे दिसत नाही. कारण मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे हमखास मतदार संघ असलेल्या नेत्यांना एकत्र करून बांधण्यात आलेली मोट होती. हे नेते त्या त्या मतदार संघाचे संस्थानिक होते. वर्षोनुवर्षे सरकारमध्ये असल्यामुळे सरकारचा भरपूर पैसा ओतून त्यांनी हे मतदारसंघ बांधले होते. पवारांच्या दौऱ्याने या परिस्थितीत फार फरक पडेल असे दिसत नाही.
शिवसेना फुटल्यानंतर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना सांत्वना दिली होती. आता ते शरद पवारांना सांत्वना देतायत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर राहुल गांधी यांनी सहा जनपथ या पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा केली. उद्धव ठाकरेंबाबत जे काही घडले कारण त्यांना अनुभव नव्हता, राजकीय चातुर्य नव्हते. परंतु पवारांकडे राजकीय चातुर्याचा एकाधिकार असताना त्यांच्यावर तीच वेळ का यावी? कारण एकच आहे समय बडा बलवान! मी देवाचा बाप आहे, असे म्हणणे आणि असणे यात फरक असतो.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)