पवारांची संघर्षयात्रा काय घडवणार?

थोरल्या पवारांचा नाईलाज आहे. एखाद् वेळी पावसात भिजणे वेगळे. ८०० किमीची यात्रा काढणे वेगळे

पवारांची संघर्षयात्रा काय घडवणार?

दसऱ्याचे फक्त दोन मेळावे महाराष्ट्राला ठाऊक होते. एक शिवतीर्थावर आय़ोजित करण्यात येणारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा, दुसरा नागपुरातील रेशीमबागेत होणारा रा.स्व.संघाचा विजयादशमी उत्सव. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा किंवा त्यांच्या पक्षाचा तसा विजयादशमीशी संबंध नाही. परंतु यंदाच्या वर्षी त्यांनीही जाहीर सभा घेतली. युवा संघर्ष यात्रेला हिरवा कंदील दाखवला.

 

पुढील वर्षी महाराष्ट्र विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फुटलेल्या पक्षातील आपल्या वाट्याला आलेल्या एका तुकड्यात जान फुंकण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी पवार नातवाच्या साथीने संघर्ष करताना दिसत आहेत. पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्याकडे या युवा संघर्ष यात्रेचे नेतृत्व आहे. पुणे ते नागपूर अशीही ४५ दिवसांची संघर्ष यात्रा निघणार आहे. यात्रेचा पल्ला सुमारे ८०० कि.मी.चा आहे.

 

‘सरकारला सत्ता हाती ठेवायची असेल तर संघर्ष करणाऱ्या या युवांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही’, असा इशारा पवारांनी दिलेला आहे. यात्रा अद्यापि सुरूही झालेली नाही, परंतु सरकारला कंत्राटी भरती रद्द करावी लागली हे यात्रेचे यश असल्याचा दावा थोरल्या पवारांनी केलेला आहे. पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा हा संघर्ष नेमका कोणासाठी आहे? पुन्हा सत्ता मिळण्यासाठी की लोकांच्या भल्यासाठी या प्रश्नाचे उत्तर जनता शोधते आहे.

 

रोहित पवारांच्या या यात्रेचे नामकरण युवा संघर्ष यात्रा असेच का करण्यात आले असावे ? मविआने सत्ता गमावल्यावर ठाकरे पिता-पुत्रांनी शिवसंवाद, शिवबंधन, महाप्रबोधन अशा वेगवेगळ्या यात्रा काढल्या. निर्धार मेळावे घेतले.
रोहित पवारांनाही पक्षाच्या प्रकृती प्रमाणे लोकशाही बचाव, घटना बचाव, असे काही नाव ठेवता आले असते. युवा संघर्ष यात्रा असे नामकरण करण्याचे कारण काय? कारण एकच, ही एकमेव यात्रा आहे जिने महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना दणका दिला. राज्यात सत्ता पालट घडवला.

हे ही वाचा:

गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!

ड्रग्ज प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी दादा भुसे यांची सुषमा अंधारे यांना नोटीस!

निलेश राणेंनंतर सुशीलकुमार शिंदेंचाही राजकारणाला ‘जय महाराष्ट्र’

समाजाचे विघटन करून आपापसातील संघर्ष वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत!

 

संघर्ष यात्रा म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेला दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आठवतात. त्यांनी शिवनेरी ते शिवतीर्थ दरम्यान १९९४ मध्ये काढलेली यात्रा महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. या यात्रेने अशी काही धग निर्माण केली की राज्यातील काँग्रेसचे सरकार धाराशाही झाले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या नेत्याने या यात्रेच्या निमित्ताने शरद पवारांना लक्ष्य केले होते. माफिया दाऊद इब्राहीमशी पवारांचे संबंध आहेत, असा आरोप करून मुंडे यांनी महाराष्ट्रात धुरळा उडवून दिला. शरद पवारांनी मोठ्या कष्टाने जोपासलेली, अभ्यासू आणि पुरोगामी प्रतिमा मुंडे यांनी धुळीस मिळवली. लोकांच्या मनात पवारांच्या बाबत इतका जाळ निर्माण केला की १९९५ मध्ये त्यांच्या काँग्रेसचे पतन झाले. राज्यात शिवशाहीचे पहिले सरकार आले.

 

संघर्ष यात्रा असे नामकरण करून पवारांनी सत्ता परिवर्तनाचा इरादा व्यक्त केला आहे. मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली तेव्हा त्यांचे वय ४५ वर्ष होते. शरद पवार तोपर्यंत चौथ्यांदा आणि अखेरचे मुख्यमंत्री झाले होते. पवार आता ८३ वर्षाचे आहेत. निवृत्तीच्या वयातही त्यांना संघर्षाच्या मार्गाने जावे लागते आहे. ८०० किमी लांबीच्या युवा संघर्ष यात्रेचे नेतृत्व स्वत: न करता पवारांनी त्यांचे नातू रोहीत पवार यांच्याकडे सोपवले आहे. हा थोरल्या पवारांचा नाईलाज आहे. कारण वयाची ऐशी वर्षे उलटल्यानंतर एखाद् वेळी पावसात भिजणे वेगळे. ८०० किमीची यात्रा काढणे वेगळे.

 

मुंडे यांच्या संघर्ष यात्रेमुळे लढवय्या नेता अशी मुंडे यांची प्रतिमा निर्माण झाली. या यात्रेच्या दरम्यान मुंडे यांनी वाड्या-वस्त्यांमध्ये मुक्काम करून लोकांशी संवाद साधला. भाजपाला राज्यभरात मजबुती दिली. रोहित पवारांची संघर्ष यात्रा तोंडात चमचा सोन्याचा चमचा घेऊन घराणेशाहीमुळे राजकारणात आलेला नेता ही प्रतिमा पुसण्यासाठी आहे. आमदार होण्यासाठी, सत्तेची फळे चाखण्यासाठी रोहित पवारांना कोणताही संघर्ष करावा लागला नाही. परंतु राज्यात सत्ता पुन्हा मिळण्यासाठी रोहित पवार संघर्षाला नव्याने सुरूवात करतायत ही चांगली गोष्ट आहे. एका संघर्ष यात्रेने महाराष्ट्रातील पवारांचे सरकार घालवले होते. त्या पवारांचे नातू संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विरोधात एल्गार करीत आहेत.

 

या यात्रेमुळे राज्यात सत्तापालट घडेल का? हा प्रश्न फार दूरचा आहे. अजित पवारांच्याकडे असलेल्या आमदार आणि नेत्यांची संख्या सतत वाढते आहे. फुटीने ग्रासलेल्या पवारांचा उरला सुरलेला पक्ष एकसंध राहीला, शिल्लक असलेली टाळकी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली कायम राहीली तरी हे युवा संघर्ष यात्रेचे यश म्हणावे लागले. यात्रेचा चेहरा रोहीत पवारांना बनवण्यात आले असले तरी हे थोरल्या पवारांचेच शक्तीपरीक्षण आहे, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version