दमलेल्या बाबाची बतावणी…

सुप्रिया सुळेंच्या हाती पक्षात गदारोळ माजेल याचा अंदाज पवारांनाही आला नाही

दमलेल्या बाबाची बतावणी…

“शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी जिंकलेलो नाही.” १०५ आमदारांचे पाठबळ असताना ज्या देवेंद्र फडणवीसांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खेळीने मात दिली, तेव्हा ते मनात हेच म्हणाले असतील. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर सुरू झालेला हा खेळ अजून संपलेला नाही. मविआचे सरकार गेले, शिवसेना फुटली, राष्ट्रवादीची शकलं झाली. उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवारांनीही पक्ष आणि चिन्ह गमावले, तरीही खेळ सुरू आहे. परंतु एकतर्फी आणि निरस झालाय. कारण ही बाजी पलटवण्यासाठी हुकुमाचा एकही पत्ता पवारांकडे दिसत नाही.

निवडणूक आय़ोगाने जेव्हा शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केले, त्याच दिवशी शरद पवारांनाही ठाकरेंच्या मार्गाने जावे लागणार अशी चर्चा होती. काल मंगळवारी तेच घडले, अजित पवारांची सरशी झाली. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह त्यांना बहाल केले. सुप्रिया सुळे यांनी या मागे अदृश्य शक्तीचा हात दिसतोय. खरे तर त्या शेतकरी आहेत, त्यांना ठाऊक असायला हवे की, वांग्याचे तरू पेरता तेव्हा वांगीच उगवतात. टोमॅटो कसे उगवतील? जितके पेरले त्याच्या किती तरी पट उत्पन्न मिळते. विकून दहा कोटीचे उत्पन्न मिळावे इतके. शरद पवारांनी २०१९ मध्ये जे काही पेरले होते तेच आता अनेक पटीने त्यांच्याकडे परतलेले दिसते आहे.

प्रत्येक युद्धाचे काही नियम असतात. महाभारतात कोवळ्या अभिमन्यूला दुर्योधन, कर्ण, दु:शासन, अश्वत्थामा, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनी अकेला समजून घेरून मारले तेव्हाच भीम कमरेखाली प्रहार करून दुर्योधनाची मांडी फोडणार हे निश्चित झाले होते. सर्वात मोठ्या पक्षाला घरी बसवण्याचा टेंभा मिरवणाऱ्या पवारांच्या पक्षातील नेत्यांना आता नैतिकता सुचते आहे. सुप्रिया सुळे यांना अदृश्य शक्तीचे भास होतायत. पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाची फेरमांडणी करायची होती. त्यांना फक्त भाजपाला शह द्यायचा नव्हता, फक्त देवेंद्र फडणवीसांना खच्ची करायचे नव्हेत, त्यांना शिवसेना खिशात घालायची होती. संजय राऊतांना हाताशी धरून ठाकरेंना कडेवर घेण्याचा प्रयत्न ते बराच काळ करत होते. २०१९ मध्ये त्यांना हे शक्य झाले. ठाकरे नामधारी मुख्यमंत्री म्हणून बसले असले तरी सत्तेची सूत्र पवारांच्या हाती आली होती.

शिवसेनेसोबत सत्तेत भागीदार असताना ठाकरे नावाचा खुळखुळा आपण कसा व्यवस्थित वाजवत आहोत हे वेळोवेळी लोकांसमोर येईल असा प्रयत्न त्यांनी केला. लोक माझे सांगाती… या आत्मचरित्रात त्यांनी उद्धव ठाकरेंचे केलेले वस्त्रहरण त्याचाच भाग होता. पवारांच्या अपेक्षेनुसार शिवसेना आटत गेली. ठाकरे कुचकामी आहेत, हा संदेश लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचला. परंतु शिवसेनेला आपण खिशात घातले आहे, असा पवारांचा पक्का समज होईपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा कार्यक्रम केला. पवार-ठाकरेंच्या सत्तेचा सारीपाठ उधळून लावला. इथून पवारांच्या राजकारणाची गोची सुरू झाली. आधी शिवसेना फुटली, पाठोपाठ राष्ट्रवादी.

लोक माझे सांगातीमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यावरून शिवसेनेत संघर्ष माजेल, याचा आम्हाला अंदाज नव्हता. हा उद्रेक शमवायला शिवसेनेचे नेतृत्व (म्हणजेच ठाकरे) कमी पडले असे पवार म्हणाले होते. हा अंदाज पवारांनाही आला नाही. जे ठाकरेंच्या बाबत घडले तेच त्यांच्याबाबतही घडले. त्यांचे अनेक अंदाज चुकले. अनेक गणितं फसली.

सुप्रिया सुळे यांच्या हाती पक्षाची सूत्र सोपवण्याची तयारी पवारांनी सुरू केली होती. त्यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदावर बढती देण्यात आली. तेव्हा पक्षात गदारोळ माजेल याचा अंदाज पवारांनाही आला नाही. या घोषणेनंतर पक्षाच्या कार्यकारीणीत मान खाली घालून पाण्याच्या रीकाम्या बाटलीशी चाळा करणाऱ्या अजित पवारांची अस्वस्थता थोरल्या पवारांच्याही लक्षात आली नाही. अजित पवार अस्वस्थ असले तरी फार काही करू शकत नाहीत, दोन तृतीयांश पक्ष सोबत नेण्या इतपत ताकद त्यांच्याकडे नाही, या गैरसमजात पवार राहिले आणि पक्षाची फूट पाहणे त्यांच्या नशिबी आले. ठाकरे अंदाज बांधू शकले नाहीत कारण त्यांच्याकडे अनुभव नव्हता, पवारांची खेळी कशी फसली?

पवारांनी आयुष्यभर फोडाफोडीचे राजकारण केले म्हणून उतारवयात त्यांच्याही वाट्याला तेच आले, असे म्हटले जाते, परंतु त्यात फारसे तथ्य नाही. औरंगजेबाने सत्तेसाठी बापाला कैद केले, भावांना ठार केले, परंतु त्याच्या वाट्याला मरताना हे भोग आले नाहीत. केलेली कर्म कशी परततील त्याचा नेम नाही, परंतु ती परततात हे नक्की. पवारांचे अंदाज फक्त ठाकरेंबद्दल चुकले नाहीत. लोक माझे सांगातीचा तिसरा भाग त्यांनी लिहिलाच तर त्यांचे अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबतही कसे चुकले याचा गोषवारा त्यांनी आठवणीने द्यावा.

हे ही वाचा:

शिकागोमध्ये हल्ला झालेल्या भारतातील विद्यार्थ्याकडून मदतीची हाक

शरद पवार गटाला मिळाले नवे नाव… नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

ऑस्ट्रेलियातील खासदाराने भगवतगीतेच्या साक्षीने घेतली शपथ

कर्नाटक: खोदकामात सापडली राम लल्लासारखी प्राचीन विष्णू मूर्ती आणि शिवलिंग!

शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या ताब्यात दिला म्हणून पवारांचे राजकारण संपले नाही. हे घडले नसते तरी ते संपले असते. ज्या फोडाफोडीच्या राजकारणात पवार वाकबगार आहेत, त्याच तंत्रात पवारांपेक्षा जास्त कुशलता दाखवून फडणवीसांनी त्यांच्यावर मात केली. पक्षाच्या चाव्या खानदानाच्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक प्रभावी नेत्याच्या वाट्याला त्याचा प्रभाव संपल्यानंतर जे येते तेच पवारांच्या वाट्याला आलेले आहे. जनमानसाचा अचूक अंदाज असलेले अनेक नेते घरातच जन्मलेल्या राहुल गांधीना ओळखू शकत नाहीत ही बात कोड्यात टाकणारी आहे.

शरद पवारांना काका, मामा नव्हते, त्यांनी शून्यातून पक्षाची निर्मिती केली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. शरद पवारांनी शून्यातून नाही, तर कधी काँग्रेस फोडून पक्ष निर्माण केला तर कधी शिवसेनेसारख्या पक्षातून उचलेगिरी करून पक्ष वाढवला. फोडाफोडीचे राजकारण ही पवारांची ताकद होती ती आता क्षीण झाली आहे. या खेळात त्यांच्या पेक्षा मातब्बर लोक उतरले आहेत. त्यामुळे पवारांकडून काही करीष्मा होईल याची अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी करून नये. शून्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पक्षाला चमत्कार करून वाचवता येईल, असे काही त्यांच्याकडे शिल्लक आहे का याची चाचपणी करावी.

शरद पवार हाच आमचा पक्ष, हेच आमचे चिन्ह, असा निष्ठावान दावा करणाऱ्या नेत्यांना थोरल्या पवारांकडून अजूनही चमत्काराची अपेक्षा आहे. वठलेल्या झाडाला पालवी फुटेल अशी आशा धरून ते बसले आहेत. शरद पवारांचे राजकारण संपले आहे, हे लक्षात येण्यासाठी आता फार वाट पाहावी लागणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version