ईडीच्या धाकाने अजित पवार आणि अन्य नेते भाजपासोबत गेले, आपण मात्र विचारांशी तडजोड करणार नाही, असा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे अजित पवार यांच्यासोबत झालेल्या गोपनीय बैठकीचा मोठा गाजावाजा झाला. महाराष्ट्रातील I.N.D.I.A. आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर उडालेला धुरळा शमवण्यासाठी थोरल्या पवारांनी हे ताजे विधान केले असण्याची शक्यता आहे. २०१४ पासून शरद पवारांची भाजपाबाबतची भूमिका धरसोडीची आहे. अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले असताना थोरले पवार I.N.D.I.A. आघाडीसोबत राहून भाजपासाठी काम करतायत का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्यानंतर महाराष्ट्रातील I.N.D.I.A. आघाडीत खळबळ उडाली आहे. ‘मी पवार कुटुंबियात वडीलधारा आहे, अजित हा माझा पुतण्या आहे, त्यामुळे त्याला भेटलो तर बिघडले काय?’ असा सवाल त्यांनी केला. परंतु, ही सबब कुणालाही पटली नाही. पवारांचे चेले संजय राऊत यांनाही नाही. ‘आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत चहा प्यावा काय? तुम्ही नातीगोती जपायची, एकमेकांसोबत चहा प्यायचा आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडायची काय’, असा सवाल ही त्यांनी केला.
बहुधा मविआच्या सत्ताकाळात सप्टेंबर २०२० मध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट संजय राऊत विसरले असावेत. ‘फडणवीसांना बंकरमध्ये भेटलो नाही, उघड उघड भेटलो, सामनामध्ये फडणवीसांची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी त्यांची भेट घेतली’, असा खुलासा राऊत यांनी त्यावेळी केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वैर नसते, संवाद असतो, अशी मखलाशी तर त्यांनी अनेकदा केलेली आहे. मग शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीने अचानक त्यांच्या मनात संभ्रम का निर्माण व्हावा. हा संभ्रम त्यांनी बोलून दाखवला आहे. राऊतांनी ज्या मुलाखतीसाठी फडणवीसांची भेट घेतली ती मुलाखत अद्याप सामनामध्य प्रसिद्ध झाल्याचे कुणी पाहिलेले नाही.
काका- पुतण्या यांच्या पुण्यातील भेटीनंतर मातोश्रीवर खलबतं झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊतही तिथे होते. दोन्ही पवारांच्या भेटीबाबत बोलताना शिउबाठाचे नेते संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात जी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे ती, चिंताजनक, ताबोडतोड थांबायला हवी, फार काळ राहता कामा नये’.
‘पटोलेंनीही या संभ्रमावस्थेबद्दल स्पष्टता द्या’, असे आवाहन शरद पवारांना केले. आता इतकी खळबळ उडाल्यानंतर शरद पवारांना बोलणे भाग होते. मविआतील दोन्ही मित्र पक्षांनी त्यांना जाब विचारला होता. त्यामुळे मामला गंभीर होता. म्हणूनच ‘ईडीच्या धाकामुळे पक्षातील काही सहकारी तिथे गेले’, असे विधान करून व्हीक्टीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
शरद पवारांच्या दाव्यात फारसे तथ्य नाही. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी- भाजपाच्या छुप्या संवादाबाबत सविस्तर सांगितले आहे. २०१४ ते २०२२ या काळात भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४, २०१७, २०१९ आणि २०२२ अशी चार वेळा बोलणी केली. या चर्चांबाबत शरद पवारांना माहिती होती. काही वेळा त्यांचा पुढाकार होता. त्यामुळे ईडीच्या धाकाचे जे कारण शरद पवार सांगतायत, त्यात फारसे तथ्य नाही.
‘भाजपाची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही, भाजपाबाबत माझ्या भूमिकेत कोणताही बदल नाही’, असे थोरले पवार म्हणाले, असले तरी मविआतील मित्र पक्षांचा त्यावर फारसा भरोसा दिसत नाही. संजय राऊत यांच्या विधानावरून उद्धव ठाकरे यांचा पवारांबाबत भ्रमनिरास झाला असण्याची दाट शक्यता वाटते. मविआमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, हे पटोले आणि संजय राऊत यांनी मान्य केलेलेच आहे.
अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन वेळा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एकदा सिल्वर ओकवर आणि आता पुण्यात. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या वेळीही काका-पुतणे एका मंचावर होते. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर हे वारंवार होत असल्यामुळे मविआतील मित्रपक्षांची झोप उडाली आहे.
हे ही वाचा:
फाळणी अर्थात ‘विभाजन विभिषिका दिनी’ स्मरण !
जाधवपूर विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या डायरीतील पत्र चर्चेत
NEET परीक्षेतील अपयशाने मुलाचा मृत्यू; वडिलांनीही संपवलं आयुष्य !
“तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का?”
१ सप्टेंबरला मुंबईत I.N.D.I.A. आघाडीची बैठक आहे. या बैठकीची जबाबदारी मविआवर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जागा I.N.D.I.A. ताकदीने लढवेल, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरेही १ सप्टेंबरच्या बैठकीसाठी कामाला लागले आहे. असं काही घडायला लागलं की शरद पवार काही तर संशयाचे वादळ निर्माण करतात. जेणे करून मविआमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होईल.
भाजपाने पवारांना दोन ऑफर दिल्या आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष पद किंवा कृषी मंत्री पद. अजित पवार याच ऑफरबाबत चर्चा करण्यासाठी त्यांना पुण्यात भेटायला गेले होते, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. अलिकडे पृथ्वीराजबाबाही बरेचदा हवेत बोलतात. एकनाथ शिंदे ११ ऑगस्टनंतर मुख्यमंत्री राहणार नाही, असे ते म्हणाले होते. प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. त्यामुळे त्यांच्या या ताज्या गौप्यस्फोटात फार तथ्य असण्याची शक्यता नाही. परंतु, भाजपाचा लाभ करून देण्यासाठी भाजपासोबत जाण्याची गरज नाही. I.N.D.I.A. आघाडीत संशय कल्लोळ निर्माण करूनही पवार भाजपाचे काम फत्ते करू शकतात. संजय राऊत म्हणतात पवार हे भीष्म आहेत. परंतु, महाभारत युद्धात जी भूमिका शल्याने पार पाडलेली तीच भूमिका I.N.D.I.A. आघाडीत शरद पवार पार पाडतायत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)