राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल एनडीटीव्हीवर मुलाखत झाली. ही मुलाखत म्हणजे जुळवून आणलेला योग होता. पवारांनी काही गोष्टी बोलाव्यात हाच या मुलाखतीचा उद्देश होता. तो सफलही झाला. पवार जे बोलले त्यातून देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बत्ती गुल करणाऱ्या या मुलाखतीने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
एनडीटीव्हीचे मुख्य संपादक संजय पुगलिया मुलाखत घेताना इतके वाकत होते, की काही वेळात ते लोटांगण घालतील की काय अशी शंका येत होती. गौतम अदाणी यांचा हा करीष्मा दुसरं काय. पवारांनी सुमारे अर्ध्या तासाच्या मुलाखतीत जे काही सांगितले त्यातले ठळक मुद्दे विरोधकांना उताणे पाडणारे आहेत. मविआच्या वळचणीला आलेल्या पाळीव पत्रकारांचा हिरमोड करणारे आहेत.
‘हिंडेनबर्गच्या अहवालावर गदारोळ करण्याची गरज नव्हती. एका उद्योग समुहाला लक्ष्य बनवणे हाच या अहवालाचा उद्देश होता. काही चुकीचे घडले असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील समिती त्याची चौकशी करतेच आहे. त्यामुळे संयुक्त संसदीय समितीची गरज नाही.’ जेपीसीमध्ये भाजपाचेच बहुमत असेल हा पवारांनी दिलेला तर्क वजनदार आहे. सर्वसामान्यांना पटणारा आहे. देशातील उद्योगपतींना लक्ष्य करणाऱ्या डाव्या विचारसरणीवरही पवार बरसले.
‘आम्हाला विरोधकांमध्ये ऐक्य हवे आहे, परंतु विकासाचे मुद्दे हा त्याचा पाया असावा, असे आमच्या सारख्या काही लोकांना वाटते. परंतु डावे पक्ष मात्र त्यांची मानसिकता सोडायला तयार नाही. समान एजेंडा आणि दिशा असल्याशिवाय विरोधकांचे ऐक्य अशक्य आहे’, असे पवारांनी स्पष्ट केले.
२०२४ में आयेगा तो मोदी… हेच पवारांनी मुलाखतीत जे काही सांगितले, त्याचे एका वाक्यातील सार आहे. ते जे काही बोलले, ते का बोलले आणि त्याचे परीणाम काय होऊ शकतात, यावर चर्चा व्हायला हवी. कायम सत्ता केंद्राच्या आसपास रेंगाळणे ही पवारनीती आहे. परदेशी नागरीकत्वाच्या मुद्यावरून त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या विरोधात बंड केले. १९९९ मध्ये वेगळा पक्ष काढला, परंतु त्याच वर्षी त्यांनी काँग्रेसशी सत्तेसाठी हात मिळवणी केली, हा पवारांचा इतिहास आहे.
विरोधी ऐक्य शक्य नसल्याची स्पष्ट कबुलीच पवारांनी एक प्रकारे देऊन टाकली आहे. अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कड घेतली आहे. त्यांनी हवेची दिशा ओळखली असून २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार यावर शिक्कामोर्तब केले आहे.
पवारांनी एका मुलाखतीत अनेकांना घायाळ केले आहे. त्यांनी फक्त राहुल गांधी यांचा कार्यक्रम केलेला नाही. त्यांच्या तालावर नाचणाऱे शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते संजय राऊत यांचाही गेम केलेला आहे. या तिघांची किंमत चाळीस पैसेवाल्या ट्रोलरपेक्षा जास्त नाही, हेच पवारांनी दाखवून दिले आहे. गौतम अदाणी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या तिघांनी गेल्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. पवारांच्या मुलाखतीनंतर ‘उद्योगपती जगला पाहिजे. त्यांच्याशिवाय अर्थव्यवस्थेला चालना मिळणे शक्य नाही, अर्थव्यवस्था मजबूत होणे शक्य नाही’, असे राऊतांना म्हणावे लागले. अदाणींच्या नावाने कंठशोष करणाऱ्या राऊतांना ही पलटी मारावी लागली. अर्थात ही पलटी मारताना ‘मोदींनी एका उद्योगपतीच्या मदतीसाठी एलआयसी, एसबीआयचा पैसा वापरला’, हे विधान करून त्यांनी खास पवार शैलीत समतोल साधण्याचा प्रयत्नही केला आहे.
भाजपाच्या विरोधात एखादा मुद्दा खूप वाजू लागला तर त्याची हवा काढण्याचे काम अजित पवार वारंवार करत असतात. मोदींच्या डीग्रीच्या विषयावरून रण माजवणाऱ्या विरोधाकांचे त्यांनी कान टोचले. ठाकरे पिता-पुत्रांच्या घटनाबाह्य सरकारच्या प्रचाराची हवाही त्यांनीच काढली होती. लोकशाहीत आकड्याला महत्व असते, ज्याच्याकडे नंबर असतो, त्याचीच सत्ता असते. अजित पवार हे अनेकदा भाजपा प्रवक्त्याची भूमिका पार पाडत असतात. एनडीटीव्हीला मुलाखत देऊन थोरल्या पवारांनी तिच भूमिका राष्ट्रीय पातळीवर बजावली आहे.
महाविकास आघाडीची रणनीती वापरून राज्यात एकदा सत्ता बनवण्यात पवारांना यश आलं. परंतु आता ही रणनीती म्हणजे वापरलेले काडतूस बनली आहे. पुन्हा त्याच रणनीतीचा वापर करून सत्ता मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे पवार वेगळा काही विचार करतायत का, असा तर्क या मुलाखतीनंतर काढला जातो आहे. सत्ता मिळत असेल तर पवारांना कोणाचेच वावडे नाही. भाजपाला त्यांच्या पक्षाने २०१४ मध्ये एकतर्फी पाठिंबा देऊन ही बाब स्पष्ट केलेली आहे. २०२४ मध्ये त्याची पुनरावृत्ती करणे पवारांसाठी फार मोठी बाब नाही.
मोदींवर अनर्गल टीका करून उद्धव ठाकरे यांनी परतीचे दोर कापून टाकले आहेत. परंतु महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही पवार कुटुंबियांनी मोदींवर वैयक्तिक टीका करणे नेहमीच टाळले. पवारांच्या मुलाखतीनंतर महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा खुलासा संजय राऊतांना द्यावा लागला, यातच सर्व आले. काँग्रेसकडून याबाबत अजून कोणी प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु पवार अदाणींच्या पाठीशी उभे राहिले, हे चित्र काँग्रेसला रुचले नसणार, हे उघडच आहे. राहुल गांधी यांचे तोंड आंबट करणारी अनेक विधाने पवारांनी या मुलाखतीत दिलेली आहेत. फक्त काँग्रेस नव्हे तर समाज माध्यमांवर भाजपाच्या, मोदींच्या विरोधात सतत गरळ ओकणारे तथाकथित विचारवंत आणि मविआच्या पाळीव पत्रकारांचीही पवारांनी गोची केलेली आहे.
हे ही वाचा:
अजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच मत
बोनी कपूरची चांदीची भांडी जप्त, किंमत ३९ लाख
भारत-श्रीलंका तस्करी प्रकरणी चेन्नईत एनआयएची छापेमारी,सोने , ८०लाखांची रोकड जप्त
“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”
काल अजित पवार आपला ताफा सोडून अचानक गायब झाले. त्यांचा फोनही स्वीच ऑफ येत होता, त्यामुळे अनेकांचे प्राण कंठाशी आले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर नेत्यांचे फोन बंद झाले की अनेकांना घाम फुटतो.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुमक घेऊन लवकरच भाजपामध्ये सामील होतील, अशा वावड्या यापूर्वी अनेकदा उठल्या आहेत. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांकडे वारंवार संशयाने पाहीले जाते. परंतु एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीनंतर दस्तुर खुद्द पवारच भाजपाला सामील होणार काय, अशी शंका अनेकांना अस्वस्थ करते आहे.