पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…

पवारांना राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण पण न जाण्याचा निर्णय

पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…

राम मंदीर निर्माण न्यासाचे निमंत्रण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाकारले. अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते जाणार नाही हे उघडच होते. राम मंदीर आंदोलनाला ज्यांनी कायम नाट लावण्याच्या प्रयत्न केला त्यांना अयोध्येत राम मंदीर उभे राहते आहे, याचा आनंद होण्याची शक्यता नव्हतीच. देशात अनेक नेते आहेत, ज्यांनी मुस्लिम तुष्टीकरणासाठी आयुष्यभर हिंदूविरोधी राजकारण केले. बाबरीचा कलंक कायम राहावा यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली होती. अयोध्येत उभे राहिलेले राम मंदीर हे तुष्टीकरणाच्या राजकारणाची मृत्यू घंटा वाजल्याचे शुभचिन्ह आहे. त्यामुळे पवारांसारख्या नेत्यांना प्रचंड नैराश्य येणे स्वाभाविक आहे.

राम मंदीर निर्माण न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पत्राद्वारे दिलेले निमंत्रण पवारांना मिळाले. प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भाजपाचा इव्हेंट आहे, असा प्रचार करणाऱ्यांनी खरे तर हे निमंत्रण शिरोधार्य मानून सोहळ्याला हजेरी लावली पाहिजे होती. आजवरच्या पापांचे क्षालन झाले असते. परंतु रामासमोर नतमस्तक होऊन पवार मतपेढीला दुखवू इच्छित नसावेत.

पत्राचे उत्तर देताना पवारांनी चंपत राय यांचे आभार मानले आहेत. प्रभूराम हे जगभरातील श्रद्धाळूंचे आराध्य आहे. मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सामील होण्यासाठी हजारो लोक तिथे पोहचत आहेत. त्यांच्या माध्यमातून सोहळ्याचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल. २२ जानेवारी नंतर कधी तरी मी दर्शनासाठी जाईन. तोपर्यंत कदाचित मंदीराचे काम पूर्ण झालेले असेल.

मंदीराचे काम अपूर्ण आहे, असा टोला मारण्यासाठीच बहुधा पवारांनी हे उत्तर पाठवले आहे. मंदीर निर्मिती पूर्ण झाली नसताना प्राणप्रतिष्ठा कशाला? असा सवाल शंकराचार्यांसह देशातील काही लोक विचारतायत. पवारांसारखे नेते त्यांना हवा देण्याचा प्रयत्न करतायत. राम मंदीर निर्मितीबाबत देशातील कोट्यवधी लोकांच्या मनात उत्सुकता आणि आतुरता आहे. हे पवारांनी अगदी बरोबर सांगितले आहे.

हजारो लोक अयोध्येत जातायत, त्यांच्या माध्यमातून हा आनंद माझ्यापर्यंत पोहोचणार आहे, असे पवार म्हणतायत त्यात तथ्य वाटत नाही. पवारांना राम मंदीराच्या निर्मितीचा आनंद होत असेल अशी पुसट शंकाही आम्हाला नाही. इतरांना आनंद होतोय तो पवारांपर्यंत पोहोचेल याचीही शक्यता नाही. बाबरी कोसळली तेव्हा शरद पवार देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांनी मिलिटरी इंटेलिजन्स विभागाला बाबरीवर नजर ठेवण्यासाठी जुंपलं. खरं तर लष्कराचा आणि बाबरीच्या संरक्षणाचा काय संबंध होता?

देशाची सुरक्षा ही लष्कराची जबाबदारी. देशाच्या सुरक्षेसंबंधित गोपनीय माहिती जमवणं, संभाव्य शत्रूंवर नजर ठेवणे हे मिलिटरी इंटेलिजन्सचे काम. परंतु पवारांनी त्यांना बाबरीवर लक्ष ठेवण्यासाठी जुंपलं. १९९२ च्या कारसेवेदरम्यान या संपूर्ण घटनाक्रमाचे शूटींग करण्याची जबाबदारी मिलिटरी इंटेलिजन्सवर होती. बाबरी सुरक्षित राहिली तर देश सुरक्षित राहील ही बहुधा पवारांची भूमिका असेल. काँग्रेसच्या कार्यकाळात देशाच्या सीमा सुरक्षित नव्हत्या याचे कारण हीच मानसिकता आहे. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना नौदलाचे जहाज घेऊन पिकनिकला गेले होते. संरक्षण मंत्री असताना पवारांनी लष्कराचा वापर तुष्टीकरणाचा कंड शमवण्यासाठी वापरला. ही माहिती कपोलकल्पित नाही. ऑन माय टर्म्स या पवारांच्या आत्मकथेत याचा तपशीलवार उल्लेख पवारांनी केला आहे. बाबरी वाचवण्यासाठी पवारांनी किती आटापिटा केला होता. याचा संपूर्ण इतिहास या पुस्तकात वाचायला मिळू शकेल. बाबरी वाचवणे हे ज्यांचे ध्येय होते, त्यांना राम मंदीराच्या निर्मितीचा आनंद होईल, अशा भ्रमात कोणी राहू नये.

पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला, परंतु काँग्रेसी मानसिकता मात्र सोडली नाही. ही मानसिकता फक्त अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करणारी नाही तर वेळ प्रसंगी हिंदूंचा अपमान करणारी, त्यांना खच्ची करणारी, त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. पवारांमध्ये ही मानसिकता ठासून भरलेली आहे. अन्यथा हिंदू दहशतवादाची थिअरी रुजवण्यात त्यांनी पुढाकार घेतला नसता. दंगली आणि बॉम्बस्फोटांचे खापर हिंदू तरुणांवर फोडून त्यांना दहशतवादी ठरवण्याचे हे कारस्थान होते. हिंदू दहशतवादाचे ढोल वाजवणारी पी.चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय सिंह आणि शरद पवार हीच चौकडी होती. राम मंदीरामुळे देशात दंगली होतील हा प्रचार याच नेत्यांनी केला.

हे ही वाचा:

राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!

आदित्य ठाकरेंना झटका, निकटवर्तीय सूरज चव्हाणला अटक

नरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष

शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

बाबरी कोसळल्याचे सगळ्यात जास्त दु:ख पवारांना झाले होते. न्यायालयाने राम मंदीरासाठी ट्रस्ट स्थापन करा असे आदेश दिल्यानंतर बाबरीच्या निर्मितीसाठी ट्रस्ट केव्हा स्थापन करणार, हा सवाल उपस्थित करणार देशातील पहिला आणि एकमेव नेता म्हणजे शरद पवार. हिंदू विरोधाची भूमिका ही केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी घेण्यात आली होती, याच्याशी सहमत होता येत नाही. हिंदूद्वेष पवारांच्या अंतरंगात भिनलेला आहे. पवार कधी रामनवमी, हनुमान जयंतीच्या सोहळ्यात रमलेले दिसले नाहीत. फक्त इफ्तार पार्ट्यांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.

राम रथ यात्रा काढणाऱे भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांचा रथ बिहारच्या समस्तीपूर येथे रोखणारे बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हेही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत. ते सुद्धा बाबरीचे कट्टर समर्थक. अयोध्या पंचक्रोशीच्या बाहेर जेव्हा मशीद उभी राहील, तेव्हा पवार, लालू यादव आदी मंडळींना निमंत्रणाची गरजही भासणार नाही. अर्थात तोपर्यंत हे सगळे अस्तित्वहीन झालेले असतील. राम मंदीराची निर्मिती केवळ हिंदू संस्कृतीची पताका उंच उंच फडकवणारी घटना नाही. राम मंदीराच्या निर्मितीसोबत देशात तुष्टीकरणाची कबरही खोदली जाणार आहे. पवारादी प्रभृतींच्या अस्वस्थतेचे हेच कारण

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

 

Exit mobile version