‘एखाद्याला थोडा तरी स्वाभिमान असता तर मंत्रिमंडळातून राजीनामा दिला असता’, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना उद्देशून हे वक्तव्य केले आहे. पवारांनी स्वाभिमानाच्या बाता कराव्यात यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो? मविआच्या सत्ताकाळात जेव्हा मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले, तेव्हाही त्यांचा स्वाभिमान जागा झाला नाही, कारण तेव्हा पवार त्यांच्या पाठीशी पहाडासारखे उभे होते. आरोप करणाऱ्या व्यक्तिला चेपण्याचा प्रयत्न करीत होते. पवारांच्या फूटपट्ट्या प्रत्येक घडीला प्रत्येक व्यक्तगणिक कशा बदलतात हे त्यांनी एकाच दिवसात दोनदा सिद्ध केले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडे यांच्या कारनाम्यांची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. परंतु हे कारनामे एका दिवसात झालेले नाहीत. मविआच्या कारकीर्दीत मुंडे यांच्या कारनाम्यांचा लेखाजोखा घेण्याची उसंत बहुधा पवारांना मिळाली नाही. करुणा मुंडे यांच्या बहीणीने मुंडे यांच्यावर जेव्हा बलात्काराचे आरोप केले, तेव्हा पवारांनी त्या महिलेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह लावले होते. ज्या सरकारचे पवार रिमोट कंट्रोल होते, त्या सरकारने बलात्काराच्या आरोपांची चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. तासंतास चौकशी करण्यात आली, पण ती आरोप करणाऱ्या महिलेची. तेव्हा जर पवारांनी मुंडेना स्वाभिमानाचे धडे दिले असते, तर काल त्यांना ती तसदी घेण्याची काही गरजच उरली नसती.
पवारांच्या फुटपट्ट्या प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. त्या सोयीप्रमाणे बदलत असतात. काल पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली. विधान परीषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांना झापले. दोन मर्सिडीज दिल्यावर उबाठा शिवसेनेत पद मिळते, या वक्तव्यामुळे खरे तर उद्धव ठाकरे दुखावले गेले पाहिजे होते. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त चिडचीड पवारांची झाली. खरे तर जो निकष त्यांनी गोऱ्हेंना लावला तोच, डॉ. तारा भवाळकर यांना लावायला हवा होता. पवारांच्या फूटपट्ट्या प्रत्येकासाठी वेगळ्या आहेत.
परिसंवादाच्या निमित्ताने नीलम गोऱ्हे यांनी केलेले हे वक्तव्य तद्दन अनावश्यक आणि अपरीपक्व होते, ही पवारांची प्रतिक्रीया आहे. ती देण्यासाठीच कालच्या पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. उबाठा शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांचा समाचार घेतला. अत्यंत शेलक्या शब्दात घेतला. तो बहुधा पवारांना कमी वाटला म्हणून काय ते जातीने मैदानात उतरले. एका महिलेला उत्तर देण्यासाठी गुरू शिष्य मैदानात उतरले. याची खरोखरच गरज होती? पवारांचे कायम आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा कार्टा अशा प्रकारचे असते.
जर गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करून औचित्यभंग केला आहे, तर तारा भवाळकरांनी दुसरे काय केले. कालच्या व्हीडीयोमध्ये आम्ही याचा व्यवस्थित समाचार घेतलेला आहे. भवाळकर बाईंनी काल फक्त मोदींना लक्ष्य करून निवडक संवेदनशीलतेचे प्रदर्शन केले. तेच पवारांनी केले. गोऱ्हेंचे विधान अनावश्यक आणि अपरीपक्व असेल तर भवाळकर बाईंनी दुसरे काय केले. त्यांच्या विधानात किती परीपक्वपणा होता? फूटपट्टीच लावायची तर भवाळकर बाईंनी पाहुण्याचा अपमान करून शिष्टाचाराची तीन तेरा केलेली आहे. परंतु, पवार भवाळकर बाईंबाबत बोलणार नाही, कारण त्यांच्या अध्यक्षीय भाषणात जाणते नेते म्हणून बाईंनी पवारांना व्यवस्थित गुळ लावलेला आहे. तुम्ही आमच्या आरत्या ओवाळा, आम्ही तुमच्या ओवाळतो, असा एकूण हा कार्यक्रम होता.
कधी कधी वाटते या साहित्य संमेलनांचे आयोजन म्हणजे वर्षातून एकदा पवारांनी स्वतःच्या आरत्या ओवाळून घेण्याची व्यवस्था केली आहे. पवारांनी हे व्यवस्थित जुळवून आणले आहे. पवार कृपेने कोणी तरी समंलेनाच्या अध्यक्षपदी बसतो, मग तो अध्यक्षीय भाषणात पवारांचा जाणते म्हणून कौतूक करतो. पवार विरोधकाची नालस्ती करतो. म्हणजे एका दगडात दोन पक्षी.
हे ही वाचा :
महाकुंभ समारोपाला महाशिवरात्रीचा योग!
काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा!
बांगलादेश म्हणतो, अमेरिकेचे ३ कोटी डॉलर आम्हाला मिळालेलेच नाहीत!
‘आप’च्या दिल्ली दारू धोरणामुळे २,००२ कोटी रुपयांचा महसूल तोटा!
बारामतीकरांची करामत इथे संपत नाही. ज्याचा अपमान करायचा, तोह भाषणाच्या वेळी मंचावर असेल याची व्यवस्थाही पवार करतात. यंदाच्या साहित्य संमेलनाचे आमंत्रण घेऊन मोदींकडे पवारच गेले होते. त्यामुळे मोदींचा अपमान होणार नाही, हे पाहाणे पवारांची जबाबदारी होती. तो झाल्यानंतर पवारांनी भवाळकरांना योग्य शब्दात सुनावले पाहीजे होते. परंतु ते झाले नाही, कारण भवाळकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला आणि पवारांच्या आरत्या ओवाळल्या. परतफेड म्हणून पवारांनी भवाळकरांचा आगाऊपणा पोटात घातला आणि नीलम गोऱ्हेंना झापले. हे सगळे मुंडेंना माहीती आहे. त्यामुळे ते स्वाभिमान असेल तर राजीनामा द्या, वगैरे सल्ले ऐकणार नाहीत. हे शब्द ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून बाहेर पडतील, त्या दिवशी, खरा फैसला होईल.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)