पवारांनी जरांगेंना हिंग लावून विचारले नाही…

पवारांनी जरांगेंना हिंग लावून विचारले नाही…

रोज उठून महायुती सरकारला हिसका दाखवू, पाडूनच दाखवू, माझ्या वाटेला जाऊ नका, सुपडा साफ करू, अशी दमबाजी करणारे मनोज जरांगे सध्या प्रचंड बावचळलेले दिसतात. आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक दिवसांनी त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या मविआच्या नेत्यांना त्यांची भूमिका विचारली पाहिजे याची आठवण झाली. काल त्यांनी या तिन्ही नेत्यांना ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, असे आवाहन केले होते. परंतु, पवारांनी त्यांना फार किंमत दिलेली दिसत नाही. छत्रपती संभाजीनगर येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी केंद्र सरकारच्या स्थिरतेपासून राज्यातील मविआच्या जागा वाटपाबाबत भूमिका मांडली, परंतु, जरांगेच्या प्रश्नाबाबत त्यांनी अवाक्षर काढले नाही.

मनोज जरांगे यांचा फुगा फुटणार अशी शक्यता दिसू लागली आहे. कारण आरक्षण आंदोलनात त्यांचे धोरण फक्त भाजपा झोडण्याचे राहिले आहे. भाजपाची भूमिका मविआतील पक्षांनी मांडली असता, जरांगे त्यांच्या बाबत मात्र सौम्य भूमिका घेतात, फार आकांड तांडव करत नाहीत, हे सातत्याने दिसते आहे.

सकाळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका, त्यांना शिव्यांची लाखोली, शेलक्या भाषेत उल्लेख, दुपारी, सायंकाळी भाजपाच्या उमेदवारांना पाडण्याच्या धमक्या असा साधारण जरांगेंचा दिनक्रम असतो. कायम सुपारी घेतल्यासारखे भाजपाला, महायुती सरकारला लक्ष्य करणारे जरांगे चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मराठ्यांना आरक्षण न देणाऱ्या, मराठयांचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत नाही, अशी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या शरद पवारांबाबत एका शब्दाने बोलत नाहीत. याबाबत लोक आता प्रश्न विचारू लागलेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या जरांगे यांनी काल अखेर या तिन्ही नेत्यांना दबक्या भाषेत सवाल केला.

या नेत्यांनी जर ओबीसी कोट्यातून आरक्षणाची भूमिका मान्य केली नाही तर जरांगे त्यांच्या विरोधातही आकांड तांडव करतील, त्यांना पाडण्याची भाषा करतील, अशी मराठ्यांची अपेक्षा होती. कारण जी फूटपट्टी ते फडणवीसांना लावतात तिच मविआच्या नेत्यांना लावतील अशी अपेक्षा होती. परंतु, इथे त्यांनी पार अपेक्षा भंग केला. जरांगेंनी काय विनोदी विधान केले आहे पाहा, ‘या तिघांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी मान्य केली नाही तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले पाहिजे, कोणाची वाट बघण्याची गरज नाही, कोणाला विचारण्याची गरज नाही.’

हे विधान ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देणार नाही, म्हटले तरी जरांगे पवारांना शिव्या घालणार नाहीत. त्यांचे उमेदवार पाडण्याची घोषणा करणार नाहीत. मराठ्यांचा हिसका दाखवण्याची भाषा करणार नाहीत. कारण त्यांना हिसका फक्त भाजपाला, फडणवीसांसाठी राखीव आहे. त्यांनी मराठ्यांना १० टक्के आरक्षण दिलेले असले तरीही जरांगेंचे पाणी शरद पवारांनी व्यवस्थित जोखले आहे. हाती सत्ता असताना अशा अनेकांना धुवून, पिळून, दोरीवर वाळत टाकण्याचे कसब पवारांनी दाखवले आहे. आपल्या ऊर्जेने भारावलेला हा माणूस आपल्या विरोधात काही करण्याची धमक दाखवू शकत नाही, हेही पवार जाणून आहेत.

त्यामुळे शरद पवार आजच्या पत्रकार परिषदेत जरांगे यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाहीत. महायुती सरकारचे नेते जरांगेंना फार कुरवाळायला गेले आणि त्यांच्या शिव्यांचे धनी होऊन बसले. भाजपाच्या मराठा नेत्यांनाही आता ही बाब लक्षात येऊ लागलेली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अमित साटम, प्रसाद लाड यांनी उशीरा का होईना जरांगेच्या अरे ला कारे करायला सुरूवात केलेली आहे. जरांगे ज्या एकेरी भाषेत बोलतात, त्याच एकेरी भाषेत त्यांना ठोकायला सुरूवात झालेली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी तर जरांगेना त्यांची लायकी दाखवायची वेळ आलेली आहे, अशी पोस्ट केलेली आहे.

ज्याला त्याला मापात ठेवायचे असते, हे पवार जाणून आहेत. भाजपाच्या नेत्यांना ते उशीरा कळले. पवार या बाबतीत मुरलेले आहेत. मनोज जरांगेंना पवार लोकसभेची उमेदवारी देणार आहेत, असा दावा भाजपाच्या एका नेत्याने केला, तेव्हा पवारांनी दिलेले उत्तर आठवा? आमच्यावर इतकी अशी वेळ आली आहे? असा खोचक प्रतिप्रश्न त्यांनी केला. पवारांनी एका वाक्यात किती गोष्टी सांगितल्या. एक तर जरांगे यांचा आपला काहीही संबंध नाही, हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जरांगे यांचे बोलवते धनी शरद पवार आहेत, हा दावा त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्यांनी जरांगेंना आपण फार किंमत देत नाही, हेही स्पष्ट केले. जरांगेंनाही मेसेज गेला की पवार आपल्याला मोजत नाहीत. त्यामुळे जरांगे कधी त्यांना आडवे जाण्याच्या भानगडीत पडले नाहीत.

या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका सुरूवातीच्या काळात जरांगेंना कुठे ठेवू आणि कुठे नको अशी होती. अंतरावाली सराटीत झालेल्या दगडफेकीची, जाळपोळीची चौकशी करण्यासाठी महायुती सरकारने जरांगेंच्या विरोधात एसआयटी स्थापन केली. त्यातून अद्यापि तरी काहीही समोर आलेले नाही. त्यातून जरांगेंची भीड चेपत गेली आणि ते महायुतीच्या नेत्यांना चेपत गेले.

हे ही वाचा..

“ममता बॅनर्जी यांनी खोट्या गोष्टींवर आधारित कथा तयार करण्याऐवजी खरे बोलावे”

संतांवर जातीय टीका करणाऱ्या मानव यांची जादूटोणा कायदा समितीतून हकालपट्टी करा

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा

फडणवीसांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या जरांगेचा कारभारच दुटप्पी आहे. मविआच्या तिन्ही नेत्यांचा उल्लेख त्यांनी साहेब असा केला. फडणवीसांना हा माणूस काय काय बोललाय ते एकदा आठवून पाहा, म्हणजे पवार, ठाकरे आणि पटोले यांना साहेब म्हणण्याचा अर्थ कळू शकतो. आम्ही आधीच्या व्हीडीओमध्येही म्हटले आहे. पवारांनी जरांगेंच्या मागणीला विरोध केला तरी जरांगे त्यांना आडवे जाणार नाहीत, त्यांना शिव्या घालणार नाहीत. जरांगेंनी त्यांचे मिशन २०२४ जोरात सुरू केलेले आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या भूमिकेला पवार, ठाकरे आणि पटोलेंनी नकार दिला तर जरांगे त्यांना कोणता हिसका दाखवणार आहेत, हा सवाल आता मराठ्यांना जरांगेना विचारण्याची गरज आहे.

Exit mobile version