काँग्रेस, राष्ट्रवादीशपचा सांगली पॅटर्न…

काँग्रेस आणि शरद पवारांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची उपयुक्तता संपलेली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीशपचा सांगली पॅटर्न…

लोकसभा निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडीत पहिली ठिणगी सांगलीत उडाली होती. एकत्र निवडणूक लढवून सुद्धा काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी उबाठा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला धूळ चारली. चंद्रहार पाटील यांचा पराभव केला. ही सल अजून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात ठसठसते आहे. आज त्याच सांगलीत पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थिती लावली. परंतु ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरेंना पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी मिळाली.

महाराष्ट्रात दोन महिन्यात निवडणुका आहेत, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे राज्यात दौरे वाढले आहेत. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सांगलीत आले होते. त्यांच्यासोबत शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे नेते मंचावर होते. परंतु ठाकरे यांच्या पक्षाचा एकही पदाधिकारी नव्हता. ठाकरेंना पक्षाचा एखादा नेता प्रतिनिधी म्हणून पाठवता आला असता, परंतु असे काही घडले नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तणाव निर्माण झाला होता. इथे त्यांच्या पक्षाच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव करून विशाल पाटील हा काँग्रेसप्रणीत अपक्ष विजयी झाल्यामुळे ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळले गेले. या जखमेवरची खपली काढण्याचे काम पुन्हा एकदा सांगलीतच झाले आहे.

ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा हा सांगली पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही कायम राहण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात पुन्हा सांगलीतूनच झाली आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला जात नाही, म्हणून ठाकरे नाराज आहेत. म्हणून त्यांनी सांगलीतील कार्यक्रम टाळण्याचा निर्णय घेतला. परंतु मित्रपक्षांनी त्यांचे दूर राहणे फारसे मनावर घेतले नाही. त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला.

भाजपासोबत युती असताना ठाकरेंचा जो तोरा होता, तो आता पूर्णपणे उतरला आहे. काँग्रेस आणि शरद पवारांनी मिळून तो उतरवला आहे. मातोश्रीची चमक फिकी पडली आहे. एकेकाळी भाजपाचे बडे नेते ठाकरेंच्या दारावर येत असत, आता ठाकरेंना कधी सिल्व्हर ओक तर कधी १० जनपथच्या पायऱ्या झिजवायला जावे लागते. त्यांच्या शब्दालाही फार किंमत राहिलेली नाही. वाऱ्याची बदललेली दिशा पाहून ठाकरेंचे नेतेही चार पावलं मागे आलेले दिसतायत. संजय राऊत यांनी विधान केलेले आहे, महायुतीला सत्तेवरून खाली खेचणे महत्वाचे. मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा कधीही होऊ शकते. राऊत जे काही बोलले तेच शरद पवार वारंवार बोलतायत. हे विधान राऊतांनी ठाकरेंना विचारल्याशिवाय केले असण्याची शक्यता नाहीत. अशा अनेक माघारी उबाठा शिवसेनेला भविष्यात पाहायच्या आहेत.

हे ही वाचा:

‘सनातन’मध्ये महिलांचा आदर, मेहनाज बनली मीनाक्षी, मुलेही झाली ‘लव-कुश’

सरकारी जमिनीवर बंगले, राजस्थानचा गुंड हजरतच्या घरावर बुलडोझर !

तेलंगणात ६ नक्षलवाद्यांचा खात्मा !

बलात्कारानंतर तेलंगणात आदिवासींचा संताप, मुस्लिमांची घरे, दुकाने पेटविली

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यापेक्षा राहुल गांधी यांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत होते. सामनातून राहुल गांधी यांचा जयजयकार चालला होता. गांधी-नेहरुंच्या पालख्या खांद्यावर घेतल्या जात होत्या. संजय राऊत जेव्हा संधी मिळेल तेव्हा राहुल गांधी यांना मिठ्या मारायला जात होते. ठाकरे आणि राऊतांनी राहुल गांधी यांना पटवले असल्याचे चित्रही दिसत होते. लोकसभा निवडणुकीत राज्यातील नेत्यांना डावलून उबाठा शिवसेनेने थेट दिल्लीत चर्चा केली आणि लोकसभेच्या सर्वाधिक जागा पदरात पाडून घेतल्या. परंतु हा इतिहास झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे.

 

मुख्यमंत्रीपद मागायला दिल्लीत गेलेल्या ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी फार भाव दिला नाही. त्यांना हात हलवत परत यावे लागले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत पूर्वीची किंमत राहिलेली नाही. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा नावाची चर्चा सोडा, परंतु साधी विचारही कोणी करताना दिसत नाही. ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड इच्छूक आहेत. मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, असे ते वारंवार सुचवतायत. मुख्यमंत्री ठरवण्यासाठी संख्या बळ हा निकष नसावा, असेही त्यांचे म्हणणे आहे. थोडक्यात, काहीही झाले तरी मलाच मुख्यमंत्री करा, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु काँग्रेस आणि शरद पवार मात्र ज्याचे संख्याबळ जास्त त्याचा मुख्यमंत्री या मतावर ठाम आहेत.

 

काँग्रेस आणि शरद पवारांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची उपयुक्तता संपलेली आहे. मविआमध्ये ते असले काय आणि नसले काय, विशेष फरक पडणार नाही, असे या दोन्ही पक्षांना वाटते. उलट अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंनाच या दोन्ही कुबड्यांची गरज आहे. ठाकरे आदळआपट करण्याच्या पलिकडे काहीही करू शकत नाहीत हे मित्रपक्षांच्या लक्षात आलेले आहे. फक्त मुख्यमंत्रीपदाचा विषय नाही, विधानसभा निवडणुकीच्या आधी जे जागा वाटप होणार आहे, त्यातही ठाकरेंना जो तुकडा फेकला जाईल तो जी हुजूर करून झेलावा लागणार आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version