अलिकडेच उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा संपन्न झाला. त्याच दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरेंनी मॅडम सोनिया आणि राहुल गांधी यांचे पाय धुतले पाहिजेत, असे वक्तव्य केले. ठाकरेंनी ते मनावर घेतले की नाही ठाऊक नाही, परंतु त्यांच्या दिल्ली दौऱ्यात गाठीभेटींच्या पलिकडे विशेष काही झाले नाही, मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर सोनियांची मोहोर काही उमटली नाही. आता मविआचे रिमोट कंट्रोल शरद पवार यांनीही ठाकरेंच्या स्वप्नाला टाचणी लावल्याचे दिसते.
सकाळी संजय राऊतांचे सुगम संगीत ऐकून झाल्यानंतर पत्रकार शरद पवारांकडे वळतात. पवारांनाही राऊतांच्या प्राईम टाईमच्या आड यायचे नसल्यामुळे त्यांचे आटोपल्यानंतर हे सुरू होतात. पवार हे प्रादेशिक पक्षाचे राष्ट्रीय नेते असल्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेतील प्रश्नांची रेंज बांगलादेशापासून बारामतीपर्यंत पसरलेली असते. पत्रचर्चेत ज्या विषयाला स्पर्श करून ते सोडून देतात, तोच मुद्दा त्यांच्या कामाचा असतो, त्यांना सांगायचा असतो.
मविआचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. या मुद्द्यावरून कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही चर्चा करून ठरवू असे पवारांनी सांगितले. याचा अर्थ या क्षणापर्यंत तरी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट संकेत दिले. पुढच्या प्रश्नात मात्र त्यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेवर बुलडोजरच चालवला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत, की ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. त्यांचे हे विधान दुर्लक्षित करण्यासारखे नाही, असे मत पवारांनी नोंदवले. पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावरून बार काढत, त्यांनी ठाकरेंची विकेट काढली.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक २१ जागा लढवून सर्वात कमी जागा लढवणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाच्या तुलनेत फक्त एक जागा जास्त मिळवली. पवारांच्या पक्षाला दहा जागा लढवून आठ जागा मिळाल्या तर उबाठा शिवसेनेला ९ जागा मिळाल्या. काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जे जागा वाटपाचे निकष होते ते विधानसभा निवडणुकीत असणार नाहीत. ते बदलणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव हा एजेंडा होता. विधानसभा निवडणुकीत सत्ता आणि मुख्यमंत्रीपद हा एजेंडा आहे.
लोकसभा निकालाचे आकडे लक्षात घेतले, तर सर्वाधिक जागा काँग्रेसच्या वाट्याला जातील. त्यामुळे त्यांच्या जागा जास्त निवडून येतील. म्हणूनच पृथ्वीराज चव्हाण दावा करतायत की ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केलेली आहे.
हे ही वाचा:
‘आम्ही तुम्हाला आत घेऊ शकत नाही…’, बांगलादेश सीमेवरील लोकांना बीएसएफ जवानाचे उत्तर
युपीत तीन महाविद्यालयीन मुलींनी मुद्दाम घातला हिजाब
उरण हत्याकांड प्रकरणात आणखी खुलासे होणार? यशश्रीचा मोबाईल पोलिसांच्या हाती
बिहारच्या सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू
पृथ्वीराज यांचे मत दुर्लक्षित करण्यासारखे नाही, असे शरद पवार म्हणतात त्याचा अर्थ ठाकरेंचा पत्ता कापण्यात त्यांनाही रस आहे. त्यांना ठाकरेंबाबत काय वाटते हे त्यांनी मविआच्या सत्ताकाळातच स्पष्ट केलेले आहे. ठाकरेंकडे राज्याबाबत माहिती नसते, त्यांच्याकडे अनुभव नाही, शिवसेनाप्रमुखांसारखे संवाद कौशल्य नाही, मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ते फक्त दोनदा मंत्रायलायत गेले, आदी बाबतीत त्यांनी लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या भागात परखडपणे मतं नोंदवली आहेत.
उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत मविआमध्ये सर्वाधिक जागा मिळण्याची कोणतीही शक्यता नाही, याबाबत काँग्रेस आश्वस्त आहे. ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत ज्या ९ जागा मिळाल्या त्यात त्यांच्या पक्षाच्या परांपरागत मतांचा वाटा खूप कमी होता. मुस्लीम व्होटबँकच्या बळावर त्यांना यश मिळाले, ती मुळात व्होटबँक मुळात आपली आणि पवारांची आहे, हेही काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे. ठाकरेंची परंपरागत मतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वळली आहेत. त्यामुळे ठाकरे हे त्यांच्या दृष्टीने व्होटबँक गमावलेले आणि सध्या काँग्रेसच्या मतांवर यश मिळणारे नेते बनले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते ठाकरेंना महत्व द्यायला तयार नाहीत. महत्व असते तर ठाकरेंनी सोनिया गांधी यांचे पाय धुतले पाहिजेत, अशा भाषेचा प्रयोग पटोले यांनी केला नसता. ठाकरेंना जागा दाखवण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीच्या काळात परिस्थिती वेगळी होती. राज्यात काँग्रेसचा फक्त एक खासदार होता, पवारांकडे तीन खासदार होते. सर्वाधिक ६ खासदार ठाकरेंकडे होते. आता चित्र १८० अंशाच्या कोनात बदललेले आहे. ठाकरेंचे वजन कमी झालेले आहे. तीन दिवसांचा दिल्ली दौरा करून तेच वजन वाढण्याचा ठाकरेंचा प्रयत्न होता. परंतु फारसे काही हाताला न लागता, त्यांना परत फिरावे लागले.
मुख्यमंत्रीपद मिळत नसल्यामुळे ठाकरे भाजपासोबत २५ वर्षे सुरू असलेल्या युतीमध्ये कासावीस होत होते. मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी युती तोडली. अलिकडे तर ते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याच्या शिवसेनाप्रमुखांना दिलेल्या वचनाची आठवण सुद्धा करत नाहीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद पुन्हा हवे आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना ते द्यायचे नाही. त्यामुळे ठाकरेंचे मविआमध्ये लोणचे घातले जाणार हे निश्चित. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे दुणावलेला काँग्रेसचा आत्मविश्वास ठाकरेंना गोत्यात आणणार आहे. त्यामुळे मोदींना महाराष्ट्रात रोखल्याचा उन्माद त्यांना फार काळ सुख लाभू देणार नाही. महाराष्ट्रात मोदींना रोखून उपयोग काय झाला, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. परंतु महाराष्ट्रात मिळालेल्या विजयामुळे ठाकरेंची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चाही बंद झालेली आहे. ठाकरेंचे लोणचे घालण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)