बलात्काराचा आऱोप झालेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे खरोखरच भाग्यवान आहेत. दोन बायकांची भानगड उघड झाली, बलात्काराचा आऱोप झाला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या तरुणीला पवारांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मीडियाला याप्रकरणी दिलेल्या प्रतिक्रीयेत रेणू शर्माने यापूर्वी अन्य तीन जणांवर आरोप करून देऊन त्यांना असाच त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, असे पवार म्हणाले. याप्रकरणीची पोलिसांमार्फत सखोल चौकशी झाली पाहीजे अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
अत्याचार झालेल्या महिलेच्या चारीत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करायचे, तिला सहानुभूती मिळणार नाही अशी व्यवस्था करून तिचे तोंड बंद करायचे हे जुने तंत्र आहे. महाराष्ट्राचे पुरोगामी नेतृत्व अशी ओळख असलेल्या पवारांनी या तंत्राचा रेणू शर्मा यांच्याविरोधात खुबीने वापर केला.
करुणा शर्मा यांच्याशी धनंजय मुंडे यांच्या विवाहबाह्य संबंधाबाबत पवार फारसे बोलले नाहीत. काय बोलावे काय झाकावे याची पवारांइतकी जाण कोणाला असेल?
भानगड उघड झाल्यानंतर मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी असलेले नाते स्वीकारले म्हणून राष्ट्रवादीचे नेते त्यांचे जाहीर कौतूक करतायत, मुंडे इतके पारदर्शी होते तर त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही बाब का मान्य केली नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
पवार शरण पोलिस…
पुरोगामीपणाचा उदोउदो करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रसचा खरा चेहरा याप्रकरणामुळे उघड झाला आहे. मीडियातून या प्रकरणाचा गवगवा सुरू झाल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता. परंतु या गंभीर प्रकरणी अजून साधा एफआयआर दाखल झालेला नाही.
मुंबईचे पोलिस सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील शरद पवारांना सिल्वर ओकवर भेटल्यानंतर पुढे काय होणार याचे चित्र स्पष्ट झाले. राज्य मंत्रीमंडळात कोणतीही जबाबदारी नसलेल्या पवारांना पोलिस अधिकारी का भेटतात हा प्रश्न कुणाला पडला नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याप्रकरणात कुठेच दिसत नाहीत. पवारच सगळे प्रकरण हाताळताना दिसत आहेत. पोलिस तपासात हस्तक्षेप करणार नाही असे पवारांनी मीडियासमोर बोलताना सांगितले आहे. पवारांच्या विधानावर एखादा खुळाच विश्वास ठेवू शकतो.
खरंच कायद्याचे राज्य आहे का?
रेणू शर्मांनी केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे, ते खरे की खोटे? हे तपासाशिवाय कळणार नाही. परंतु ज्यांच्यावर आरोप आहे, त्याच्यावर एफआयआर नोंदवल्याशिवाय तपास होणार तरी कसा? राज्यात कायद्याचे राज्य आहे, कायदा आपले काम करेल असे वारंवार सांगणारे शिवसेना नेते संजय राऊत, ‘पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांना असे विषय हाताळण्याचा उत्तम अनुभव आहे’, असे सांगून मोकळे झाले आहेत. हे प्रकरण पोलिस हाताळणार नाहीत ही बाब यातून पुरेशी स्पष्ट व्हावी. दोष कायम पुरुषाचाच असतो असे कुणाचेच म्हणणे नाही, परंतु मुंडे निर्दोष आहेत कि नाहीत याचे राष्ट्रवादीला फारसे देणे घेणे नसावे, कारण ते ओबीसी असल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुरोगामी मंडळींचे मसिहा शरद पवार यांनी मुंडे यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे सगळी पुरोगामी मंडळी देखील मुंडेकडे सहानुभूतीच्या नजरेने बघत आहेत.
मुंडेंची दूरदृष्टी…
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा मुंडेंचा निर्णय त्यांची दूरदृष्टी दाखवणारा आहे. भाजपामध्ये असताना त्यांच्यावर रेणू शर्मांनी आरोप केले असते तर शरद पवारांना पुन्हा महीला धोरण आठवले असते, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने मुंडे यांच्याविरोधात अग्रलेख लिहीले असते, तमाम पुरोगामी पत्रकार मीडिया आणि सोशल मीडियातून मुंडेंवर घसरले असते. पवारांची भूमिका त्यांच्या सोयीप्रमाणे बदलत असते. आज एक बोलायचे आणि दुसऱ्या दिवशी नेमके त्याला छेद देणारे वक्तव्य करायचे, दोन दगडांवर पाय ठेवून उभे राहायचे हेच पवारांचे राजकारण. मुंडेना पवारांसारखे नेते लाभले हे त्यांचे भाग्यच.
महाराष्ट्र के मंत्रिमंडल में धनंजय मुंडे अकेले नही हैं ऐसे कई मिलेंगे । मुडे के बॉस के भी कई किस्से हैं ।