25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरसंपादकीयउबाठा-पवारांच्या काँग्रेसला वाकुल्या...

उबाठा-पवारांच्या काँग्रेसला वाकुल्या…

मविआचा प्रयोग असो वा इंडी आघाडीचा प्रयोग, दोन्ही प्रयोगांचा उद्देश सत्ता प्राप्त करणे एवढाच होता

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची परीस्थिती सुधारली. पक्षाला विरोधी पक्ष नेते पद मिळाले. त्यामुळे इंडी आघाडी केंद्रातील एनडीएला अधिक भक्कमपणे आव्हान देईल असे वाटत होते. परंतु भलतेच घडताना दिसते आहे. भाजपाकडे स्वत:चे पूर्ण बहुमत नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक बळकट झालेले दिसतात. जागा वाढल्यानंतरही काँग्रेसमध्ये उत्साह जाणवत नाही, दुसऱ्या बाजूला इंडी आघाडीतील पक्षही काँग्रेसला वाकुल्या दाखवतायत असे चित्र आहे. महाराष्ट्रात तर उबाठा शिवसेना आणि शरद पवारांच्या पक्षाने काँग्रेसचा पंचनामा करायचा निर्धारच केलेला दिसतो.

दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका आहेत. आम आदमी पार्टी काँग्रेससोबत आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवत
असल्यामुळे दिल्लीत तिरंगी लढत होते आहे. समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपचे नेते केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही पक्षांची दिल्लीत चिमूटभरही ताकद नाही. त्यांनी पाठिंबा जाहीर केला न केला तरीही ‘आप’ला काडीचाही फरक पडणार नव्हता. तरीही या दोन्ही पक्षांनी केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला. ‘आप’ला मजबुती देण्यापेक्षा काँग्रेसच्या जखमांवर मीठ चोळणे हा त्यांचा मूळ उद्देश होता.

 

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तर इंडी आघाडीची बैठकही होत नसेल तर ही आघाडी विसर्जित करा, असे सांगून आणखी आग लावली आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस आणि मविआला चांगलीच मजबुती दिली होती. परंतु आजचे चित्र पाहिले तर मविआ दुभंगली आहे. काँग्रेस पक्ष एकाकी झालेला दिसतो. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपापेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जास्त टीका केली. संघ देशात विद्वेष पसरवतो आहे, असा आरोप प्रत्येक सभेत केला. संघावर जमेल तितकी चिखलफेक केली. कट्टरतावादी मुस्लीम संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही प्रमुख अट असावी. कोणत्याही कारणामुळे असो राहुल ज्या संघाला उठसूठ झोडत होते, त्याच संघावर काल शरद पवारांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत स्तुतीसुमने उधळली आहेत.

 

‘संघ ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरला. संघाच्या लोकांनी निवडणूक हातात घेतली. घरोघर जाऊन हिंदुत्वाचा प्रचार केला. आपण मात्र निवडणूक जिंकणे म्हणजे हाताचा मळ आहे, अशा गैरसमजात राहिलो’, या शब्दात पवारांनी संघाचे कौतुक केले आहे. पवार यांची ही विधाने सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत असली तरी पवारांनी या आधीही हे
विधान केलेले आहे. पवारांची भूमिका महाभारतातील शल्यासारखी आहे. शल्य हा पांडवांचा सख्खा मामा, परंतु महाभारत युद्धात तो कौरवांच्या बाजूने लढला. कर्णाचा सारथी म्हणून त्यांने वारंवार त्याचा तेजोभंग करण्याचे काम केले आणि पांडवांच्या विजयात योगदान दिले. पवार सुद्धा गेली अडीच दशके काँग्रेससोबत आहेत. परंतु राहुल गांधी यांच्या प्रत्येक
मुद्द्याची हवा काढण्याचे काम ते करीत आहेत. अदाणी मुद्द्यावर पवारांनी राहुल यांच्या विरोधात भूमिका घेतली. वारंवार गौतम अदाणी यांचे कौतुक केले. त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. आता संघाच्या मुद्द्यावरही ते राहुल यांना फाट्यावर मारण्याचे काम करतायत.

 

एका बाजूला राहुल गांधी संघावर आगपाखड करतायत, दुसऱ्या बाजूला शरद पवार संघावर स्तुती सुमने उधळताना दिसतायत. अर्थात संघ आपले काम करत असतो. कोणाची आगपाखड किंवा स्तुतीमुळे संघाच्या कामात काडीचाही फरक पडत नाही. पूजनीय डॉ. हेडगेवारांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना केली होती. या वाटचालीला आता शंभर वर्षे होतायत. शंभरी उलटलेला काँग्रेस पक्ष साफ खिळखिळा झालेला दिसत असताना संघाने मात्र बाळसे धरलेले दिसते. देशातील कोणतीही निवडणूक फिरवण्याची ताकद आजही या संघटनेत आहे. संघ मजबूत पहाडासारखा उभा आहे. या मजबूतीवर
जवाहरलाल नेहरु, इंदीरा गांधी, राजीव गांधी सगळ्यांनी धडक देऊन पाहिली, संघाचा चिराही ढळला नाही. धडका देणाऱ्यांचा मात्र बाजार उठला. राहुल गांधी परिवाराच्या चुकांमधून भले काही शिकले नसतील, परंतु पवारांनी हा इतिहास पाहिला आहे. संघाला विरोध करणारे इतिहास जमा होतात, संघ मात्र सतत वर्धिष्णू आहे.

हे ही वाचा:

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करावेत

महाकुंभमेळ्यापूर्वी प्रयागराजमध्ये घनदाट जंगल तयार करणार

निज्जरच्या हत्येतील भारतीय आरोपींना जामीन

विधानसभा निवडणूक ‘हातचा मळ’ समजण्याची चूक केली!

पवारांनी फक्त राहुल गांधी यांची हवा काढण्याचे काम केलेले नाही. संघाने निवडणूक फिरवली अशी स्पष्ट कबुली देऊन उत्तम जानकर यांच्या ईव्हीएम प्रचाराचाही बाजार उठवला. पवारांनी काँग्रेसला एक चपराक लावली, दुसऱ्या बाजूला उबाठानेही चिमटा काढला. ‘जे दिल्लीत झाले ते महाराष्ट्रातही होईल’, असे सूचक उद्गार संजय राऊत यांनी काढले आहेत. याचा अर्थ दिल्ली विधानसभा निवडणुकांमधे जसा आप विरुद्ध काँग्रेस अशी हाणामारी होते आहे, तोच प्रकार महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

मविआचा प्रयोग असो वा इंडी आघाडीचा प्रयोग, दोन्ही प्रयोगांचा उद्देश सत्ता प्राप्त करणे एवढाच होता. ती सत्ता आता पुढच्या पाच वर्षांसाठी हातातून निसटली आहे. नीतीश कुमार पुन्हा पलटी मारतील, चंद्राबाबू नायडू मोदींशी गद्दारी करतील अशी सुतराम चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेससोबत राहुन कपाळमोक्ष कशाला करून घ्या, असा विचार देशपातळीवर होतो आहे. पवार आणि ठाकरे याला अपवाद कसे असतील. एकनाथ शिंदे रेशीमबागेत गेले म्हणून सामनातून त्यांच्याविरोधात टीकेचा भडीमार करण्यात आला. भविष्यात ठाकरे आणि पवार रेशीमबागेत जाऊन डॉक्टरांच्या, गुरुजींच्या समाधी समोर नतमस्तक होताना दिसले तर कोणाला फार आश्चर्य वाटण्याची गरज नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा