एकापाठोपाठ एक सलग ट्वीट करत फरार उद्योगपती ललित मोदीने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे. या मोदीचे शरद पवारांच्यासोबत उत्तम संबंध आहेत. अदाणींच्या मुद्यावरून राहुल गांधी रोज सकाळ संध्याकाळ वाट्टेल ते बोलत असतात, त्या अदाणींशीही पवार परिवाराचे स्नेहाचे संबंध आहेत, त्यांच्याविरोधातही पवार कधी एका शब्दाने बोललेले नाहीत. अर्थ स्पष्ट आहे, राजकारणात तुमचे मित्र समान असले तरी शत्रू समान असतीलच याची काही शाश्वती नाही.
गेली आठ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी एकत्र आलेले विरोधक त्यांना हरवणे तर दूरची गोष्ट त्यांच्या सरकारला साधे हलवू सुद्धा शकले नाहीत, त्याचे कारण हेच आहे. ज्यांचे हात, तोंड आणि अवघे अस्तित्व भ्रष्टाचाराच्या कोळशाने माखले आहे असे लोक जेव्हा दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात तेव्हा काय होते, हे आज ललित मोदीने दाखवून दिले. भारतात आय़पीएल सुरू करण्यात ललित मोदी याची भूमिका मोठी होती.
२००७ मध्ये आय़पीएल सामने सुरू झाले. २०१० मध्ये आयपीएलमध्ये झालेल्या घपल्यांच्या आरोपामुळे ललित मोदी २०१० मध्येच भारत सोडून पळाला होता. सध्या तो ब्रिटनमध्ये वास्तव्याला आहे. ट्विटरवरून त्याने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘अलिकडे कोणीही टॉम, डीक आणि गांधी परिवाराचा समर्थक उठतो आणि माझ्याविरोधात बोलतो’, अशा शेलक्या शब्दात त्याने राहुल गांधींचा समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांचा उल्लेख त्याने ‘पप्पू’ असा केला असून काँग्रेस नेत्यांची बाहेर किती मालमत्ता आहे, याचा तपशीलच उघड करेन, अशी धमकी मोदीने दिली आहे.
ललित मोदी याचे घपले आणि त्याचे पलायन दोन्ही यूपीएच्या काळातले. तरीही राहुल गांधी त्याचा ठपका मात्र केंद्रातील भाजपा सरकारच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करतात. कर्नाटकला २०१९ मध्ये झालेल्या प्रचार सभेत राहुल गांधी यांनी नीरव मोदी, ललित मोदी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जोडण्याचा प्रय़त्न केला. इथेही ते थांबले नाहीत, सगळे मोदी चोर कसे? अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली होती. तिथेच ते फसले, खासदारकी गमावून बसले. काँग्रेसकडून ललित मोदी यांच्यावर वारंवार आरोप होत असताना पवार मात्र त्यांच्याविरोधात कधी काहीच बोलले नाहीत. आता तर मोदीने काँग्रेसची कुंडलीच बाहेर काढली आहे.
गांधी परिवारावर, काँग्रेस नेत्यांवर त्याने भ्रष्टाचाराचे उघड आरोप केले आहेत. राहुल गांधीना कठोर शब्दात सुनावले आहे. ‘राहुल माझ्यावर जे आरोप करतायत, त्याप्रकरणी मी त्यांना ब्रिटीश न्यायालयात खेचेन. तिथे भक्कम पुरावे घेऊन त्यांना यावे लागले. राहुल उर्फ पप्पू यांचा मूर्खपणा सिद्ध झालेले मला पाहायचे आहे‘ असे मोदीने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. सीताराम केसरी, सतीश शर्मा, आर.के.धवन, मोतीलाल व्होरा, नारायण दत्त तिवारी या ज्येष्ठ नेत्यांची नावे घेतली असून यापैकी एकही नेता आता हयात नाही. हे सगळे गांधी कुटुंबाचे बॅग मॅन होते असा दावा मोदी याने केला आहे. बॅगमॅनचा अर्थ काय याची आपण कल्पना करू शकतो.
खाता न बही चाचा कहे वही सही… हे सीताराम केसरी यांचे प्रसिद्ध वाक्य, काँग्रेसचे अर्थकारण कशाप्रकारे चालायचे त्याची झलक दाखवणारे होते. ललित मोदी हा देखील काँग्रेस संस्कृती जवळून पाहिलेला उद्योगपती. त्याला काँग्रेसची कुंडली माहिती असणारच. कधी काळी ज्यांच्यासोबत व्यवहार केले, त्यांना झोडण्याचे काम काँग्रेस नेते करतायत. गौतम अदाणी गप्प आहेत, पण मोदीने तोंड उघडले आहे. सगळ्या काँग्रेस नेत्यांची परदेशात मालमत्ता असल्याचे सांगून कमलनाथ यांना विचारा? असे मोदी या ट्वीटमध्ये म्हणाला आहे. आता जर त्याने जे सांगितले त्याचे पुरावे समोर केले, तर राहुल गांधी तोंडावर पडतील.
हे ही वाचा:
शरद पवार हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये दहा वर्षे मंत्री होते. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची तब्बल १५ वर्षे सत्ता होती. अडीच वर्षे महाविकास आघाडीत पवार काँग्रेससोबत होते. तरीही काँग्रेसच्या सोबत असताना पवार आपल्या मित्रांचा हात घट्ट धरून आहेत. राहुल गांधी वारंवार ललित मोदी याला टार्गेट करत असताना पवारांनी मात्र त्याच्याशी संबंध जपले. मे २०१५ मध्ये लंडनला केलेल्या कौटुंबिक दौऱ्यादरम्यान ललित मोदी आणि पवारांची भेट झाली होती. पवारांनीच ही बाब मीडियाला सांगितली. त्यावेळी आपण मोदी यांना भारतात परतण्याचा सल्ला दिला.
‘माझ्यावर जे आरोप आहेत, त्यांना सामोरे जायची माझी तयारी आहे, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आपण भारतात येऊ शकत नाही’, असे मोदी आपल्याला म्हणाल्याचे, पवारांनी मीडियाला सांगितले होते. अगदी अलिकडे म्हणजे २०२१ मध्ये पुण्यात चंदू बोर्डे यांचा सन्मान करण्यात आला तेव्हाही पवार यांनी आयपीएलच्या जडणघडणीत ललित मोदीचा सहभाग असल्याची स्तुती सुमने उधळली होती. पवार कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक मजबूत आघाडी उघडण्याच्या बाता करत असतात. परंतु केंद्र सरकारच्या समोर एकत्र उभे असलेल्या विरोधी पक्षांच्या संबंधांचे अंतरंग हे असे आहेत. राहुल ज्याच्यावर पंजा उगारतायत, पवार त्यांच्याच हातात हात घालून उभे आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)