छे, छे…अतिक्रमणाची नाही, शाहूंना चिंता मुस्लीम मतांची

या बांधकामांवर कारवाईचा हाथोडा पडताच मीडिया आणि सेक्युलर नेत्यांना पुळका आलेला आहे.

छे, छे…अतिक्रमणाची नाही, शाहूंना चिंता मुस्लीम मतांची

विशाळगडाला बेकायदा बांधकामांचा वेढा पडलाय. गड किल्ले म्हणजे शिवकालीन इतिहासाची मंदिरे, या मंदिरांमध्ये मटणाची दुकाने आणि मौज मस्तीसाठी लॉज थाटण्यात आली. इथे मौज करण्यासाठी निलाजरे हिंदू सुद्धा जात असत. सोमवारी या बांधकामांवर कारवाईचा हाथोडा पडताच मीडिया आणि सेक्युलर नेत्यांना पुळका आलेला आहे. या नेत्यांमध्ये छत्रपतींचे वंशज म्हणवणारे शाहू छत्रपतीही आहेत. त्यांनी थेट गडावरील अनधिकृत दर्ग्यालाच भेट दिली. मुस्लिमांनी ज्यांना मते देऊन विजयी केले, त्या मविआच्या नेत्यांना मुस्लीम मतांचे ठेकेदार या कारवाईवरून जाब विचारतायत. डोळे वटारून दाखवतायत. या बांधकामांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या संभाजी राजेंना, हिंदुत्ववादी संघटनांना, कारवाई करणाऱ्या राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

पन्हाळ्यावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी १३ जुलै १६६० रोजी विशाळगड गाठला. आदिलशहाला अद्दल घडवली. ३६४ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय देणाऱ्या विशाळगडावर उभारण्यात आलेल्या बांधकामांच्या विरोधात शिवभक्तांची लढाई जुनी आहे. इथे १५८ बांधकामे आहेत, त्यापैकी दर्ग्यासह सहा ते सात बांधकामे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मलिक ए रेहान हा आदिलशाहीचा सरदार, मराठ्यांनी त्याला ठार केले होते. हिंदवी स्वराज्याच्या या शत्रूला बाबा बनवून त्याचा तीन मजली दर्गा विशाळगडावर उभारण्यात आला. आधी फक्त कबर होती. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात इथे मजले चढले.

 

राज्यातील महायुती सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याजवळील अफजल खानाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकामे हटवली नसती तर खानाला सुद्धा हजरत अफजल खान शरीफ बनवून तिथेही दर्गा उभा राहिला असता. बेवकूफ हिंदू तिथे गेले असते आणि घरात पाळणा हलू दे, मुलाला नोकरी लागू दे, मुलीचे लग्न जुळू दे म्हणून नवसही केले असते. तिथे कोंबडी कापली असती आणि शिजवून खाल्लेही असते. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले तेच सत्य आहे. मला मुस्लिमांची भीती वाटत नाही, ब्रिटीशांचीही वाटत नाही, परंतु हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या हिंदूंची मात्र मला भीती वाटते.

 

हिंदूंची मंदिरे पाडून तिथे मशिदी उभ्या करण्याचा प्रकार मुस्लीम आक्रमकांनी देशभरात केला. शिवाय हिंदू इतिहासाचे मानबिंदू ठरलेल्या शिवकालीन गडांचे हिरवेकरण करण्याची मोहीम बराच काळ छुपेपणे सुरू होती. महाराष्ट्रात इतिहासाचे ब्रिगेडीकरण करण्याच्या प्रक्रियेसोबत किल्ल्याचे हिरवेकरण कऱण्याची प्रक्रियाही जोरात सुरू आहे. अनेक गडांवर अशा कबरी रातोरात निर्माण झाल्या आहेत. तिथे दर्गे उभारण्यापूर्वी ते उखडून टाकण्याची आवश्यकता म्हणूनच आहे.

विशाळगडावर जे काही झाले त्याला फक्त मुस्लीमांना जबाबदार कसे धरावे? मी आणि माझे या पुरता विचार करणारे हिंदू आणि मुस्लीम मतांचा विचार करणारे राजकारणी याला जबाबदार आहेत. इथे मटणाची दुकाने थाटण्यात आली. दारु पिण्याची सोय होती. लॉज बांधण्यात आले होते. इथे मटण आणि कोंबड्या खायला, दारु प्यायला हिंदू तरुणही मोठ्या संख्येने येत होते. काय म्हणावे या आत्मग्लानीला? एका बाजूला मुस्लीम समाजात वाढलेली धार्मिक कट्टरता आणि दुसऱ्या बाजूला हिंदू समाजात वाढलेला बेशरमपणा या दोहोंच्या संकरातून या विशाळगडाची दैना झाली.

 

सुदैवाने सगळेच झोपलेले नाही. काहींचे रक्त अजूनही देव, देश, धर्मासाठी सळसळते आहे. हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक नितीन शिंदे यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी तरुण, अनेक संघटना या बांधकामांच्या विरोधात आवाज उठवतायत. संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी काही तरुणांसह गडावर या बांधकामांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी धडक दिली. एकदा गडावर दर्गे थाटले की देशबुडव्यांची इथे कशी सोय होते हे संभाजी राजे यांनीच काल उघड केले. इंडियन मुजाहिदीनचा इंडीया कमांडर दहशतवादी यासिन भटकळ हा सुरक्षा यंत्रणांचा चकवा देत देशभरात फिरत असताना त्याने या दर्ग्यात आश्रय घेतला होता. चुकला फकीर मशिदीत, या धर्तीवर वॉण्टेड दहशतवादी अनधिकृत दर्ग्यात अशी नवी म्हण बनवता येईल अशी सध्या परिस्थिती आहे.

 

विशाळगडाच्या मुक्तीसाठी आवाज उठवणाऱ्या चिरंजीवांचे कौतुक करायचे सोडून कोल्हापूरचे काँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांनी पत्रक काढून त्यांचा निषेध केला. सरकारने ज्यांची बांधकामे तोडली त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. गडावर जी बांधकामे पाडण्याचे आदेश आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, असे पत्रात खाली एका ओळीत म्हटले आहे. कदाचित दर्गा तोडण्यास न्यायालयाची स्थगिती आहे, म्हणून शाहू महाराज एवढे तरी बोलले. ते काँग्रेसचे खासदार असेपर्यंत दर्गा तोडा असे बोलण्याची त्यांना मुभा नाही. छत्रपतींचे वंशज म्हणवणाऱ्यांनाही ही मुभा नाही.

 

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील या वादात उतरले आहेत. मविआच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मुस्लिमांनी दोन दोन तास उन्हात उभे राहून मतदान केले, त्याचे हे फळ आहे का? असा सवाल त्यांनी या पक्षांना केला आहे. संभाजी राजे यांच्यावरही त्यांनी टीका केली. जाळपोळीचे नेतृत्व केले, असा ठपकाही त्यांच्यावर ठेवला.

 

एका नव्या नरेटीव्ह वॉरची ही सुरूवात आहे. कोट्यवधी शिवभक्तांचे श्रद्धा असलेल्या विशाळगडावर दर्गा उभारला जातो, मटणाची दुकाने, लॉज उभारले जातात. अनधिकृत बांधकामे ठोकली जातात. त्याबद्दल कोण अवाक्षर काढत नाही. शिवकालीन हिंदू इतिहासाचा अविभाज्य इतिहास असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, छत्रपती राजाराम यांच्या काळात मराठ्यांच्या हालचालींचे एक प्रमुख केंद्र असलेला, महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांकडून हिसकावून घेतलेला हा गड, अतिक्रमणांच्या माध्यमातून काबीज करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याबद्दल मुग गिळून बसलेले, नेते, मीडिया संभाजी राजेंना गुन्हेगार ठरवतात, त्यांना जाब विचारतात. गडाची वास्तू पादाक्रांत करणाऱ्यांना पीडित ठरवले जाते. अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम नजरेआड करणारे पक्ष सेक्युलर ठरवले जातात.

हे ही वाचा:

अनंत- राधिका यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार असल्याचे ट्विट करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

मविआचे नेते शिवरायांच्या की, गडावर हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी !

खासदार छत्रपती शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखलं !

केजारीवालांची प्रकृती व्यवस्थित

मुस्लीम मतांची जादू पाहा, ८० वर्षांचे शाहू छत्रपती, काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासोबत विशाळगडावर गेले. त्या अनधिकृत दर्ग्यात उभे राहून त्यांनी त्याला पावन केले. तो दर्गा जो हिंदवी स्वराज्याचा शत्रू असलेल्या आदीलशहाच्या सरदाराच्या नावाने उभा आहे. आपण स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणवतो त्याचीही चाड नाही. विशाळगडावर उत्तुंग दर्गा उभा राहिला, मटणाची दुकाने उभी राहिली, इथे दारु ढोसायला तरुणांचे लोंढे येत होते, किल्ल्याचे पावित्र्य भंग करत होते, तेव्हा शाहूंना या प्रकाराची दखल घ्यावीशी वाटली नाही. अतिक्रमणांवर बडगा चालवण्यात आला तेव्हा मात्र, त्यांना विशाळगडाची आठवण झाली. मुस्लीम मतांमुळे तुम्ही खासदार म्हणून दिल्लीत गेलात, याची आठवण जलील यांनी करून दिल्यामुळे बहुधा, शाहुंना घाम फुटला असावा. मतदारांना दिलासा देण्यासाठी त्यांनी विशाळगडाची वाट धरली. हे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. स्वत:ला छत्रपती म्हणून घेणारे नेते.

 

संभाजी राजे यांनी मविआचे सरकार असताना गड किल्ल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. ही बांधकामे हटवण्यात यावीत अशी विनंती केली होती. परंतु मुस्लीम मतांकडे डोळा लावून बसलेले ठाकरे हे करतील याची शक्यता शून्य होती. राज्यातील महायुती सरकारने या बांधकामांवर हाथोडा चालवण्याचे धाडस दाखवले आहे. विशाळगडावरील दर्गा जमीनदोस्त करण्यासाठी आता न्यायालयात सुद्धा सरकारला ताकदीने लढावे लागणार आहे.

विशाळगडावरून बांधकामाच्या मुद्द्यावरून राज्यातील मुस्लीम मतदारांना कुरवाळण्याचे काम मविआचे नेते नक्की करतील. मुस्लीम मतदार विधानसभेच्या निवडणुकांमध्ये रांगा लावून त्यांच्यासाठी मतदान करतील. ते प्रत्येक निवडणुकीत करतातच. हिंदू मतदार काय करणार हा प्रश्न आहे. लोकसभेची पुनरावृत्ती करणार की नवा इतिहास निर्माण करण्यासाठी प्रयत्न.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version