छत्रपती संभाजी नगरच्या जाहीर सभेत गृहमंत्री अमित शहा यांचे तडाखेबंद भाषण झाले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर त्यांनी तोफ डागली. परंतु शरद पवार यांच्याबद्दल शहा जे काही म्हणाले ते अधिक तिखट आणि जळजळीत होते. त्या तुलनेत ठाकरेंवर त्यांनी केलेला भडीमार सौम्य होता, असे म्हणता येईल. काही महिन्यांपूर्वी हे प्रमाण नेमके उलट असायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा काही तरी उलथापालथ होण्याचे संकेत शहाजी बापू पाटील यांनीही दिलेले आहेत.
राजकीय समीकरणे बनवणे आणि बिघडवणे या दोन्ही प्रांतात अमित शहा मुरलेले आहेत. त्यांच्या बोलण्यात राजकीय पंडीत नेहमी काही तरी बिटविन द लाईन शोधण्याचा प्रयत्न करीत असतात. संभाजी नगरमध्ये भाषण करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षातील कामगिरीबाबत ते भरभरून बोलले. त्यांनी शरद पवारांवर तिखट मारा केला.
शरद पवारांना राजकारणात ५० वर्षे झाली. महाराष्ट्राची जनता त्यांना झेलते आहे. सहन करते आहे. ५० वर्षांचा नको त्यांनी गेल्या पाच वर्षांचा हिशोब तरी जनतेसमोर मांडावा, असा घणाघात अमित शहा यांनी केला. तुलनेने उद्धव ठाकरे यांच्याबाबत ते जे काही बोलले ते अगदीच सौम्य किंबहुना मिळमिळीत होते. ‘शिवसेना प्रमुखांचा विचार सगळा देश मानायचा. परंतु राम मंदीर, कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे.’
मविआतील या दोन्ही नेत्यांवर अमित शहा फार वेळ बोलले नाहीत. टीकात्मक कार्यक्रम त्यांनी थोडक्यात आटोपला. आज पंढरपूरात शिंदे गटाचे नेते काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांची सभा होती. या निवडणुकीत शहाजी बापू यांनी ताजे भाकीत केले. काँग्रेस आणि ठाकरेंची युती अनैसर्गिक होती, येत्या काळात मोदी-ठाकरे एकत्र येतील असे ते म्हणाले. भाजपा ठाकरेंना मीठ घालण्याची शक्यता शून्य असल्यामुळे ठाकरे हेच भाजपाकडे येतील असा या भाकिताचा अर्थ. आपले भाकीत शंभर टक्के सत्य होईल असेही शहाजी बापू ठामपणे म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
मलाही मुसेवाला-नफेसिंगप्रमाणे मारतील!
अपहरण, खंडणी प्रकरणी माजी खासदार धनंजय सिंह यांना सात वर्षांना तुरुंगवास
झारखंड: सर्व आरोपी अटक, स्पॅनिश जोडपे निघाले नेपाळला!
रणजी ट्रॉफी: मध्य प्रदेशला नमवत विदर्भाची फायनलमध्ये उडी!
अमित शहा यांनी संभाजीनगरात केलेली सौम्य टीका आणि शहाजी बापू यांचे भाकीत या कड्या जोडल्या तर काही तरी शिजतंय याचा अंदाज येऊ शकतो. आग असल्याशिवाय धूर येत नाही. याची कुणकुण बहुधा मविआच्या नेत्यांना, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही लागली आहे. लोक चर्चा करतायत. त्याचे कोणत्याही प्रकारचे खंडन ठाकरे गटातून केले जात नाही. संजय राऊत यांनी इशारो इशारों में सांगून टाकलंय की ठाकरेंवर जाळे टाकले जाते आहे.
भाजपा आणि ठाकरेंमध्ये एका बाजूला रोज हाणामारी होत असल्यामुळे अनेक लोक या चर्चेवर विश्वास ठेवत नाहीत. परंतु ज्यांना भाजपाचे राजकारण माहिती आहे, ते ठामपणे सांगतायत की अमित शहा काहीही करू शकतात. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे बरेच न्यजू चॅनेल राजकीय नेत्यांना बोलावून त्यांच्या मुलाखती घेत आहेत. अशा एका मुलाखतीत अमित शहा यांना ठाकरे तुमच्या सोबत येणार का? असा सवाल जेव्हा प्रश्न कर्त्याने विचारला तेव्हा अमित शहा म्हणाले अरे भैया मुझे आप की भी जरूत है, आप भी आ जाईये.
अमित शहांना हा प्रश्न अशा आणखी काही मुलाखतीत विचारला. तेव्हा अमित शहा यांनी कुठेही स्पष्ट नकार दिलेला नाही. कधी प्रश्न टाळला, तर कधी हसण्यावारी नेला. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस जितक्या स्पष्टपणे या विषयावर बोलतात, तितका स्पष्ट नकार अमित शहा यांनी दिलेला नाही. बेईमानी करणाऱ्यांना माफी नाही, असे अमित शहा यांनी मुंबईतील सभेत सांगितले होते. परंतु हीच भूमिका भाजपाने नीतीश कुमार यांच्याबाबत घेतली होती. राजकारणात काहीही अशक्य नाही, सध्याच्या राजकारणात तर काहीही नाही. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह दोन-तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजे सागर बंगल्यावर भेट घेतली, असे वृत्त आहे. मविआत फक्त काँग्रेस उरणार अशी चिन्हे आहेत.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)