पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाला आज एक वेगळे वळण लागले. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आज मुंबई पोलिस आज मुंबई पोलिस मुख्यालयात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लिखित तक्रार दिलेली आहे. या तक्रारीतील तपशील स्फोटक आहे. यात ड्रग्ज आहेत, लहान मुलांच्या शोषणाचा उल्लेख आहे. सर्वसामान्य व्यक्तिचा मेंदू गरगरेल, अशा प्रकारचे आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. दिशा सालियनच्या मृत्यू मागे असलेल्या काळ्या कारवाया किती गडद होत्या त्याचा उलगडा या तक्रारीतून होतो आहे.
मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या नावे ही तक्रार करण्यात आलेली आहे. पोलिस मुख्यालयात पोलिस सहआय़ुक्त गुन्हे, लख्मी गौतम यांची भेट घेऊन सतीश सालियन यांनी त्यांना एक सविस्तर तक्रार दिली. यात आदित्य ठाकरे यांच्या टोळक्याच्या काळ्या कारवायांचा पर्दाफाश केलेला आहे. दिशा-सुशांतच्या मृत्यू मागील खरी कारणे यातून समोर येऊ शकतील. या तक्रारीत दिशाच्या हत्येला अपघाती मृत्यू ठरवण्यात आला. या षडयंत्रात राजकीय नेते, बॉलिवूडचे सेलिब्रिटी, मुंबई पोलिस यांचा सहभाग होता, असा आरोप करण्यात आले आहेत.
पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिशाच्या मृत्यूला अपघाती मृत्यू म्हटले, सुशांतने आत्महत्या केली असा दावा केला. सतीश सालियन यांनी आज जी तक्रार मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे दाखल केलेली आहे, त्यातला तपशील वेगळीच कहाणी सांगतो. या तक्रारीतून समोर आलेली माहीती अत्यंत किळसवाणी, भेसूर आणि भयंकर आहे. आदित्य ठाकरे यांचे कर्जतमधील फार्म हाऊसमध्ये चालत असलेल्या धंद्यावर या तक्रारीत प्रकाश टाकण्यात आला आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसने आपला अजेंडा आणि झेंडा मुस्लिम लीगच्या कार्यालयात सरेंडर केला
औषधीय गुणांनी परिपूर्ण कौंच बिया, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर
सोने खरेदीसाठी हवालाद्वारे पाठवलेल्या पैशांचा वापर केल्याची रान्या रावची कबुली
जगातील सर्वात जुनी डाळ, जी पोटातील पथरी देखील विरघळवण्याची क्षमता ठेवते
दिशा सालियनवर बलात्कार झाला. हा प्रकार दडपण्यासाठी तिची हत्या करण्यात आली, असा समज आजही काही लोक बाळगून आहेत. परंतु या दोन्ही कथित हत्यांमागे वेगळीच कहाणी आहे. मुंबईच्या उच्चभ्रू धेंडांमध्ये मौजमजेसाठी चालणारे किळसवाणे प्रकार या तक्रारीतून समोर येतात. मुंबईत पैसा फेकला की काहीही उपलब्ध होऊ शकते. ते अगदी बेकायदेशीर असले तरी आणि त्यातून कोणाचा मानसिक-शारीरीक छळ होत असला तरी इथे पोलिस मूक दर्शक बनून राहतात. समाजसेवेचा आव आणणारे एनजीओ लैंगिक शोषणासाठी लहान मुले पुरवण्याचे काम करतात. हे खणून काढण्याची जबाबदारी असलेले राजकीय नेते त्यात सामील असतात. हे उघड होण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा संपूर्ण ताकद वापरून सत्य दडपण्यात येते. सगळी व्यवस्थाच त्या लोकांना मदत करताना दिसते, ज्यांची जागा तुरुंगात आहे.
मधुर भांडारकरचा पेज-थ्री ज्यांनी पाहिलाय, त्यांना मुंबईतील उच्चभ्रू पार्ट्यांमध्ये काय काय प्रकार होतात, याची कल्पना असेल. सिनेमातले सगळे खरे नसते असा समज खोटा ठरावा आणि सिनेमात दाखवलेले फुटकळ वाटावे असा तपशील सालियन यांच्या तक्रारीत आहे. ड्रग्जचा कारभार आहे. लहान मुलांचे लैंगिक शोषणाचा मामलाही आहे. आदित्य ठाकरे, सुरज पंचोली, दिनो मोरिया यांची टोळी यात गुंतल्याची माहिती दिशा सालियनला मिळाली होती. ही माहिती तिने सुशांत सिंह राजपूत याच्याही कानावर घातली. रिया चक्रवर्तीच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना ही बाब समजली. त्यातून या दोघांच्या हत्या झाल्या, असे या तक्रारीत म्हटले आहे.
आदित्य ठाकरे हे नियमितपणे ड्रग्ज घेतात. नवाब मलिक याचा जावई समीर खान याच्याशी त्यांचे संबंध आहेत. हा समीर खान डॅप या कंपनीच्या माध्यमातून ड्रग्जचा धंदा करायचा. एनसीबीने त्याला अटक केली होती. बराच काळ तो तुरुंगात होता. अलिकडेच त्याचे निधन झाले. आदित्य यांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर हे सगळे धंदे चालायचे. तिथे एका एनजीओच्या माध्यमातून लहान मुले पुरवली जायची. त्यांचे याच फार्म हाऊसवर लैंगिक शोषण केले जायचे. दिशाच्या घरी ८ जून २०२० रोजी एक पार्टी झाली होती. त्याच्या ठिक एक दिवस आधी मुंबईतील एका सेलिब्रिटीच्या बंगल्यावर पार्टी
झाली होती. त्या पार्टीत ड्रग्ज, लहान मुलांचे शोषण असे सगळे प्रकार झाले. दिशाच्या मृत्यूशी या पार्टीचाही संबंध असल्याचा दावा सतीश सालियन यांनी केलेला आहे.
एका बाजूला दिशा सालियनचे प्रकरण पाच वर्षांनी चर्चेत येते, दुसऱ्या बाजूला सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केल्याची बातमी येते. रिया चक्रवर्तीला क्लिनचिट मिळते, हा काय निव्वळ योगायोग
आहे? अशी वातावरण निर्मिती केली जाते, की बघा फक्त आरोपांची राळ उडाली, प्रत्यक्षात सुशांत आणि दिशाच्या प्रकरणात काहीच हाती आले नाही. हा तर्क करताना सीबीआय तपास फक्त सुशांत प्रकरणाचा झाला होता. दिशा सालियन
प्रकरण सीबीआय़कडे कधीच नव्हते, ही बाब व्यवस्थित दडवली जाते. दिशाच्या वडीलांनी तक्रारीत केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. एक बाप समोर येऊन सांगतो आहे, की माझ्या मुलीचा मृत्यू अपघाती नसून ती हत्या आहे. त्यामागे एक खूप मोठे षडयंत्र आहे. आता तरी मुंबई पोलिस याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहेत का?
सालियन यांनी केलेले आरोप खरे की खोटे हे स्पष्ट होण्यासाठी तपास होणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. हे आरोप फक्त आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्रमंडळाविरुद्ध नाहीत, त्यातले अनेक आरोप तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह, त्या काळातील ठाकरेंचे लाडके तपास अधिकारी सचिन वाझे, मालवणी पोलिस ठाण्याचे अधिकारी चिमाजी आढाव यांच्याविरोधात आहेत. त्यामुळे याप्रकरणात निष्पक्ष तपास होण्याची गरज आहे. परंतु बड्या धेंडांची नावे असल्यामुळे तो होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. हे आरोप सिद्ध करण्या इतके पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी वारंवार केलेला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)