शिउबाठाचे नेते रवींद्र वायकर यांच्यावर सध्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांची वक्रदृष्टी वळलेली आहे. जोगेश्वरीतील ज्या दोन लाख वर्ग फूटांच्या जमीनीवर वायकर यांचा अवैध कब्जा असल्याचा दावा सोमय्या करतायत, त्याचा बाजार भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असतानाच उठणार होता.
रवींद्र वायकर हे नगरसेवक होते. तीन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते, त्यानंतर सलग तीन वेळा ते आमदार झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. वायकर यांच्या या उत्कर्षामागे मातोश्रीशी असलेले त्यांचे घट्ट संबंध होते. वायकर यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. भ्रष्ट नगरसेवकांची झेप ज्या काळात फार नव्हती, म्हणजे झोपडपट्टीत कोणी घराची उंची वाढवील पाच हजार घ्या, दुकान वाढवले दहा हजार घ्या, या पलिकडे नसायची, त्या काळात वायकर यांनी काही बिल्डरांशी घट्ट संबंध बनवले आणि जमिनी ताब्यात घेण्याचा उद्योग सुरू केला. त्यांची क्षमता मोठे हात मारण्याची होती.
मातोश्रीवर एक पिढी अशी होती, ज्यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी घट्ट ऋणानुबंध होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांचे मातोश्रीवर वजन वाढले. वायकर त्यातलेच एक होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित केले. त्यांच्यासोबत अनेक व्यवसायात ते भागीदारही आहेत.
जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडची अवस्था खस्ता हाल असताना त्यांनी मातोश्री स्पोर्ट्स क्लब, सुप्रीमो रेस्तराँ सुरू केले. आता किरीट सोमय्या यांनी ज्या दोन लाख वर्ग फूट भूखंडाचा घोटाळा बाहेर काढला आहे, तो घोटाळा खरे तर वायकर यांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीतच बाहेर पडला असता. परंतु प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.
वायकर यांनी बांधलेले मातोश्री स्पोर्ट्स क्लब हाच एक वादग्रस्त प्रकल्प आहे. त्याच्या शेजारी सुप्रीमो एक्टीव्हीटी सेंटरच्या नावाखाली ही दोन लाख वर्ग फूट जागा कब्जात घेतली होती. यापैकी ६७ टक्के जागा मैदानासाठी आरक्षित असताना, इथे लोकांना ये-जा करण्यासाठी मज्जाव करण्यात आला. सुरुवातीला लोकांनी विरोध केला. इथे वहीवाटीसाठी आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर महिनाभर लोकांसाठी ही जागा सकाळ आणि संध्याकाळी ठराविक वेळी खुली करण्यात येत असे. परंतु काही काळानंतर हे बंद झाले. लोक वारंवार आंदोलन करू शकत नाहीत हे वायकर यांना पक्के ठाऊक होते. जी जागा लोकांना व्यायाम, वॉक करण्यासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी उपलब्ध नव्हती, ती जागा लग्न सोहळ्यांसाठी बक्कळ पैसा मोजून मात्र देण्याची सोय वायकरांनी करून ठेवली.
तिथे वऱ्हाडी मंडळींच्या जेवणाच्या आणि राहण्याच्या सोयीसाठी पक्के बांधकामही करण्यात आले होते. स्थानिक भाजपा नगरसेविका उज्वला मोडक यांनी ही जागा आम जनतेसाठी खुली व्हावी म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. पालिका अधिकाऱ्यंकडे तक्रार केली. सप्टेंबर २०१७ मध्ये मोडक यांच्या तक्रारीनंतर सुप्रीमो एक्टीव्हीटी सेंटरला नोटीसही बजावण्यात आली होती. परंतु युतीचे सरकार होते, वायकर मंत्री होते, ठाकरेंच्या जवळचे होते म्हणून इथे कधी कारवाई झाली नाही. जेव्हा जेव्हा कारवाईची शक्यता निर्माण व्हायची तेव्हा मंत्रालयातून कारवाई थांबवण्यासाठी फोन यायचे. भाजपाचाही नाईलाज होता. सरकार टिकवण्यासाठी काही बाबतीत शिवसेनेसमोर माघार घ्यावी लागायची.
हे ही वाचा:
चीनच्या आर्थिक सुधारणेमुळे भारतीय हिरे चमचमले
…म्हणून राज ठाकरे म्हणतात सत्तेपासून आपण दूर नाही!
तरुणाने शेपटाला छेडले आणि वाघ त्याच्यावर उलटला..नंतर जे झाले ते वाईट होते
मंदिरांवर हल्ले वाढताहेत, नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज यांना काय म्हणाले?
महल पिक्चर्स. प्रा. लि. या कंपनीच्या मालकीची जागा. कंपनीचे मालक अविनाश भोसले, शाहीद बलवा आणि विनोद गोएंका हे या कंपनीचे मालक त्यांच्याकडून ही जागा विकत घेण्यात आली. मुळात ही जागा सुप्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या मालकीची. इथे त्यांचा स्टुडिओ होता. आजूबाजूची जागाही त्यांच्या मालकीची होती. वायकर यांनी या जागेवर मैदानाचे आरक्षण असल्याचे सांगून रेडी रेकनरनुसार ४ कोटी रुपये किंमत असलेली ही जागा अवघ्या तीन लाखांना पदरात पाडून घेतली होती.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वायकर यांना लग्न सोहळ्यातून मिळणाऱ्या भाड्यात रस उरला नाही. या जागेवर काय होऊ शकते ते त्यांना पक्के ठाऊक होते. बळकावलेल्या दोन लाख वर्ग फूट जागेवर पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या. ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्यासाठी अशक्य काय होते? वायकरांना पंचतारांकीत हॉटेलसाठी परवानगी देण्यात आली. वायकर हे ठाकरेंचे पार्टनर असल्यामुळे सगळा मामला घरचाच होता. मैदानासाठी राखीव असलेली ६७ टक्के जागा महापालिकेला देऊन वाढीव एफएसआय़ मिळवण्यात आला. मुळात जी जागा महापालिकेचीच होती ती भाड्याने देऊन वायकर यांनी वर्षोनुवर्षे बक्कळ कमाई केली. आता पालिकेची जागा पालिकेला परत देऊन पुन्हा स्वत:चे उखळ पांढरे करण्यात आले.
किरीट सोमय्या यांनी २०२१ मध्ये या प्रकरणात लक्ष घातले. सुमारे ५०० कोटीच्या या पंचतारांकीत हॉटेल घोटाळ्या प्रकरणी तक्रार केली. वायकर यांच्यावर कारवाईची मागणी केली. इथे पंचतारांकीत हॉटेल बांधण्यासाठी वायकर यांनी आधीचे बांधकाम तोडून टाकले, इथे ह़ॉटेलचे बांधकाम सुरू झाले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा हालचाली सुरू झाल्या. महापालिकेने ८ फेब्रुवारी रोजी वायकर यांना नोटीस बजावली. जनतेची मालमत्ता कब्जात घेऊन इथे पंचतारांकित हॉटेल बनवण्याबाबत खुलासा मागवण्यात आला.
आज ईडीने दापोलीतील साई रिस़ॉर्ट प्रकरणी सदानंद कदम याला ताब्यात घेतले आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी यापूर्वी ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांची चौकशी केली आहे. वायकरांच्या घोटाळ्याची तुलना करता दापोलीतील घोटाळा चिल्लर म्हणावा लागेल. महत्वाचे कारण म्हणजे दापोली आणि मुंबईतील जागेच्या किमतीत असलेला अति प्रचंड फरक. एखादे फळ पिकवावे तसा वायकरांनी हा प्रकल्प पिकवला. आधी जमिनीचा कब्जा घेतला. त्यानंतर तब्बल २० वर्षे वाट पाहिली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मौका पाहून चौका मारला. पंचतारांकित हॉटेलची मंजुरी पदरात पाडून घेतली.
परंतु पाण्यात पडलेले फार काळ दडून राहत नाही असे म्हणतात. कधी तरी ते पृष्ठभागावर येतेच. ठाकरे आणि भाजपाचे संबंध तुटल्यामुळे अनेकजण हळहळले, परंतु हे संबंध तुटले नसते तर घोटाळेबाजांचे कारनामे कधी जनतेच्या समोर आलेच नसते. अलिबागेतील १९ बंगल्यांचे प्रकरण ऐरणीवर आहे. तिथे ठाकरे आणि वायकरांचा थेट सहभाग उघड दिसतो आहे. त्यात समोर येत असलेले हे दुसरे प्रकरण म्हणजे सत्ते पे सत्ता आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)