27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरसंपादकीयमनोरुग्ण प्रचार टोळीला आपले म्हणा...

मनोरुग्ण प्रचार टोळीला आपले म्हणा…

हे जितकी ओरड करतील तितकेच जनतेचे मोदींना समर्थन वाढेल

Google News Follow

Related

पुण्यात निर्भय बनो नावाच्या तमाशा पटाचा ताजा प्रयोग उधळून लावण्याचा प्रयत्न काही भाजपा कार्यकर्त्यांनी केला. पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली. घोषणा बाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या या कंपूला धडा शिकवण्यासाठी हे सगळं रामायण घडलं. मुळात हे सगळं करायची गरज नव्हती.

इको सिस्टिम मोडीत निघाल्यामुळे जनतेच्या दृष्टीने संदर्भहीन झालेले हे लोक आहेत. तोंडाला कुत्रा बांधल्यासारखी ओरड करणारी ही मंडळी जेव्हा मोदींच्या विरोधात बोलतात तेव्हा मोदी अधिक भक्कम होतात. बोलणाऱ्यांचा मात्र बाजार उठतो हा गेल्या दहा वर्षातला अनुभव आहे. हे मोदींचे प्रचारक आहेत. मोदींचा ठसा अधिक गडद करण्याचे काम यांनीच केले आहे.

भाजपाला सत्तेवरून हटवा आणि लोकशाही वाचवा हा या मंडळींचा अजेंडा आहे. देशावर आणिबाणी लादून देशातील लोकशाही गिळणाऱ्या काँग्रेससाठी आणि महाराष्ट्रात मविआच्या सत्ता काळात विरोधकांवर बुलडोझर चालवणाऱ्या उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करण्यासाठी हे अभियान सुरू आहे.

गेल्या दशकभरात पंतप्रधान मोदींचा आलेख सतत उंचावतो आहे. त्यात गल्लोगल्लीचे डावे, समाजवादी, पुरोगामी यांचा मोठा हात आहे. त्यांनी जर सतत भ्रष्ट काँग्रेसची पाठराखण केली नसती, देशाच्या संस्कृती, परंपरा आणि श्रद्धास्थानांचा अपमान केला नसता, हिंदू समाजाला क्रमाक्रमाने जातीयवादी, कट्टरवादी आणि अखेर दहशतवादी ठरवण्याची बदनामी मोहीम आखली नसती तर मोदींना कदाचित आजची उंची प्राप्त झाली नसती.

मोदींवर राळ उडवणारी ही गँग इतकी कुख्यात आहे की ते जे ज्याच्या विरोधात बोलतील तो सच्चा नेता असला पाहिजे याबाबत जनतेच्या मनात अतूट विश्वास आहे. निदा फाजलीचा एक शेर आहे. उसके दुष्मन है बहोत, आदमी अच्छा होगा..
एका बाजूला मोदींची प्रतिमा लार्जर दॅन लाईफ झालेली असताना मोदींच्या विरोधात कुप्रचार करणाऱ्यांची अवस्था काय झाली आहे? राजकारणापासून सुरूवात करू काँग्रेस नेते राहुल गांधी, त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यांचे चेले संजय राऊत, दिल्लीत अरविंद केजरीवाल सगळ्यांची कढी पातळ झालेली आहे.
महाराष्ट्रात मोदीविरोधात लिखाण करून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी राज्यसभा पदरात पाडून घेतली. महाराष्ट्रातील मोदीविरोधी पुरोगाम्यांचे वैचारीक नेतृत्व करणारा हा नेता सोनियांची इतकी आळवणी का करत होता हे त्यांना राज्यसभेचे चॉकलेट मिळाल्यावर कळले. राज्यसभेची सहा वर्ष उलटून गेली. कधी काळी कुमार केतकर या नावाला असलेली चमक आज शिल्लक राहिली आहे का? पुढे काय? सगळाच अंधार. २००२ पासून मोदी नावाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी अनेकांनी लेखणी झिजवली. त्यातले अनेक जण धुमकेतू सारखे चमकले आणि गायब झाले.

मोदींविरोधात सुपारी पत्रकारीता करणाऱ्यांची यादी लंबीचौडी आहे. त्यातले बरेच अस्ताला गेले आहे, अनेक जणांना मानसिक उपचारांची गरज आहे. आम आदमी पार्टीच्या वळचणीला गेलेल्या आशुतोषची काय स्थिती आहे? पत्रकारिता तर संपलीच होती, राजकारणातही टीकाव लागला नाही. आता टीव्हीवरच्या चर्चेत कधी सुधांशू त्रिवेदी तर कधी शहजाद पूनावालाच्या थपडा करत केविलवाणा तर्क मांडण्याचे काम हा करतोय. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल हे ठरवणारे बरखा दत्त, राजदीप आता आपले चेहरे मोदीविरोधी दिसू नयेत म्हणून केविलवाणी धडपड करतायत.

निखिल वागळेची जी फडफड होतेय त्याचे कारणही हेच आहे. कुमार केतकर, आशुतोष, पुण्यप्रसून वाजपेयी, यांच्यासारख्या अनेकांची पडझड झालेली आहे. सगळी ल्युटीयन आणि खान मार्केट गँग मोडीत निघाली आहे. सगळी चमक धमक संपली. साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉकमधला प्रभाव आटला. महागड्या भेट वस्तू, परदेश दौरे, या दौऱ्यात होणारी ऐयाषी सगळंच संपलं. ओपिनियम मेकर म्हणून सद्दी संपली. कुत्रं सुद्धा तंगड वर करत नाही अशी परीस्थिती आहे.

वागेळेंचे दुःखही वेगळे नाही. त्यामुळे अचानक यांना अजिबात धोक्यात नसलेल्या लोकशाहीचे उमाळे आले आहेत.
लोकशाहीच्या बाता करणाऱ्या या लोकांनाच लोकशाही मान्य नाही. मोदींच्या विरोधात यांनी आपण सातत्याने गरळ ओकूनही मुख्यमंत्री म्हणून गुजरातची जनता १२ वर्षे भक्कमपणे मोदींच्या पाठीशी उभी राहते. पंतप्रधान झाल्यावर देशातील जनता दहा वर्षे त्यांच्या मागे उभी राहते. त्यांच्यावर ना अवॉर्ड वापसीच्या तमाशाचा फरक पडत नाही, ना विरोधकांनी संसदेबाहेरील गांधींच्या पुतळ्यासमोर केलेल्या उपोषणाचा, ना खलिस्तानी अजेंडाला साथ देणाऱ्या किसान आंदोलनाचा. शाहीनबागेतील किंवा तत्सम आंदोलनामुळे मोदी कमजोर होत नाहीत, उलट याच माणसाच्या हाती देशाची सत्ता हवी हा विचार देशवासियांच्या मनात बळकट होतो. जनतेच्या मताला यांच्या दृष्टीने किंमत नाही. कारण हे सुपारीबाज स्वत:ला जनतेपेक्षा मोठे आणि शहाणे समजतात.

मोदीविरोधी प्रचार करणारे कायम माती का खातात? त्याचीही या मंडळींना उकल होत नाही हे विशेष. महाराष्ट्रात हे लोक कोणाला डोक्यावर घेतात, तर उद्धव ठाकरेंना. देश पातळीवर यांच्या आंखो का तारा कोण असतो तर राहुल गांधी. एकाला महाराष्ट्र कळला नाही, दुसऱ्याला प्रश्न पडतो की भारताची जनता ‘भारत माता की जय’च्या घोषणा का देते? भाजपा फॅसिस्ट पक्ष आहे, अशी ओरड करणारे वागळे जितेंद्र आव्हाड यांनी अनंत करमुसेला केलेल्या मारहाणीचे समर्थन करतात. अशा आणखी किती जणांना करमुसे सारखे झोडता येईल, याची यादी म्हणे यांच्याकडे तयार आहे. ही नेमकी कोणती लोकशाही आहे? की भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घटनेची व्याख्या यांनी बदलेली आहे? कोणत्या घटनात्मक संस्थेवर यांचा विश्वास उरला आहे?

गुजरात दंगे झाले २००२ मध्ये. मोदींवर खापर फोडण्यात आले. मोदींना हा कलंक मिटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मोदींना क्लीनचीट दिल्यानंतर त्यांचा उल्लेख दंगेखोर म्हणून करणे ही जर वागळेंची लोकशाही असेल तर दांडगाई कशाला म्हणतात. या दांडगाईला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त वागळे कंपनी अदखलपात्र आहे, याची जाणीव भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही ठेवायला हवी.
मोदींना देशाच्या जनतेने दोन वेळा पंतप्रधान बनवले. दोन्ही वेळेला उत्तर भारतात भाजपाला लक्षणीय मतं मिळाली म्हणून उत्तर भारतातील राज्यांना गोमूत्र राज्य म्हणारा वेडा विश्वंभर याच्याकडे विचार नावाची चीज अस्तित्वात आहे? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तरेसोबत दक्षिणेतही झंडे गाडल्यावर हा वेडा काय बोलणार आहे? यांच्या बरळण्याचे कारण जनतेला ठाऊक आहे. यांना भाजपा आणि मोदींची काविळ आहे. यांच्या मनात अतोनात मोदीव्देष भरलेला आहे. हे मोदीद्वेषाने आंधळे झालेले मनोरुग्ण आहेत. मोदींना लोकशाही मार्गाने हरवू शकत नाही, याची जाणीव झाल्यामुळे हे नैराश्यग्रस्त तोंडाची हगवण झाल्यासारखे वाट्टेल ते बोलत असतात. जनतेच्या मनातील मोदीप्रेम अधिक बळकट करत असतात. देशाच्या एकता अखंडतेवर विश्वास असलेला शहाणा माणूस गोमूत्रग्रस्त राज्य अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरू शकत नाही. हा मत्सर फक्त उत्तरेतील राज्यांबद्दल वा तिथल्या जनतेबद्दल नाही, हा मत्सर गायीबाबत करुणा बाळगणाऱ्या हिंदू समाजाबाबत आहे. हा देशाच्या मतदारांचा अपमान आहे.

हे ही वाचा..

पाच वर्षांत देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म!

ओवैसींकडून लोकसभेत ‘बाबरी मशीद जिंदाबाद’चे नारे

खलिस्तानी दहशतवाद्याच्या सहकाऱ्याच्या घरावर गोळीबार

लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू होणार

निर्भय बनोचे एक शिलेदार वेडा विश्वंभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करायला जातो. यांच्या कार्यक्रमात रोहित पवार हजेरी लावतात. याचा अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. जनतेला यांचे नैराश्य समजते. ही भ्रष्ट नेत्यांची सुपारी घेऊन प्रचाराच्या मैदानात उतरलेली गँग आहे. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, घराणेशाही, सत्तातंत्राचा गैरवापर केल्यामुळे ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले अशा नेत्यांच्या बाजूने उभी राहिलेली ही टोळी आहे. मोदी या टोळीला पुरून उरले आहेत.
ही टोळी ज्याच्यासाठी प्रचार करते त्याचा बाजार जनता उठवते, ज्याच्या विरोधात प्रचार करते त्याच्यावर जनतेचा विश्वास बसतो हे गेल्या दहा वर्षात वारंवार उघड झालेले आहे.

वागळेंच्या ज्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांनी दंगा केला तो कार्यक्रम पुण्याच्या सानेगुरुजी स्मारकात पार पडला. साने गुरुजींनी आयुष्यभर संघाचा द्वेष केला. त्यांचेचे हे चेले. परंतु यांच्या द्वेषाला, यांच्या विरोधाला जनता किंमत देत नाही. किंबहुना हे जितकी ओरड करतील तितकेच जनतेचे मोदींना समर्थन वाढेल. देशपातळीवर मोदींना सत्तेवरून हटवून राहुल गांधी नावाचे बुजगावणे सत्तेवर बसवणे परवडणार नाही हे देशाच्या जनतेला ठाऊक आहे. महाराष्ट्राच्या जनतेनेही उद्धव ठाकरे यांचा जुलमी, घरबशा आणि वसूलीबाज कारभार पाहिला आहे. या प्रचार टोळीचा प्रचार भाजपाच्या पथ्यावर पडणारा आहे, त्यांना मारहाण करण्यापेक्षा यांचे वैचारीक वस्त्रहरण करून त्यांना नागडे करणे हाच उपाय जास्त प्रभावी आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा