वांगं तेच, बिरबल आणि राऊतांची मजबुरीही सारखीच….

राऊतांचा निगरगट्टपणा समोर आणणारी मुलाखत

वांगं तेच, बिरबल आणि राऊतांची मजबुरीही सारखीच….

तुरुंगातून बाहेर आलेले शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत हे नरमलेत असा सूर अनेकांना लावला. प्रत्यक्षात तसे काहीच दिसत नाही. आजारातून उठलेल्या माणसाच्या हालचाली काही काळ मंदावलेल्या असतात, कारण शक्ती क्षीण झालेली असते. परंतु काही काळात तो मूळ पदावर येतो, पहिल्यासारखा चालू बोलू लागतो. राऊतांचेही तसेच आहे, चार दिवसात तुरुंग इफेक्ट संपल्यानंतर ते पुन्हा मूळपदावर येतील याची झलक एबीपी माझावरील त्यांच्या मुलाखतीतून मिळाली.

सरकारविरोधात लिहीणाऱ्या बोलणाऱ्यांवर कारवाई होते, त्यामुळेच मला अटक झाली, हे सांगण्यासाठीच राऊत हे खांडेकरांच्या कट्ट्यावर आले होते. हा दावा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हिटलर, सद्दाम, गद्दाफी यांची जागतिक उदाहरणे देण्याची काहीच गरज नव्हती. कारण मविआचा वसुली प्रमुख अधिकारी सचिन वाझे याच्या मार्फत वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी याच्यावर झालेली अटक लोक अजून विसरलेले नाहीत. एखाद्या दरोडेखोराप्रमाणे अर्णबला झालेली अटक ही त्याच्या ठाकरेविरोधी बोलण्यामुळे झाली होती, हे जगाला ठाऊक आहे. त्यावेळी संजय राऊतांना बोलणाऱ्यांचे स्वातंत्र्य जपावेसे वाटले नाही. हम करे सो कायदा हा त्यांचा स्वभाव आहे.

अमिताभचा शहंशाह नावाचा सिनेमा आला होता. शहंशाह जो खूद कानून है, खुद मुजरीम पकडता है, उनका मुकदमा सुनता है और खुद सजा देता है. संजय राऊत स्वत:ला शहंशाह समजत असावेत. कारण ते म्हणतील तो न्याय असतो. ते ज्याच्यावर ठपका ठेवतील तो अपराधी असतो. राऊतांनी या स्वप्न रंजनातून बाहेर यावे. ते स्वत: एका प्रकरणात जामिनावर आलेले आरोपी आहेत, याचे भान बाळगावे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

बाबा रामदेव यांना धक्का; पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

गोध्रा कटाच्या सूत्रधाराचा जामीन वाढविला

लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ‘मेगाब्लॉक’

 

या संपूर्ण मुलाखतीत राऊत यांचे वस्त्रहरण शक्य होते, परंतु एबीपी माझा हा दुसरा ‘सामना’ असल्यामुळे त्यात लुटुपुटूच्या चढाईचा आणि लढाईचा भागच जास्त होता. तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतर ‘माझा कट्टा’वर राऊतांची झालेली मुलाखत म्हणजे हिंदीत ज्याला ‘झुठ का पुलिंदा’ म्हणता येईल अशीच होती. संजय राऊत नरमले असल्याचा गैरसमज दूर करणारी ही मुलाखत. अत्यंत बिनबुडाची खोटारडी विधाने आणि उडवाउडवीची उत्तरे हे मुलाखतीचे वैशिष्ट्य. त्यात मुलाखत घेणारे राजीव खांडेकर असल्यामुळे त्यांच्याकडून टोकदार प्रश्नांची अपेक्षाच नव्हती. आडून आडून असे काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न झाला तेव्हा राऊतांनी गोलमाल उत्तरं दिली आणि वेळ मारून नेली. खांडेकरांनाही मुळाशी जाण्याची इच्छा नव्हती.

अकबर बिरबलाची वांग्याची गोष्ट ही मुलाखत पाहून आठवली. एकदा वांग्याचे रोपटे पाहून अकबर बिरबलाला म्हणाला, ‘वांगं ही काय भाजी आहे, किती ओंगळवाणं दिसतं ते.’ बिरबल म्हणाला, ‘होय जहाँपना अगदी बरोबर बोललात तुम्ही.’ दुसऱ्या दिवशी अकबराचा मूड बदलला. तो म्हणाला, ‘वांगं म्हणजे भाज्यांचा राजा, काय रंग, काय रुप, बघ कसा डोक्यावर मुकूट घेऊनच जन्माला आलाय.’ त्यावर बिरबल म्हणाला, ‘होय जहाँपना.’ ‘पण, काल तू काही तरी वेगळं म्हणाला होतास बिरबला?’ बादशहाने विचारले. तेव्हा बिरबल म्हणाला की, ‘जहाँपना मी नोकरी आपली करतो वांग्याची नाही.’

राऊतांनीही संपूर्ण मुलाखतीत वारंवार अशी दुटप्पी विधाने केली. कारण ते नोकरी ठाकरेंची करतात. ‘मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, मी एक नोकरदार मध्यमवर्गीय माणूस, पत्राचाळ कुठे आहे मला माहीत नाही’, अशी धादांत खोटी विधाने राऊतांनी या मुलाखतीत केली. राजकारण्यांत असलेला निगरगट्टपणा त्यांना जमू लागला आहे. पत्राचाळीशी संबंध नव्हता तर मग २००६ मध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या सोबत पत्राचाळीच्या पुनर्विकासाच्या बैठकीत कशासाठी सामील झाला होतात? हा प्रश्न विचारण्याची इच्छा खांडेकरांना झाली नाही.

बोलणाऱ्यांचा लिहीणाऱ्यांचा सरकारला त्रास होतो, हे सांगण्यासाठी त्यांनी टिळक, सावरकर, वाजपेयींचे उदाहरण दिले. खांडेकरांनी तेही ऐकून घेतले. तुम्ही हरामखोर, भडव्या, दलाल असे अपशब्द का वापरले? असा प्रश्न विचारण्याची धमक पीआर पत्रकारांना नसते, त्यामुळे त्यांनी ‘महाराष्ट्रात बोलणाऱ्यांना काय बोलतोय याचे भान उरले नाही’, असा सवाल खांडेकरांनी केला. त्यांचा बोटचेपा स्टान्स पाहून, राऊत उत्तरले ‘आमच्या सारखे लोक आहेत, त्यांना माहीत असते की ते काय बोलतात. देशातला हा स्तर खाली जातोय गेल्या सात आठ वर्षात खाली गेलाय’, अशी मखलाशी केली. ‘राजकारणात व्यक्तिगत द्वेष असू नये, कुटुंबापर्यत पोहोचू नये’, असा शहाणपणाही पाजळला. ‘सूडाच्या कारवाया करण्यात आलेल्या राजकीय कारवायाबाबात चौकशी समिती नेमावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश किंवा संयुक्त संसदीय समिती मार्फत ही चौकशी करावी’, अशी मागणी त्यांनी केली.

समोर बसलेला आपण सांगू ते ऐकून घेणारा असला की बोलणारा काहीही बोलणारच. राऊतांच्या गाजलेली ऑडीओ क्लीप
ऐकावायची होती, विषय संपला असता. अर्णब गोस्वामी, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, कंगना रनौट यांच्या प्रकरणाचाही सूडाच्या कारवायांच्या चौकशीत समावेश करावा का? राजकारणात कुटुंबापर्यंत जाऊ नये, असा सल्ला राऊतांनी नबाब मलिकला का दिला नव्हता? असे प्रश्न अनेकांच्या ओठावर आले होते, परंतु ते खांडेकरांना सुचण्याचे काही कारण नव्हते.
त्यातल्या त्यात काही महिला पत्रकारांनी राऊतांना आडवे तिडवे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या अश्लाघ्य भाषेबाबतही प्रश्न विचारला. तुम्ही कंगना बद्दल वापरेल्या शब्दांचे काय?

तेव्हा लढाईमध्ये कोणतं हत्यार वापरायचे हे त्या त्या वेळी ठरवायचे, असे आगाऊ उत्तर दिले. आमचे मुख्यमंत्री सभ्य होते, म्हणून पत्रकारांवर कारवाई झाली नाही.’ त्यावर, ‘आमच्याच पत्रकाराला तुम्ही अटक केली होती’, असा एकमेव टोकदार प्रश्न खांडेकर यांनी विचारला.

उद्धव ठाकरे हे सभ्य आहेत, हा या शतकातला सगळ्यात मोठा विनोद आहे. कधी काळी सामनामध्ये ‘सच्चाई’ हे सदर होते. राऊत ते अत्यंत पोटतिडकीने लिहायचे. परंतु पुढे हे सदर बंद झाले. कदाचित सामनामध्ये ‘सच्चाई’ छापणे परवडणार नाही, असे राऊतांच्या लक्षात आले असावे. ही ‘सच्चाई’ आता त्यांच्या व्यक्तिमत्वातून बाद झालेली दिसते. तुरुंगातून बाहेर आलेले राऊत हे पहिल्या पेक्षा जास्त भंपक आणि बोगस आहेत, याचा साक्षात्कार मुलाखत पाहाणाऱ्या अनेकांना झाला असेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version